॥ द्रष्टुम् इच्छामि ते रुपम् ऐश्‍वरम् पुरुषोत्तम॥

0
254

– प्रा. रमेश सप्रे
गीतेतला अर्जुन हा आपला प्रतिनिधी वाटतो. तो जे प्रश्‍न विचारतो ते आपल्या मनातले व जीवनातले असतात. इतकी शतकं लोटूनही आज झपाट्यानं बदलणार्‍या काळातही तो उपयुक्त वाटतो यातच गीतेची महानता आहे.
कृष्णार्जुनांचं नातं गीतेपुरतं बोलायचं झालं तर अर्जुनाच्या बाजूनं शिष्य-गुरुचं नातं आहे. पण कृष्णाच्या बाजूनं ते मित्राचं किंवा सख्याचं आहे. ही गीतेची मधुरता आहे. अर्जुन कृष्णाच्या पायाजवळ शरणागती पत्करुन बसतो त्याचवेळी कृष्ण त्याला छातीशी कवटाळतो.. प्रत्यक्षात जरी नाही तरी शब्दांच्या माध्यमातून अनेकदा ही सख्यत्वाची भावना भगवान श्रीकृष्ण व्यक्त करतो. गंमत म्हणजे एका प्रसंगात अर्जुन कृष्णाला ‘सखा’ मानून केलेल्या वर्तनाबद्दल खंत व्यक्त करतो. कोणता आहे तो प्रसंग?महाभारतातलं कथानक गीतेत ङ्गारसं पुढे जात नाही. -युध्दाच्या आरंभी दोन्ही सैन्यात स्वजन (आपलेच नातेवाईक) पाहून अर्जुनाला विषाद होतो. तो खचून जातो. ‘युध्द करणार नाही’ असं ठामपणे सांगतो. पण श्रीकृष्ण भगवान त्याला समुपदेशन करुन पुन्हा युध्दाला उभं करतात एवढच नव्हे तर युध्द जिंकूनही देतात. बस एवढाच कथा भाग गीतेत येतो. भीष्माचार्यांचं रथातून पतन, द्रोण- कर्ण इ. विरांचे मृत्यू, अभिमन्यूचा दु:खद अंत या घटना गीताप्रसंगानंतरच्या म्हणजे युध्द सुरु झाल्यानंतरच्या आहेत.
तरीही गीता कंटाळवाणी वाटत नाही. एक कारण म्हणजे श्रीकृष्णार्जुन संवादाचा अखंड प्रवाह, ह्या संवादातली आपल्या जीवनाशी, जीवनातील समस्यांशी संबंधित असलेली प्रश्‍नोत्तर यामुळे आपण गीताप्रवाहाच्या काठावर न राहता त्या प्रवाहाचा भाग बनून जातो.
असाचं एक नाट्यपूर्ण व रोमांचक प्रसंग आहे विश्‍वरुपदर्शनाचा. अकराव्या अध्यायातला. वरवर अद्भुत नेत्रदीपक वाटणारा हा प्रसंग आपल्याला अंतर्मुख बनवतो, नवी दृष्टी देतो. दृष्टीशिवाय दर्शन शक्य नसतं अन् विश्‍वरुपदर्शनासाठी तर दिव्य दृष्टी लागते. ही दिव्य दृष्टी कशी मिळवायची, कशी टिकवायची,कशी वापरायची यातच महत्वाचं समुपदेशन दडलेलं आहे.
या प्रसंगी पार्श्‍वभूमी कोणती?
