माझे माहेर पंढरी…!

0
423

आषाढी एकादशीचा दिवस. साखळीचे विठ्ठलापूर म्हणजे गोव्यातील प्रतिपंढरपूर. तिथे भक्तांचा महापूर लोटला होता. मंदिराच्या पुढच्या रस्त्यावरही गर्दी लोटली होती. थोडाफार पाऊसही अधूनमधून आपली हजेरी लावत होता. शाळेला सुट्टी होती. मंदिराच्या आवारात बायका – पोरे जमलेली. फुलवाल्यांची चंगळ झाली होती. जणू जत्राच भरली होती. देवदर्शनाला प्रचंड रांग लागलेली. वातावरण विठ्ठलमय झाले होते. प्रत्येकाच्या घरात टीव्हीवर सह्याद्री चॅनल सुरू होता. विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाभिषेक चालू होता. ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’चे गाणे अभिषेकाच्या बरोबरीने बॅकग्राउंडवर चालू होते. पंडितजींचा आवाज मनाची तहान भागवत होता. हृदयाच्या तारा छेडल्या जात होत्या.

कुणाची तरी आठवण प्रकर्षाने जाणवत होती. समोरच्या वाड्यावर कुण्या एकाच्या घरी सत्यनारायणाची पूजा बांधली होती. सकाळी सकाळी मोठमोठ्याने लाउडस्पीकर वाजत होता. ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे साद घालत होते. परत एकदा जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. मन किंचित मलूल झाले. जखमेवरची खपली हळूच बाजूला सरली. जखम भळाभळा वाहू लागली.
मन नकळत भूतकाळात शिरले. मनमुराद नाचू लागले. नाचता नाचता रडू लागले. संध्याकाळची वेळ… सूर्यनारायण अस्ताला गेले होते. मीही पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो. आमचे घर डोंगरमाथ्यावर होते. जुने गाव खाली नदीकिनारी वसलेले होते. कुठूनतरी गाण्याची तान छेडली जात होती. ‘माझे माहेर पंढरी…’ हे गाणे चालू होते. गाणारा तल्लीन होऊन गात होता. ताल-सुरांची गफलत होत होती. पेटीवादक व तबलावादकाची गायकाची तान पकडण्याची केविलवाणी धडपड चालू होती. मात्र, गाणार्‍याला त्याची पर्वा नव्हती. तो तल्लीन होऊन गातच होता. त्याचा आवाज लयबद्ध नव्हता. गाण्याबद्दल त्याला कुठलेही शिक्षण नव्हते. गाण्याचे बोलपण मधेमधे हरवत होते. पण त्या भडस्या आवाजातही मिठास होती. प्रत्येकाच्या ओळखीचा तो आवाज होता. पुजेला, गाण्याच्या बैठकीला, भजनाला तो जायचा… अगदी न बोलविता जायचा. एकतरी गाण्याचा सूर आळवायचा. त्याची गाणीही ठरलेली – ‘माझे माहेर पंढरी’, ‘कैवल्याच्या चांदण्याला…’ वगैरे.
गवळण, भैरवी म्हणायलाही तो कधी लाजला नाही. ईश्‍वरचरणी लीन होऊन त्याच्याशी समरस होण्याची त्याची चढाओढ चालली होती. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर अशा अनेक संतांनी पांडुरंगावर भक्ती गेली. कवने, गाणी, ओव्या रचल्या. गावोगावी फिरत ही कवने गायली. ते सगळे गोड गळ्याचे होते का? ते संगीत शिकले होते का? अनंत प्रश्‍न समोर उभे राहतात. आपणही स्वत:ला प्रश्‍न करतो. मात्र, उत्तर ठाऊक नसते. आजचे संगीतकार त्या गाण्यांना चाली लावतात. गायक – गायिका ती गाणी गातात. गाणे अमर होऊन जाते. गाणी रचणारा गोड गळ्याचा होता का? कुणी विचारत नाही. देवाची भक्ती करणार्‍याला गोड गळ्याची काय गरज? केवळ गोड गळ्याच्याच गायकांनी गाणी म्हणायची, इतरांनी नव्हे? पण हा भडस्या आवाजात गाणारा गोड हृदयाचा नक्की होता हे त्रिवार सत्य होते.
