सतत मागणी असलेला धातू : सोने

0
191

– शशांक मो. गुळगुळे
ज्या देशाची आयातीपेक्षा निर्यात जास्त असते तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो, पण भारताची मात्र निर्यातीपेक्षा आयात जास्त असते. याचे कारण आपला देश इंधन व सोने यांची फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारतात वाहनांची संख्या भरमसाठ आहे. एका कुटुंबात दोन-दोन, तीन-तीन वाहने असतात. त्याप्रमाणात आपल्या देशात पेट्रोल उत्पादित होत नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची आयात करावी लागते. सोन्याच्या दागिन्यांचीही भारतीय महिलांना प्रचंड क्रेझ आहे. मुलीचा विवाह हा सालंकृतच करायचा अशी प्रत्येक हिंदू माणसाची धारणा असते. सालंकृत विवाह करणे म्हणजे मुलीच्या अंगावर एखादा दागिना घालून तिचा विवाह करून देणे. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार भारताला फार मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करावी लागते. सणासुदीच्या काळात तर या मागणीत वाढच होते.भारतात सोन्याच्या किमती लंडन येथील सोन्याच्या मूल्यावर, तसेच अमेरिकेचा डॉलर व भारतीय रुपया यांच्या मूल्यावर ठरतात. तरीही २०१३ मध्ये लंडनमध्ये सोन्याच्या मूल्यात वार्षिक २९ टक्क्यांची घट होऊनही भारतात मात्र ४ टक्क्यांचीच घट झाली होती. याचे कारण २०१३ मध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे चौदा टक्के अवमूल्यन झाले होते. तसेच २०१३ मध्ये आयात शुल्कातही ४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. आयात शुल्कात वाढ केल्यामुळे चोरट्यामार्गे सोन्याची आवक जी मधल्या काळात बंद झाली होती ती काही प्रमाणात पुन्हा सुरू झाली.
ज्यांना लगेच दागिने करावयाचे नसतात असे लोक सोन्याची नाणी किंवा शिक्के खरेदी करायला पसंती देतात. कारण सोन्याच्या लगड्या एकावेळी खरेदी करणे सर्वांना शक्य होत नाही अशांसाठी नाणी खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असतो.
भारताचा प्रथमतः जेव्हा रोमशी व्यापार सुरू झाला तेव्हा भारतीयांना सोन्याची नाणी माहिती झाली. आपली संपत्ती वाढविण्यासाठी किंवा जवळच्या नातलगांना भेट देण्यासाठी भारतीयांचा सोन्याची नाणी खरेदी करण्याकडे कल असतो. भारतातील देवालयांत व घरोघरी सोन्याचा इतका साठा आहे की या साठ्यात भारताचा जगात पहिला क्रमांक लागेल. मुंबईत वडाळा येथे गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञातीच्या गणपतीची स्थापना केली जाते. या गणपतीच्या अंगावर ५ कोटी रुपयांचे दागिने असतात ही सर्वश्रुत गोष्ट आहे. ही फक्त एका गणपतीची गोष्ट आहे, अख्ख्या भारतातील देवालयांचा विचार करा म्हणजे केवढा सोन्याचा साठा असेल हे लक्षात येईल. या सगळ्या सोन्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काहीही फायदा होत नसून हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ‘डेडस्टॉक’ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही काही वर्षे भारतीयांकडे गुंतवणुकीसाठी दोनच पर्याय उपलब्ध होते ते म्हणजे सोने व जमीन. सोन्याकडे भारतीय नुसती गुंतवणूक म्हणून पाहत नाहीत तर त्यांच्या भावनाही त्यात गुंतलेल्या असतात. सोन्याची नाणी ही प्रामुख्याने २४ कॅरेटची असतात. आर्थिक अडचण निर्माण झाल्यास ही तात्काळ विकून हातात रोकडही येऊ शकते. सोन्याच्या दराचा भारतातील इतिहास पाहता ज्या दराने नाणे विकत घेतले असेल ते विकताना विकत घेतलेल्या रकमेपेक्षा नक्कीच जास्त रक्कम हातात पडते. दहा वर्षांपूर्वी ४ लाख रुपयांना एक किलो सोने मिळत होते व छोट्या शहरांत ४३५० चौरस फुटांची जागा (भूखंड) घेण्यासाठी १० लाख रुपये पडत होते. आज १ किलो सोने घ्यायला ३० लाख रुपये हवेत, तसेच छोट्या शहरांत ४३५० चौरस फुटाची जमीन घेण्यासाठीही तेवढीच रक्कम हवी. मध्यमवर्गीय भारतीय जमिनीत गुंतवणूक करण्यापेक्षा कमी वजनाच्या सोन्याच्या नाण्यांत वरचेवर गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देतो. भारतात विक्री होणार्‍या सोन्याच्या नाण्यांपैकी ७० टक्के विक्री ही ५ ग्रॅम, ८ ग्रॅम व १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नाण्यांची होते. सणासुदीला किंवा चांगल्या दिवशी सोने खरेदी करणे ही भारतीयांची परंपरा आहे, मानसिकता आहे. बँका व पोस्ट कार्यालयांतही सोन्याची नाणी विकत मिळतात. सोन्याच्या दुकानांत मिळणार्‍या नाण्यांपेक्षा ही थोडी जास्त महाग असतात, पण लोक बँक किंवा पोस्टातून ही खरेदी करायला प्राधान्य देतात, कारण यात बिल्कुल भेसळ नसते व ही स्वित्झरलँडहून आयात करून जशीच्या तशी विकली जातात. सध्या भारतात दोन हजारांहून अधिक पोस्ट कार्यालयांत सोन्याची नाणी विक्रीस उपलब्ध आहेत. २०११ मध्ये बँका व पोस्ट कार्यालयांनी मिळून १७.