अर्जुन कृष्णाला भगवंताचं दर्शन कुठंकुठं अधिक प्रभावीपणे घेता येईल असं विचारतो. यातून भगवंताच्या विभूतींचा विषय सुरु होतो. ‘माझ्या असंख्य विभूती आहेत. खरं तर मी कणाकणात- अणुअणूत आहे. पण माझं विशेष दर्शन किंवा माझा विशेष प्रत्यय ज्या वस्तूत वा व्यक्तीत येतो त्यांची काही उदाहरणं भगवंत सांगतात. शेवटी ‘जिथं जिथं विशेषत्वानं जाणवेल अशी ऊर्जा (शक्ती) , वैभव, ऐश्‍वर्य यांचा अनुभव येतो तिथं तिथं मी आहेच असं समजावं. -असा सिध्दांतही भगवंत सांगतात. त्यावर अर्जुनाचा प्रश्‍न-‘मला ही सारी रुपं (विभूती) एकत्रितपणे पाहायला मिळतील का? तुझं ऐश्‍वर्यरुप म्हणजेच विश्‍वरुपदर्शन मला पाहता येईल का? …. यावर भगवंतानं आपलं विश्‍वरुप प्रकट केलं.
यापूर्वी आपल्या विश्‍वभर पसरलेल्या विभूतींच-विश्‍वंभर रुपाचं-दर्शन अर्जुनाला घडवलं त्याचा समारोप करतांना भगवंताचे शब्द ङ्गार स्पष्ट व अर्थपूर्ण होते- ‘एकांशेन स्थितो जगतम्’ म्हणजे ‘मी हे सारं विश्‍व माझ्या एका अंशानं धारण करुन स्थित, स्थिर आहे.’
एका अंशानं जर संपूर्ण विश्‍व धारण केलयं तर भगवंताला सर्व विश्‍व आपल्या ठिकाणी दाखवणं काय अशक्य आहे?- या विचारानं अर्जुन आपली इच्छा व्यक्त करतो-
‘द्रष्टुम् इच्छामि ते रुपम् ऐश्‍वरम् पुरुषोत्तम॥ अ.१० श्‍लो.३) अर्जुनाला पाहायची उत्सुकता आहे ते ‘ऐश्‍वर रुप’ म्हणजे ऐश्‍वर्ययुक्त दिव्य असं भगवंताचं सर्वेश्‍वर रुप! सूर्याची पसरलेली किरणं पाहणं सोप असतं पण ही असंख्य किरणं जिथून निघतात त्या सूर्याला पाहण जवळ-जवळ अशक्य असतं. आपले डोळे दिपून जातात. त्याचप्रमाणे भगवंताची सृष्टीमध्ये विखुरलेली रुपं पाहणं अगदी सहजसोपं असतं पण जिथून ही रुपं व्यक्त होतात ते मूळ स्वरुप इतकं देदिप्यमान असतं की ते पाहण्यासाठी दिव्यदृष्टी, दिव्यनेत्र आवश्यक असतात. आपल्या देहाच्या, सामान्य डोळ्यांनी (विथ नेकेड आईज- चर्मचक्षूंनी) अतितेजस्वी विश्‍वरुप पाहता येत नाहीत. त्यासाठी हवी दिव्यदृष्टी (दिव्यचक्षू). म्हणून भगवंत अर्जुनाला अशी दिव्यदृष्टी देतात (दिव्यं ददामि ते चक्षू:) जिच्यामुळे अर्जुनाला विश्‍वरुपदर्शन घेणं शक्य होतं. (पश्य मे योगमैश्‍वरम्‌|)
खरं तर अर्जुन म्हणतो- माझ्यावरील अतिशय प्रेमामुळे तू जे सूक्ष्म अध्यात्मविषयक ज्ञान मला दिलस त्यामुळे ‘माझा मोह गेला (मोहोऽयं विगतो मम|)’ खरं तर इथंच गीतेचा उपदेश संपून अर्जुनानं उठून, उभं राहून, युध्दाला सिध्द होऊन यध्द सुरु व्हायला हवं होते. पण अर्जुन-कृष्ण यांचं नातचं असं अतिस्नेहाचं आहे की अर्जुनाला अजून बरचं काही ऐकाव असं सतत वाटत राहतं नि कृष्णालाही अखंड सांगत राहायला आवडतं. यामुळे गीतप्रवाह सुरु राहतो. अगदी शेवटी अर्जुनानं ‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा’ अस म्हणून आता तू सांगशील तेते तसं-तसं मी करीन (करिष्ये वचनं तव|)’ म्हणेपर्यंत हा अमृतासारखा श्रीकृष्णार्जुन संवाद म्हणजेच भगवंताचा अर्जुनाला केलेल्या समुपदेशनाचा प्रवाह वाहतच राहतो. ही आपल्यावरची भगवंताची (व व्यासमहर्षींचीही) कृपाच! असो. भगवंत अर्जुनाला जे सांगतात ते आपल्यासाठीही तितकंच महत्त्वाचं नि आवश्यक आहे,
‘पश्य मे पार्थ रुपाणि शतशोऽथ सहस्त्रश:|
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनिच॥
याचा अर्थ स्प्ष्ट आहे- भगवंत अर्जुनाला आपली शेकडों हजारों (शतशोऽथ सहस्त्रश:) म्हणजेच असंख्य रुपं पाहायला सांगताहेत अन् हया रुपांचं वर्णनही करताहेत ‘नानाविधानि नानावर्ण आकृती नि दिव्यानि’ अशी ती विविध रंगांची, आकारांची, विविध प्रकारची पण दिव्यरुपं आहेत. भगवंत जेव्हा ‘पश्य’ म्हणतात तेव्हा नुसतं पहा असं त्यांना म्हणायचं नसतं तर ‘पहा नि विचार कर’ असंच त्यांना सुचवायचं असतं. हे आपण कायम लक्षात ठेवायचं असतं. अनेकवेळा भगवंत अर्जुनाला ‘पश्य’ असं म्हणतात.
अगदी सोप्या शब्दात भगवंतानं आपण ‘सर्वात एक’ आहोत हे अर्जुनाला दाखवलं. पटवून दिलं. त्याच्या मनावर ठसवलं. खरंतर ‘बिंबवलं’. कारण ही जी सर्वत्र पसरलेली रुपं आहेत ती एक प्रकारे भगवंताची प्रतिबिंब आहेत. ‘मूळ बिंब’ आता दाखवलं जातय. ते म्हणजे ‘एकात सर्व’ म्हणजेच विश्‍वरूप दर्शन-भगवंतानं स्वत:मध्ये अर्जुनाला घडवलेलं सार्‍या विश्‍वाचं दर्शन!
या संदर्भात आणखी एक चिंतन करण्यासारखं आहे. या विश्‍वाचंच नव्हे तर विश्‍वनाथाचंही संपूर्ण ज्ञान मिळवायचं असेल तर त्याला सर्वत्र विखुरलेल्या-पसरलेल्या रुपातही पाहिलं पाहिजे आणि सारं विश्‍व त्याच्या ठायी एकवटलेल्या रुपातही पाहिलं पाहिजे. म्हणजे जसं विश्‍वेश-विश्‍वेश्‍वर रूपात त्याचं दर्शन घ्यायला हवं तसं ‘विश्‍वात्मा’ स्वरूपातही त्याचं दर्शन (म्हणजे चिंतन) करायला हवे. ज्ञानेश्‍वर ‘आता विश्‍वात्मके देवे’ म्हणतात ते या विश्‍वाच्या आत, सूक्ष्म स्वरुपात असलेल्या भगवंताला. अन् शेवटी ज्ञानेश्‍वरांच्या या ओव्या म्हणजे ‘ङ्गुले मोकळी, मिया अर्पिली अंघ्रियुगुली विश्‍व-रुपाच्या’ असं म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात भगवंताचं सगळीकडे पसरलेलं विश्‍वरूप असतं. त्यांनी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र पसरलेला भगवंतच दिसत असतो. त्या असिम अनंताला ओवीपुष्पांचा हार कसा घालणार ह्यापेक्षां समर्पणभावानं मोकळी ङ्गुलंच त्याच्या पायावर (अंघ्रियुगुली) वाहू या- असा विचार ज्ञानोबामाऊली करते. आपल्यासाठी केवढं प्रेरक मार्गदर्शन किंवा समुपदेशन आहे यात- भगवंताच्या स्वरुपाचं ‘चिंतन’ करत त्याच्या ‘रुपांचं’ दर्शन घ्या!
