महाराष्ट्र, हरियाणात आज मतमोजणी

0
80

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून कॉंग्रेसच्या हातून ही दोन्ही राज्ये हिसकावून घेण्यात भाजपाला यश मिळणार का या प्रश्नाचे उत्तर आज दुपारी दोन वाजेपर्यंत मिळणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना – भाजपची युती व कॉंग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी तुटल्याने सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे बहुतेक मतदारसंघांत बहुरंगी लढती झाल्या आहेत. त्यामुळे निकाल काय लागतो याबाबत तीव्र उत्सुकता आहे. हरियाणामध्ये प्रथमच भाजपाने निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला असून सत्ताधारी कॉंग्रेस आणि ओमप्रकाश चौटालांचा आयएनएलडी या दोन्ही पक्षांवर मात करण्यासाठी पक्षनेत्यांनी कंबर कसली आहे.
जवळजवळ सर्व निवडणूकपूर्व पाहण्यांनी व निवडणुकोत्तर पाहण्यांनी दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे निष्कर्ष जाहीर केलेले आहेत. हे निष्कर्ष कितपत खरे ठरतात ते मतमोजणीअंती स्पष्ट होऊ शकेल. दुसरीकडे भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी विविध नावे चर्चेत असून पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या स्वतः दावेदार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फटका कॉंग्रेसला बसेल या भीतीने पक्षनेते धास्तावले असून उद्या पक्षनेते राहुल गांधी निवडणूक निकालांवर नजर ठेवण्याऐवजी आंध्रच्या वादळग्रस्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
दरम्यान, काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत न मिळाल्यास त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार बनवावे असे मत मांडले.
‘कोणाचे फटाके फुटणार’ याची उत्सुकता शिगेला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील निकालाचे चित्र दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत स्पष्ट होईल.
कणकवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कणकवली कॉलेज एचपीसीएल हॉल येथे २३ फेर्‍यांमध्ये केली जाणार आहे. यावेळी १४ टेबलांवर एकावेळी मतमोजणी केली जाणार आहे, तर एक टेबल टपालाने येणार्‍या मतांच्या मोजणीसाठी असेल. एकूण २३ पूर्ण व एक अर्धी फेरी होणार असून त्यानंतर निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस उमेदवार नितेश राणे यांच्या विरुद्ध भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार अशी कडवी झुंज आहे. या लढतीत अपक्ष उमेदवार विजय सावंत यांनी मोठी चुरस निर्माण केली आहे. आमदार विजय सावंत कोणाचे मतदान आपल्या पदरात पाडणार त्यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. भाजप व कॉंग्रेसकडून चांगल्याप्रकारे प्रचाराच्या यंत्रणा राबविण्यात आल्या. ग्रामीण भागात मतदानादिवशी कॉंग्रेस व भाजप दोनच पक्षांचे बूथ सगळीकडे दिसून आले होते. बाकी पक्षांचे बूथ व कार्यकर्ते काही मर्यादित जागांवर दिसत होते. हा मतदार संघ गेली २९ वर्षे भाजपकडे आहे. विधानसभा निकालाला काही तासच शिल्लक असून भाजप आपला हा गड राखणार की कॉंग्रेस त्यांच्याकडून हा गड खेचून घेणार याची उत्सुकता शिगेला पोचली असून निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही पक्षांचे समर्थक आपापसात लाखो रुपयांच्या पैजा लावत आहेत. आपापल्या नेत्यांच्या विजयाचा विश्वास असल्याने पक्षांचे समर्थक नाक्यानाक्यावर चर्चा करताना दिसत आहेत. दिवाळीच्या आधीच निवडणुकीचे निकाल लागत असल्याने या दिवाळीत कोणत्या उमेदवाराचे विजयाचे फटके फुटणार आणि कोणाचे दिवाळे निघणार याची सार्‍यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.