सैतानी पाश

0
99

इराकमधील आयएसआयएसच्या इस्लामी बंडखोरांनी स्टीव्हन सॉटलॉफ या आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा निर्घृण शिरच्छेद करून आपल्या सैतानी वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. यापूर्वी जेम्स फॉली या पत्रकारालाही त्याच पद्धतीने ठार मारण्यात आले होते. इराकमधील हवाई हल्ले थांबवणार नसाल तर एकामागून एक अमेरिकी लोकांना असेच ठार मारले जाईल असा इशाराही आयएसआयएसने दिला आहे. अमेरिकेच्या अचूक हवाई हल्ल्यांशी मुकाबला करण्याची कोणतीही क्षमता नसलेल्या आयएसआयएसने अमेरिकी पत्रकारांसारखे ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी त्यामुळे अमेरिकेच्या आयएसआयएससंबंधीच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सांगून बराक ओबामांनी हवाई हल्ले सुरूच ठेवण्याचे संकेत दिलेले असले, तरी एकामागून एक होत असलेल्या या निर्घृण शिरच्छेदांनी अस्वस्थ बनलेल्या अमेरिकी जनतेमध्ये ओबामा दहशतवादाप्रती हवे तेवढे कठोर नाहीत अशी त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. यापुढे अमेरिकी नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ संभवते आणि त्यातही आयएसआयएसच्या कार्यक्षेत्राबाहेरील देशांमध्ये असे हल्ले होऊ शकतात. आपल्या गोव्यामध्ये येणार्‍या विदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देणे यापुढे आवश्यक ठरेल. नुकतेच अत्यंत निर्दयपणे ठार मारल्या गेलेल्या सॉटलॉफला गेल्या वर्षी सिरियामधून पळवण्यात आले होते. गेले वर्षभर त्याचा शोध सुरू होता. जेम्स फॉलीची हत्या करताना सॉटलॉफलाही त्या व्हिडिओत उभे करून त्याच्या मार्फत अमेरिकेला इशारा देण्यात आला होता. तरीही हवाई हल्ले सुरूच राहिल्याने सॉटलॉफ याचीही हत्या झाली. ही हत्या करताना या दोन्ही पत्रकारांच्या अंगावर केशरी रंगाचा जम्प सूट घालण्यात आला होता. अमेरिका आपल्या तुरुंगांतील कैद्यांना अशाच प्रकारचा जम्प सूट घालत असते. त्यामुळे त्याचा सूड उगवण्याचाच हा प्रकार दिसतो. सिरियातील कुठल्याशा वाळवंटी प्रदेशात सदर दोन्ही पत्रकारांचा शिरच्छेद करण्यात आला. ओसामा बिन लादेन जे व्हिडिओ संदेशांचे तंत्र वापरायचा, त्याचाच वापर आयएसआयएसचे दहशतवादी म्होरके करू लागलेले दिसतात. मारल्या गेलेल्या पत्रकारांचा काहीही दोष नसताना त्यांची हत्या झाली. ज्या निधडेपणाने हे दोघेही मृत्यूला सामोरे गेले ते पाहिले तर त्यांच्या धैर्याची कमाल वाटते. असे आणखी किती निष्पापांचे बळी या सैतानांच्या हाती जाणार आहेत? दहशतवादाचे सावट दिवसेंदिवस जगावर गडद होत चालले आहे. ओसामा बिन लादेनच्या निःपातानंतर अल कायदाचा कणा मोडला असला, तरी ठिकठिकाणचे दहशतवादी गट एकमेकांशी संधान बांधून जगाला आव्हान देण्यासाठी फुरफुरत आहेत. आयएसआयएसच्या लढ्यामध्ये अगदी आपल्या भारतातूनही तरूण सामील झाले, त्यावरून अशा जिहादी घटकांच्या अपप्रचाराचा परिणाम कसा होत असतो त्याचे दर्शन घडते. या परिस्थितीत अशा दहशतवादी शक्तींविरुद्ध समस्त विश्वाने एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे, कारण आज सुपात, उद्या जात्यात या नीतीने अवघे जग या सैतानांच्या हाती भरडले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दहशतवादाप्रतीची आपापली नीती प्रत्येक देशाने तपासली नाही, तर परिस्थिती भविष्यात अधिक बिकट होत जाईल. युरोपीय देश आपल्या अपह्रत नागरिकांच्या सुटकेसाठी खंडणी देणे पसंत करतात. कॅनडाने आपल्या दूतांना सोडविण्यासाठीही हेच केले. परंतु अशा प्रकारच्या बोटचेपेपणातून दहशतवादी शक्तींचे मनोबल वाढते आणि अपहरणाचा हुकुमी एक्का त्यांच्या हाती येतो. इस्रायल किंवा रशियासारखे देश मात्र अत्यंत कठोरपणे दहशतवादाचा सामना करीत आलेले आहेत. इस्रायलची नीती तर ठोशास ठोसा अशीच आहे आणि गाझामधील हल्ल्यांबाबत कोणी कितीही गळा काढला, तरी हमासने इस्रायलवर चालवलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे ते प्रत्युत्तर आहे हे दुर्लक्षिता येणार नाही. रशियाने मॉस्कोच्या थिएटरमध्ये शेकडोंना ओलीस ठेवणार्‍या चेचेन्याच्या बंडखोरांना एका तपापूर्वी विषारी वायू सोडून सळो की पळो करून सोडले होते. दहशतवादाविरुद्ध एकवाक्यता होऊ शकली तरच आयएसआयसारख्या उगवत्या दुष्प्रवृत्तींचा नायनाट करणे शक्य होईल.