वर्षभरात समुद्रकिनारे कचरामुक्त

0
106
मिरामार-पणजी येथे ‘स्वच्छ गोवा सुंदर गोवा’ मोहिमेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

‘स्वच्छ गोवा-सुंदर गोवा’ मोहिमेचे उद्घाटन
डिसेंबर २०१५ पर्यंत गोवा कचरा मुक्त करण्याचे ठरविले आहे. सध्या किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ‘स्वच्छ गोवा सुंदर गोवा’ जागृती मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर पर्रीकर पत्रकारांशी बोलत होते.
उत्तर गोव्यातील किनारे स्वच्छ करण्याचे कंत्राट मुंबईस्थित भूमिका ट्रान्सपोर्ट कचरा हाताळणी सेवा कंपनीला दिले आहे तर मेसर्स राम इंजिनीअरिंग ऍन्ड कन्ट्रक्शन कंपनीला दक्षिण गोव्यातील किनारे स्वच्छ करण्याचे कंत्राट दिले आहे.
पाच वर्षांचे त्यांना कंत्राट दिले असले तरी या कंपनीच्या विरोधात दखलपात्र अशा तक्रारी आल्यास कंत्राट रद्द करण्याचा अधिकारही सरकारला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक शंभर मीटरांच्या अंतरावर कचरा पेट्या ठेवल्या जातील. त्याची किनारे स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. किनारे कचरा मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उभारण्याचे काम कंपनीतर्फेच केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
उत्तर गोव्यातील कंत्राट ७ कोटी ५१ लाख ४० हजार ९९९ रुपये खर्चाचे तर दक्षिण गोव्यातील कंत्राट ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपये खर्चाचे आहे. सुरुवातीस १५ महिन्यांचेच कंत्राट देण्यात आले आहे. त्यांची कार्यक्षमता पाहून ते ५ वर्षांवर नेण्याची सरकारची तयारी आहे.