योगमार्ग – राजयोग

0
159

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २४९)

(स्वाध्याय – १७)

 

योगशास्त्र हे एक संपूर्ण शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास तसाच व्यवस्थित शास्त्रशुद्ध हवा. प्रत्येक मार्ग व त्यांचे पैलू यांची सुरुवातीला तरी थोडी थोडी माहिती प्रत्येक योगसाधकाने करून घ्यायला हवी. त्यानंतर साधकाला ज्ञानपिपासा लागायला हवी. त्याने सूक्ष्मात जायचा प्रयत्न करायला हवा. हीच खरी योगसाधना. म्हणूनच ‘‘स्वाध्याय’’ हवा. या अष्टांगयोगातल्या नियमाचा नियमित अभ्यास अपेक्षित आहे.

योग या विषयाचे ज्ञान यायला लागले की समजते की ते सर्व पैलूंतील जीवनविकासाचे शास्त्र आहे- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक… आपणातील बहुतेक जण असा विचारच करत नाहीत. जास्त करून भौतिक प्रगतीकडेच कल जास्त असतो. हा पैलू अत्यंत आवश्यक आहेच, याबद्दल दुमत नाही. पण इतर पैलूंचा विकास झाला नाही तर फक्त भौतिक प्रगती होऊन कुणालाही फायदा नाही. कदाचित तात्पुरता फायदा दिसेल पण त्यामुळे अपेक्षित जीवनविकास होईल, याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण बहुतेक नाहीच. आज विश्‍वाची भयानक स्थिती झाली आहे त्याचे एक कारण हेच.
आज प्रत्येक जण जलद गतीने पळतो आहे. पूर्वी घोडेस्वार असत. ते घोड्याला जलद पळवत असत. तो घोडा फक्त सरळच बघत असे. कारण त्याच्या दोन्ही डोळ्यांना कवडे (झडपा) बांधली जात असत. आज बहुतेकांची स्थिती तशीच झाली आहे. भौतिक प्रगती डोळ्यांसमोर ठेवून घोडदौड चालू आहे. त्यामुळे आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे पाहिलेच जात नाही. शांतपणे बसून कुठल्याही खर्‍या जीवन विकासाच्या विषयावर संवाद साधायला बहुतेकांना वेळ नाही. वेळ असला तरी तशी गरज वाटत नाही किंवा इच्छा नाही. हीच खरी शोकांतिका आहे.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या, अणूच्या, इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात घोडे गेले व गाड्या आल्या. दुचाकी, चारचाकी… तर असाच एक तरुण रात्रीच्या वेळी आपल्या जलद पळणार्‍या खास दुचाकीवर जात होता. सगळीकडे अंधकार होता आणि आश्‍चर्याची व तेवढीच दुःखाची गोष्ट म्हणजे त्या तरुणाच्या वाहनाचा दिवा पेटत नव्हता. वाहनाच्या आवाजामुळेच माहीत होत होते की कुणीतरी जलद गतीने वाहन चालवीत आहे. पण विचारांती लक्षात येते की या घटनेत चालकाला रस्ता दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे त्याच्यासाठी ते फार धोकादायक होते.
पण आपल्यापैकी बहुतेक जण अशा घटनांकडे बारकाईने पाहत नाहीत. कारण ज्या व्यक्तीला अपघाताचा धोका असतो तो ‘‘आपला’’ कुणीही नसतो ना! याचे मूळ कारणच हे आहे की त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली नसते. त्यामुळे ‘हा आपला’, ‘तो दुसरा’ अशीच त्यांची वृत्ती असते. म्हणून दुसर्‍यांबद्दल त्याच्या मनात दया, करुणा, कळकळ नसते. पण या विश्‍वात काही जणांची आध्यात्मिक प्रगती झालेली असते. त्यांचे विचार व आचार वेगळे असतात.
त्या रस्त्यातून एक असाच आध्यात्मिक पैलूंचा विकास झालेला एक अज्ञात संन्यासी चालत जात होता. त्याने वाहनाचा आवाज ऐकला. त्या दिशेने बघितल्यावर त्याला संपूर्ण ज्ञान झाले की – वाहन फारच जलद गतीने जात आहे, चोहीकडे घनदाट अंधकार आहे आणि वाहनाला दिवा नाही. याचाच अर्थ चालकाला अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. हे ज्ञान होताच संन्यासी जोरात ओरडला- ‘जो कुणी वाहन चालक असेल त्याला अपघात होण्याची शक्यता आहे. माझ्याकडे टॉर्च आहे. तो चालकाने थांबून माझ्याकडून घ्यावा व मगच पुढे जावे.’
तेवढ्यात मोटरसायकलचा आवाज पुढे गेला. संन्याशाकडे कुणीही येत असल्याचा आवाज येत नव्हता. त्याला आश्‍चर्य वाटले. पण तेवढ्यात त्या घनदाट अंधारात एक आवाज आला…‘आपण सांगता ते मला माहीत आहे. पण माझ्या मोटरसायकलला ब्रेक नाही. म्हणून मी थांबून आपला टॉर्च घेऊ शकत नाही.’ ऐकता ऐकता आवाज मंद मंद होत गेला.
