विधानसभा वृत्त

0
110

सांताक्रुजमधील जलवाहिनींची कामे मार्चपर्यंत पूर्ण : ढवळीकर
सांताक्रुज मतदारसंघातील जलवाहिनी संदर्भातील सर्व कामे मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत बाबूश मोन्सेरात यांच्या प्रश्‍नावर दिले.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण व मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अशा कामांच्या बाबतीत चर्चा केली. त्यांनी ‘प्लॅक्सी’ निधीचा वरील कामासाठीही वापर करण्याची सूचना केली आहे. वास्को, मुरगांव, फोंडा या तालुक्यातील कामे वरील योजनेखाली हाती घेतली जाईल, अशी माहिती दिली.
जलवाहिन्या घातल्यानंतर पाणी कुठून आणणार, असा प्रश्‍न विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी केला. त्यावर ओपा हा २७ एमएलडी पाणी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या सर्वांना पाणी देणे शक्य होईल, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
कदंब पठारावरील घरांना गेले १२ वर्षे पाण्याचा पुरवठा होत नाही. तो कधी होणार, असा प्रश्‍न मोन्सेरात यांनी विचारला. त्यावर त्यांनी त्यांनाही २०१५ पर्यंत पाणी देण्याचे आश्‍वासन दिले. वीज व पाणीपुरवठ्याची सोय नसलेल्या भागात घरे उभारण्यासाठी नगर नियोजन खात्याने मान्यता देता कामा नये, असे ढवळीकर यांनी सांगितले. या प्रश्‍नावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांनीही भाग घेतला. तेथील लोकांनी पाणी पुरवठ्याची मागणी न करण्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्रक न्यायालयाला सादर केले होते, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सभागृहाला सांगितले.
फातोर्ड्यातील मलःनिस्सारणचे काम पूर्ण करणार : ढवळीकर
फातोर्डा मतदारसंघातील ९ कि. मी. अंतराच्या मल:निस्सारण वाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रश्‍नावर दिले.
वरील वाहिनी अत्यंत जुनी झाली आहे. या प्रकल्पालाही किमान ७० कोटी रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले. सदर वाहिनी संपूर्ण दक्षिण गोव्याला महत्वाची आहे. या वाहिनीची दुर्दैशा झाली असून ती फुटून अनेक ठिकाणी गटारातील पाण्याचे तलाव निर्माण झाल्याचे सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
नवे तंत्रज्ञान वापरून या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाईल, असे मंत्र्यांनी सांगताच, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शक्य असल्यास या प्रकल्पाला प्राधान्य देऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी तसे शक्य नसल्याचे सांगितले. मलःनिस्सारण महामंडळातर्फे तेथील मागास जमातीच्या लोकांना फूकट जोडण्या देण्याचेही मंत्र्यांनी आश्‍वासन दिले.
सुदेश लोटलीकर यांचे अभिनंदन
कवी सुदेश लोटलीकर यांना कोकणी मराठी परिषदेचा महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव काल गोवा विधानसभेत संमत करण्यात आला. हा ठराव आमदार नरेश सावळ यांनी मांडला. सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी तो सर्वानुमते मंजूर झाल्याचे जाहीर केले.