५० टन वजनाची सोन्याची नाणी विकली, तर २०१२ मध्ये १९ टन वजनाची सोन्याची नाणी विकली. सध्या आयातीवर निर्बंध घालण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट कार्यालयांतून सोन्याच्या नाण्यांची विक्री बंद करण्यात आली आहे. मे २०१३ पासून शासनाने सोन्याच्या नाण्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. २०१३ मे मधल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानंतर आयात बंद करण्यात आली आहे. भारत देशात वार्षिक सोन्याची मागणी ८०० ते ९०० टन इतकी आहे. यापैकी ३०० ते ३५० टन सोने हे गुंतवणुकीसाठी खरेदी केले जाते व उरलेले दागिने घडविण्यासाठी वापरले जातात. २००३ मध्ये २०.७ टन सोन्याच्या नाण्यांची भारतीयांनी खरेदी केली होती. त्यानंतरच्या काळात भारतीयांची क्रयशक्ती वाढत गेली. परिणामी २०१२ साली भारतीयांनी १०६.३ टन सोन्याची नाणी खरेदी केली. २०१३ मे नंतर आयातीवर बंधने आल्यामुळे या वर्षी ९६ टन सोन्याची नाणी खरेदी केली गेली. २००३ मध्ये ६५.६ टन सोन्याच्या लगड्या विकत घेतल्या गेल्या होत्या. २०११ मध्ये सर्वाधिक म्हणजे २८८ टन सोन्याच्या लगड्या विकत घेतल्या गेल्या होत्या, तर २०१३ मध्ये हे प्रमाण १९७ टन इतके होते. अक्षय तृतीया, धनत्रयोदशी, गुरुपुष्यामृत योग या दिवशी सोेन्याच्या नाण्यांची विक्री वाढते. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या नाण्यांची नाही, पण सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढते.
गोल्ड ईटीएफ
म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सोन्यात गुंतवणूक करणार्‍या बर्‍याच योजना आहेत. याना गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणतात. या फंडात शेअर बाजारात कामकाज चालू असताना कधीही खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजारी मूल्यानुसार करता येतात. ब्रोकरला फोन करून किंवा इंटरनेटवरूनही व्यवहार करता येतात. पैशांची गरज भासल्यास या गुंतवणुकीतले युनिट केव्हाही विकता येतात. यात सोन्याची चोरी होण्याची भीती नाही. कारण तुमच्या हाती प्रत्यक्षात सोने नसते. सोन्याच्या मूल्याची सर्टिफिकेटस् तुमच्याकडे असतात. यात व्यवहार होणारे सोने हे शंभर टक्के चोख असते, कारण या व्यवहारातील सोन्याला लंडन बुलियन मार्कर असोसिएशनकडून हे सोने ‘सर्टिफाय’ करून घ्यावे लागते. भारतात २००७ पासून ईटीएफ गुंतवणूक योजना कार्यरत आहेत. २००७ मध्ये ज्या वर्षी ही योजना सुरू झाली त्यावर्षी यात ९६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. मार्च २०१३ अखेरीस हे प्रमाण ११,६४८ टन होते, तर मार्च २०१४ अखेरीस हे प्रमाण ९,५३४ टन इतके होते. सध्या म्युच्युअल फंडाच्या १४ ईटीएफ योजना गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. त्या योजना बिर्ला सन लाईफ गोल्ड ईटीएफ, गोल्डमन सॅच्स गोल्ड ईटीएफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ, क्वान्टम गोल्ड, रेलिगेअर इन्वेस्को गोल्ड ईटीएफ, एसबीआय गोल्ड ईटीएस, ऍक्सिस गोल्ड ईटीएफ, कॅनरा रोबेको गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ, कोटक गोल्ड ईटीएफ, युटीआय गोल्ड ईटीएफ, आर* शेअर्स गोल्ड ईटीएफ, आयडीबीआय गोल्ड ईटीएफ, मोतीलाल ओस्वाल मोस्ट शेअर्स गोल्ड ईटीएफ. सोन्याच्या दरानुसार या सर्व योजनांतून गुंतवणूकदारांना सारखाच परतावा मिळतो. फक्त ज्या योजनेत प्रशासकीय खर्चाचे प्रमाण कमी आहे अशा योजनेत गुंतवणूक करणे चांगले. हे फंड गुंतवणूक सोन्यात करतात. सर्टिफिकेट जितक्या वजनाच्या सोन्याचे असेल तितकी रक्कम विक्रीनंतर मिळू शकते, पण काही गुंतवणूकदारांना ही सर्टिफिकेट ‘सरेंडर’ करून फिजिकल फॉममध्ये सोने हवे असल्यास तसेही मिळू शकते. पण त्यासाठीचे जे काही नियम व अटी आहेत त्या मात्र पाळाव्या लागतात.