कोमल हृदयाच्या त्या संन्याशाने मनोमन भगवंताकडे प्रार्थना केली- ‘हे देवा, या तरुणाला तूच वाचव! त्याचे पुढे काय होणार ही कल्पनादेखील मी करू शकत नाही.’ एवढी प्रार्थना करून संन्यासी आपल्या वाटेला लागला.
कुठलीही गोष्ट ही बोध घेण्यासाठी असते. त्यामुळे ही घटना सत्य का? असे कधी घडू शकते का? हे प्रश्‍न उगाच विचारण्यात अर्थ नाही. या गोष्टीतून असा बोध घ्यायला हवा की विश्‍वांत बहुतेकांची अशीच स्थिती झालेली आहे. आपणांस आपण कुठे चाललो आहोत, किती गतीने चाललो आहोत, निश्‍चित ठिकाणी व्यवस्थित पोचणार का? वाटेवर अपघात होण्याची शक्यता आहे का?… यांपैकी कोणतीच गोष्ट निश्‍चित वाटत नाही.
आज अनेक सत्पुरुषांना ही परिस्थिती बघून दुःख होते. त्यांच्या हृदयातील प्रेम व करुणा कळवळून उठते. मग ते अशा अज्ञानी व्यक्तींना मदत करायला तयार होतात. पण दुःख म्हणजे लोकांना त्यांची मदत घ्यायलादेखील जमत नाही. कुठेही चला, प्रत्येक जण म्हणताना दिसतो, ‘‘नो टाइम’’ ‘‘वेळ नाही’’.
योगसाधकांची जसजशी प्रगती होते तसतसा आध्यात्मिक पैलू जागृत होतो. त्यांना इतरांबद्दल विचार करावासा वाटतो. आपल्याबरोबर त्यांचाही जीवनविकास व्हावा याची जाणीव होते. मग ते सुद्धा इतरांना साधना करायला प्रोत्साहन देतात.
जगात एक गोष्ट निश्‍चित आहे व ती म्हणजे जो जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. पण मरण केव्हा येणार हे नक्की नाही. त्यामुळे जोराने धावणार्‍या घोड्यांना जसा लगाम असतो, ज्यामुळे त्यांची निश्‍चित अशी गती ठरवता येते तशाच प्रकारे नियमित स्वाध्याय करून मनरूपी लगाम बळकट करावयाचा असतो. पुढे बुद्धिरुपी सारथी त्या मनाला आणखी शक्ती देतो व जीवनाला निश्‍चित दिशा मिळते. आत्म्याला सद्गती मिळते. शेवटी योगशास्त्राचा हेतू हाच आहे.
वेळोवेळी भारतात अनेक महापुरुष येऊन त्यांनी या विषयावर अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांचे कार्य योगशास्त्रावरच होते. सर्व विश्‍वाला त्यांनी योग व भारतीय संस्कृतीबद्दल उत्कृष्ट माहिती दिली. शिकागोतील जागतिक धर्मपरिषदेत सहभाग घेऊन त्यांनी स्वतःचे व भारत देशाचे नाव उज्ज्वल केले.
तदनन्तर आणखी काही सत्पुरुष भारतात जन्मले. त्यांनीसुद्धा मानवतेला मार्गदर्शन केले. त्यांपैकी एक म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले, कोकणातील छोट्या रोहा गावात जन्मलेला हा छोटा पांडुरंग जगातील समस्या बघून व्यथित व्हायचा. बालपणातच या प्रगल्भ बुद्धीच्या मुलाने ठरवले की मोठा होऊन मी भगवंताचे कार्य करीन! त्याला आवडेल असे समाजाला वळण देईन. मला तर वाटते की स्वामी विवेकानंदांनी पूर्वार्धाचे कार्य केले आणि पांडुरंग शास्त्रींनी उत्तरार्धाचे! वयाच्या ३४ व्या वर्षी (१९५४) त्यांनी जपानला जागतिक धर्मपरिषदेमध्ये भारतीय संस्कृती, गीता, श्रीकृष्ण.. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ते एकच तरुण प्रतिनिधी या परिषदेत होते.
त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अमेरिकन नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कॉम्प्टन यांनी त्यांना अमेरिकेला नेऊन त्यांचे कार्य करण्याची विनंती केली. पण त्यांनी ती नाकारली. कारण त्यांना आधी आपल्या देशात कार्य करायचे होते.
भारतात परत येऊन त्यांनी ‘स्वाध्याय परिवार’ बनवला. आज विश्‍वातील अनेक देशात लाखो स्वाध्यायी जीवन विकासासाठी भगवद्कार्य करीत आहेत. स्वाध्याय कार्य ज्ञान-कर्म-भक्ती या तीन योगमार्गांवर चालले आहे.
‘‘कृण्वंतो विश्‍वं आर्यं’’ (इथे आर्य हा गुणवाचक शब्द आहे, जातिवाचक नाही, असे पू. आठवले म्हणत) ‘‘वसुधैव कुटुंबकम्’’ ही वैदिकांची स्वप्ने प्रत्यक्षात आणायचा त्यांचा प्रयत्न आहे. या वैश्‍विक कार्याचा पाया आहे- ‘‘स्वाध्याय’’. म्हणूनच शास्त्रीजी सर्व ऋषींप्रमाणे म्हणतात-
‘‘तस्मात् स्वाध्याय प्रवचनाभ्याम् न प्रमदित्तव्यम्’’- तुम्ही स्वाध्याय करायला आळस करू नका. त्यानेच आत्मविकास साध्य होतो. मग करुया ना आपण सगळे- ‘‘स्वाध्याय!’’