सरकार बदला, कोकणचे भाग्य बदलेल : मोदी

0
97
तासगाव (महाराष्ट्र) येथील भाजपच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

महाराष्ट्राबरोबरच कोकण आणि सिंधुदुर्गचे भाग्य बदलण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रातील सरकार बदला, अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणवासीयांना दिली.
सिंधुदर्ग जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार प्रमोद जठार, राजन तेली व विष्णू मोंडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कणकवली कासार्डे येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.खास मराठी शैलीतूनच भाषणाला सुरुवात करताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याला शिक्षण देणारे शिक्षक अनंत काळे आपल्या कोकणातीलच होते. त्यांच्या भगिनींनी मला आशीर्वाद दिल्याने महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असा विश्वास सभेच्या सुरुवातीस त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्गच्या शेजारच्या गोवा राज्यात पर्यटनातून विकास साधला जावू शकतो. तर मग सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र मागे का ? गोव्यासारखे विपुल नैसर्गिक सौंदर्य, किनारपट्टी लाभली असताना गेली कित्येक वर्षे सत्ता भोगणार्‍या आघाडी सरकारच्या नेत्यांची मने सुंदर नसल्याने तुमची अशी गत झाली असल्याचा टोला मोदी यांनी लगावला.
गतिमान विकास साधायचा असेल तर पर्यटन उद्योग तितकाच महत्त्वाचा आहे. गरीबातील गरीब माणूस पर्यटन व्यवसायातून आपला विकास साधू शकतो. इतकेच नव्हे तर पर्यटकांना वेडे करून सोडणारे आणि छत्रपतींचा वारसा लाभलेले गडकिल्ले महाराष्ट्रात असूनही केवळ स्वविकास आणि घराणेशाहीत डूबलेल्या या राजकारण्यांनी महाराष्ट्राला आतापर्यंत केवळ लुटण्याचेच काम केले. त्यामुळे या लोकशाही राज्यात राजेशाहीच्या काळात जी घराणेशाही नसेल, तशी घराणेशाही आज येथील नेते पुढे चालवीत आहेत. बाप मंत्री आणि मुलगे खासदार, आमदार असे चित्र महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी निर्माण केले आहे. खरे तर लोकशाहीत सर्वसामान्य कार्यकर्ता, नागरिक पुढे आला पाहिजे. भाजपा याबाबतीत अग्रेसर असून आपण स्वत: त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे मोदी यांनी सांगितले.
सभेला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उमेदवार प्रमोद जठार, राजन तेली, विष्णू मोंडकर, विष्णू सुर्या वाघ, सतीश धोंड, संजू देसाई, प्रमोद रावराणे, प्राजक्ता देसाई, राजेंद्र म्हापसेकर, राजू राऊळ, मंदार कल्याणकर, रंगनाथ गवस, साईप्रसाद नाईक, श्री. भगत, शिशिर परुळेकर, सदा ओगले, सुहास सावंत, अजित गोगटे आदि पदाधिकारी उपस्थित होते. सभेला तीस हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.