असा हा माणूस होनहार होता. दिलखुलास हृदयाचा होता. दिवस गेले. महीने गेले. वर्षे सरली. तो आपल्या आवाजात गातच राहिला. लोक त्याच्या गळ्यात मुलांचे हार घालू लागले. ते हार कुठून आणले जातात, त्याच्या गळ्यात ते कोण घालतो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला नाही. तो त्याची टिंगल उडवण्याची एक भाग असेल. मुद्दामच त्याला लोक गाणे म्हणायला लावायचे. तो आनंदाने गाणे गायचा. लोकांना क्षणिक आनंद लाभायचा… राक्षसी आनंद… कुणाचीतरी टर उडवायची व वर हसायचे. गाणे संपल्यावर तो वर्तमानात परतायचा. रडायचा… मोठमोठ्याने हसायचा. रस्त्याच्या बाजूला कुणाच्यातरी दुकानाबाहेर आपला पसारा मांडायचा. सकाळीच घेतलेल्या पेपरची पाने जमिनीवर पसरायचा. त्यावर आपली शेज करायचा. बाजूलाच दारूची बाटली ठेवायचा. एक एक कच्चा घोट घेत रहायचा. शेकलेल्या आपल्या हृदयाला जाळायचा. मी खिन्नपणे बघतच राहायचो. त्याच्या गाण्यावर लोक हसायचे. त्याच्या गाण्यात पंडितजींची तान, ताल हरवून जायची. त्याची स्वत:ची तान वेगळीच होती.
पूर्वी तो मंदिराशेजारीच राहायचा. देवाच्या नित्य आरती, शेजारती, धुपारती गायचा. मंदिरात नेहमीचे गायक कलाकार यायचे. अगदी माफक आवाजाचे, गोड गळ्याचे… त्यांचा आवाज त्याच्या आवाजात नाहिसा व्हायचा. गाणार्‍याबरोबर त्याची हमरीतुमरी झाली होती. ते गाणे सुरू करण्याअगोदर तो आपला सूर आळवायचा. खड्या आवाजात आपले गाणे सुनवायचा. ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू’ असे म्हणत तो त्यांच्याकडे बोट दाखवत हिणवायचा. पण कुणीही त्याला ललकारण्याचे धाडस कधी केले नाही. त्याला प्रतिउत्तर देण्याचे धाडस कुणी करत नव्हते. मग त्यांना क्षमा नसायची. त्यांच्या चक्क पुर्‍या घराण्याची गाथा तो भर बाजारात मांडायचा. आज तो नव्हता. वर्षापूर्वी तो वारला. ‘माझे माहेर पंढरी…’ हे गाणे पोरके झाले.
आज आषाढी एकादशी… विठूरायाचा दिवस… त्याची महती सांगणारी गाणी सुरू होती. गीतांची मैफल रंगलेली होती. कुणीतरी खड्या आवाजात गात होते – कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर… गायकाची तान, ताल, तबल्यावरचा ठेका, पेटीचे सुर चांगले जमले होते. पेटी – तबलावादकाला कसरत करावी लागत नव्हती. सगळे चांगले जमले होते. गाण्यात हृदयाची उणीव होती. गायक आपल्या गळ्यातून गात होता. गळा छान लागलेला होता. कुठेतरी गाण्यात एखादी जागा रिकामी भासत होती.
त्याच्या भडस्या आवाजात तान, ताल, लय नव्हती; पण हृदय होते. इथे सगळे काही होते – पण हृदय गायब होते. ऐकणारे कान लावून ऐकत होते. गाणे काही हृदयात उतरत नव्हते. त्याची आठवण उगाचच मनाला, हृदयाला जाळत होती. वाटत होते – तो असायला हवा होता. त्याचे असे अचानक जाणे मनाला भावले नव्हते. आठवणीची धार वाढली होती. आषाढी एकादशीचा दिवस, गाण्याची तान आसमंतात गुंजत होती. तो भोळा, बाभडा, पोरका पोरगा उगाचच मरून गेल्याची खंत वाटत होती. डोळे भरून आले होते.
…………..