या दृष्टीनं भगवंताचे शब्द किती बोलके आहेत! विविध प्रकारची, रंगाची नि ढगांची-आकारांची-माझी असंख्य रुपं पाहा. नुसतं सांगूनचं भगवंत थांबला नाही तर घडी घातलेली (ङ्गोल्डेड) आपली एकेक करुन सर्व रुपं त्यानं अर्जुनासमोर उघडायला (अन्‌ङ्गोल्ड) सुरवात केली. पण पूर्वी विभूती दाखवतांना वापरलेल्या पध्दतीपेक्षा ही पध्दत निराळी होती. त्यावेळी आपल्यापेक्षाबाहेर आपलं दर्शन घडवणार्‍या गोष्टी होत्या. यावेळी सारी सृष्टी आपल्या आतच भगवंत दाखवत होते. म्हणजे ‘विभूतियोगा’च्या वेळी दिशा नि दृष्टी बहिर्गामी (सेंट्रिफ्यूगल) होती तर आता विश्‍वरुपदर्शनाचे वेळी दिशा आतली होती नि दृष्टी अंतर्गामी (सेंट्रिपेटल) होती.
अंतर्मुख झाल्याशिवाय अंत:करणात डोकावल्याशिवाय, अंत:निरीक्षण नि अंत:परीक्षण(इंट्रोस्पेकशन) केल्याशिवाय विश्‍वरुप दिसणारच नाही. कळणारच नाही म्हणून जाणवणार नाही.
अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन आपलं विश्‍वरुप उलगडायला किंवा उघडायला भगवंतानं आरंभ केला. त्याचा प्रभाव विलक्षण होता. अर्जुनाच्या मनावर त्यामुळे झालेला परिणाम लक्षणीय (विचार करण्यासारखा) होता. अन् हा परिणाम घडवण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया घडली होती. या प्रभाव-परिणाम-प्रक्रिया यांच्याविषयी थोड सहचिंतन करु या.
• विश्‍वरुप दर्शनाचा प्रभाव- एकाच वेळी हजारों सूर्य आकाशात तळपू लागले तर जेवढी ऊर्जा (शक्ती) तयार होईल तेवढी त्या विश्‍वरुपदर्शनामुळे झाली. एक महान शक्ति-पूर्ण पण त्याचवेळी महाविनाशक अशी शक्ति जन्माला घातली गेली याचा अनुभव सर्वांना आला. साहजिकच ही शक्ती ज्याच्या हातात आहे त्याच्या विवेकशक्तीवर या शक्तीचा प्रभाव अवलंबून होता. विधायक (कन्स्ट्रक्टिव्ह) नि विध्वंसक (डिस्ट्रक्टिव्ह) अशी दोन्ही रुपं किंवा पैलू त्या विश्‍वरुपाचे होते.
• विश्‍वरुपाचा परिणाम – अर्जुनाच्या प्रत्येक इंद्रियावर झाला होता. यापूर्वीही भगवंतानं-भगवान श्रीकृष्णानं- विश्‍वरुप प्रकट केलं होतं. माता यशोदेला हा लाभ तीनदा झाला होता. जननी देवकी मात्र या अपूर्व लाभापासून वंचित राहिली. भगवंताची लीला खरोखर अगाध आहे. जांभई देताना, पिलेलं दूध तोंडातून ङ्गुरङ्गुर करत बाहेर सोडताना तयार झालेल्या बुडबुड्यात नि ‘माती खाल्लीस का ?’- म्हणून विचारल्यावर ‘मी नाही खाल्ली माती !’ म्हणून निरागसपणे उघडलेल्या तोंडात विश्‍वरुपाचं दर्शन त्या यशोदा माऊलीला घडवलं होतं. नि जरा निराळ्या प्रकारचं महातेजस्वी विराटरुपाचं दर्शन दुर्योधनाच्या राजसभेत घडवलं होतं. जन्मांध धृतराष्ट्र, सूर्यपुत्र कवचकुण्डधारी कर्ण नि वासुदेवशरण पितामह भीष्म यांच्याखेरीज सार्‍यांचे डोळे त्या विराटरुपाच्या तेजानं दिपून गेले.
