वंश-वृक्षाची जोपासना आवश्यक

0
268

सौ. संगीता प्र. वझे, बोरी – फोंडा
एकदा सहज घरच्यांबरोबर एका संमेलनाला जायचा योग आला. मी कधीही कुठल्याही संमेलनाला गेले नव्हते. त्यामुळे माझा हा पहिलाच अनुभव. आम्ही तिथे वेळेतच पोचलो. बघता बघता शे-दीडशे माणसे जमली. त्यातली काही माणसे माझ्या ओळखीतली होती. मला खरेच प्रश्‍न पडला की एका माणसापासून एवढा मोठा कुटुंब-वृक्ष कसा तयार होऊ शकतो? आणि मग आठवले, आई एकदा म्हणाली होती की, स्वातंत्र्यापूर्वी आपल्या गोव्यात ज्यांना जास्त मुले असतील त्यांचा म्हणे सत्कार केला जाई. हा कदाचित त्याचाच परिणाम असावा, असो!
या संमेलनाला चार सख्खे भाऊ, त्यांची मुले, नातवंडे, पणतवंडे वगैरे जमली होती. सकाळच्या सत्रात सगळ्यांनी आधी एकमेकांची ओळख करून घेतली. तरूण पिढी तर एकमेकांसाठी अनोळखीच होती. काही लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आणि त्यांचे नवीन नातलग यांचीही माहिती गोळा करता आली. हे सर्व झाल्यावर गप्पागोष्टी करत जेवणाचाही कार्यक्रम आटोपला. संध्याकाळच्या सत्रात लहान-थोरांचे सत्कार झाले आणि असा हा दिवसभराचा कार्यक्रम आटोपून आम्ही घरी आलो. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या बरेच विचार डोक्यात रेंगाळू लागले आणि माझे मन वस्तुस्थितीचा आढावा घेऊ लागले.
आज घरोघरी परिस्थिती अशी आहे की, माणूस नोकरी-धंदा किंवा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपल्या मूळ कुटुंबापासून लांब चाललाय. आपल्याला माहीत असतात त्या आपले आजी-आजोबा आणि पणजोबांच्या काही ऐकीव गोष्टी. आपण आपल्या मूळ घरी फक्त गणेशचतुर्थी किंवा अशाच कुठल्यातरी धार्मिक किंवा पारंपरिक सणांच्या निमित्ताने जात असतो. आपल्या कुटुंबातील माणसांशी एवढाच काय तो आपला संबंध!
आज प्रत्येक घरातील माणसे आपल्या मुलांची शिक्षणे, नोकर्‍या, त्यांचे संसार अशा चौकटीत बंदिस्त झाली आहेत आणि प्रत्येकाच्या हाती मोबाईलची सोय झाल्याने प्रत्यक्ष भेटणे, बोलणे बरेच कमी झालेय. प्रत्येक मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर नवीन संसाराची जबाबदारी तिच्यावर पडते आणि हळूहळू माहेरची नाती, तिचे भेटणे वगैरे कमी होत जाते. हल्ली कुटुंब म्हणजे माझी बायको, माझी मुले अशी विचारसरणी पक्की झाल्याने सासरचीही माणसे जास्त जोडली जात नाहीत. याचाच परिणाम होऊन भावी पिढीला आपले आप्तेष्ट, नातलग, सगे-सोयरे माहीतच नसतात. कधीतरी फेसबुकवर असलेल्या आडनावावरून काही माणसे ओळखता येतात. पण काल रस्त्यात भेटलेली व्यक्ती आपल्याच नात्यातली आहे हे समजल्यानंतर एक आश्‍चर्यकारक, पण सुखद धक्का आपल्याला बसतो. म्हणूनच वार्षिक भरवली जाणारी ही संमेलने ही काळाची गरज होय. कारण येथेच येऊन आपल्याला आपण कुठल्या वंश-वृक्षाची फांदी आहोत हे लक्षात येते.
पूर्वी आजोबांचे नाव नातवाला ठेवायची एक परंपराच होती. त्यामुळे नाव सांगताच व्यक्ती कुठल्या घराण्यातली आहे हे पटकन लक्षात येई. पण आता तीही पद्धत राहिलेली नाही. याचे कारण पूर्वीची नावे आजच्या लोकांना आवडत नाहीत. किंवा माझ्या मुलाने जगात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे, तेही स्वबळावर असे काही आई-वडिलांना वाटते. पण आश्‍चर्याची गोष्ट अशी की आजोबांचे नाव जरी आवडले नसले तरी त्याची इस्टेट, प्रॉपर्टी, जे काही घर, बंगला, वाडा, बागायती हे सगळे मात्र प्रत्येकालाच हवे असते. ते घेताना आजोबांची लाज कुणालाच कधीच वाटली नाही. असो!
सारांश असा होतो की, आपण आपल्या पूर्वजांची आठवण फक्त या संमेलनात किंवा वार्षिक केल्या जाणार्‍या श्राद्धकर्माच्या दिवशीच करतो. मेळावे, संमेलनाच्या निमित्ताने जुन्या ओळखी ताज्या होतात. दोन पिढ्यांमधील अंतर दूर होते. लहान-थोरांचे सत्कार केले जातात. कुलवृत्तांतही छापले जातात. हे सर्व खरेच कौतुकास्पद आहे, पण नुसतीच आपल्या वंश-वृक्षाची ओळख करून घेणे आणि त्या वाढलेल्या वृक्षाची पाने मोजत बसण्यापेक्षा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने कुठलेही कर्म करताना मी फक्त एक व्यक्ती नसून कुठल्यातरी वंश-वृक्षाचा उत्तराधिकारी आहे हे लक्षात ठेवावे.
माझ्या प्रत्येक कर्माने माझे पूर्वज सुखावतील अथवा दुखावले जातील म्हणून प्रत्येक कर्म करताना माणसाने अखंड सावध रहावे. आपले पूर्वज स्वतःची चांगली किंवा वाईट ओळख ठेवून गेलेत. जे चांगले आहे त्याचा अभिमान बाळगावा आणि वाईट किंवा घृणास्पद कर्मे स्वतःच्या वागणुकीने धुवून टाकावीत. पण चुकूनही आपल्या पूर्वजांना दोषी ठरवू नये. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाला वाढवताना कायम या गोष्टींचा उल्लेख करावा. म्हणजे भावी पिढी आपल्या वागणुकीने आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवतील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की आपल्याला नुसतेच ‘वंश-वृक्ष’ वाढवायचे नाहीत तर आपल्या पूर्वजांची प्रतिष्ठा जपून, येणार्‍या भावी पिढीचे हित लक्षात घेऊन प्रसंगी स्वतःच्या आनंदापलीकडे जाऊन येणार्‍या प्रत्येक पिढीसाठी आदर्श पूर्वज बनायचेच!