या सार्‍या दर्शनांपेक्षा यावेळचं विश्‍वरुपदर्शन आगळंवेगळं होतं. यात भय-विस्मय निर्माण करणारा भाग प्रमुख होता. युद्धाच्या रणधुमाळीच्या पार्श्‍वभूमीवर साजेसं, परिस्थितीला योग्य असं हे विश्‍वरुप होतं. त्याचा अपेक्षित परिणाम अर्जुनावर झाला. त्याला श्रीकृष्ण भगवानाचा महाप्रभाव कळून आला व तो अधिकच ‘कृष्णशरण’ बनला.
• विश्‍वरुप दर्शन घ्यायची पद्धती – प्रत्येक देवाचं दर्शन घेण्याची एक विशिष्ट पद्धती असते. शिवलिंगाचं दर्शन घेताना डाव्या हाताचा अंगठा नि तर्जनी (दुसरं बोट) शंकरासमोरील नंदीच्या शिंगावर टेकवून, उजव्या हातानं त्या नंदीच्या वृषणाला स्पर्श करुन डाव्या हाताच्या शिंगावरील खिडकीतून शिवलिंगाचं दर्शन घ्यायची पद्धत आहे. तसं निरंतर विश्‍वरुप पाहून त्याचा संस्कार स्वत:वर घडवत राहिलं पाहिजे. म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत किंवा असिम आकाशापर्यंत दिव्यत्वाची अनुभूती नि देवत्वाचं दर्शन होत राहिलं पाहिजे. खरं तर असं ‘विश्‍वरुप’दर्शन घेत राहिलं पाहिजे. यासाठी डोळे-कान-नाक-जीभ-त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये उपयोगी पडतीलच. पण हात-पाय-वाणीसारखी कर्मेंद्रिये नि मुख्य म्हणजे मन-बुद्धी-चित्त यासारखे अंत:करणाचे पैलूही प्रभावी ठरतील.
यासाठी हवा ध्यास-हवा अभ्यास-हवेत सायास-प्रयास…. कशासाठी? सतात विश्‍वरूप दर्शनासाठी-दूरदर्शनासाठी नव्हे, केवळ सूक्ष्मदर्शनासाठी नव्हे तर अंतर्दशनासाठी….अंतर्यामी कृष्णाच्या किंवा आत्मारामाच्या दर्शनासाठी… आतून बाहेर पाहू या नि बाहेरून आत दर्शन घेऊ या. सर्व चराचर बनून महाविष्णु किंवा महाशिव किंवा महाईश्‍वर कसे बनतात यावर चिंतन करत त्या परम-ब्रह्माविष्णुमहेशाचं दर्शन घेऊ या. परनेश्‍वर-परमात्मा-परब्रह्माचा शांतमौन अनुभव घेत आत्मानंदात डुलत राहू या. ब्रम्हानंदावर झुलत राहू या. परमानंदात ङ्गुलत राहू या.
हे केवळ शब्द नाहीयेत. तर ही जीवनसरणी (वे ऍाङ्ग लाइङ्ग) आहे ‘वसुधैवकुटुंबकम्’ ची भावना जपत ‘भूतां परस्परे जीवांचे मैत्र’ अनुभवायची. ‘वासुदेव: सर्वम् इति! म्हणत क्षणोक्षणी वासुदेव आपल्यातून व्यक्त करण्याची जीवनशैली आहे ही. हे विश्‍वचि माझे घर! हे विश्‍वचि माझा हरिहर! अशी जीवनदृष्टी आहे ही! अशी दृष्टीच अखंड दर्शन घडवते‘विश्‍वरुपदर्शन’!