महाराष्ट्रात ६४ %, हरयाणात विक्रमी ७५% मतदान

0
81

काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६४ टक्के तर हरयाणात आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी असे ७५.८ टक्के मतदान झाले. मतदारांनी कुणाच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे आता रविवार दि. १९ रोजी मतमोजणीच्या दिवशी समजेल.
महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांतून ८.३३ कोटी मतदारांनी हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात १३व्या विधानसभा निवडीच्या रिंगणात पक्षांचे व अपक्ष मिळून ४१०० उमेदवार आहेत. महाराष्ट्रात सकाळी मतदारांत उत्साह दिसून आला मात्र जसजसे उन वाढत गेले तसतसे कमी मतदार रांगांमध्ये दिसू लागले. अमळनेर व उस्मानाबाद येथे दोन मतदान केंद्रांवर मतदारांना केंद्रांबाहेर पैशांचे वाटप करण्यार्‍यांना ताब्यात घेण्यात आले.काही मतदारसंघांत तुरळक मारामार्‍या झाल्या. मतदान यंत्रांमध्ये बिघाडामुळे चार मतदारसंघांतील काही केंद्रांवर व्यत्यय निर्माण झाला. नक्षल प्रभावीत गडचिरोली भागांत दुपारी ३ वा. मतदान संपवण्यात आले. गडचिरोली काही बिगर आदिवासी गटांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कर्जत-जामखेड तालुक्यातील लोणी व मसुद गावांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला. विदर्भात काल सकाळपासूनच मोठा पाऊस पडू लागल्याने मतदानावर परिणाम झाला. मतदानाच्या ड्यूटीवर असताना एका पोलिसावर वीज पडून तो मृत्यू पावण्याची दुर्दैवी घटना घडली. बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, अभिनेत्री खासदार रेखा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार पूनम महाजन यांनी मुंबईत मतदान केले. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी, पूत्र आदित्य, नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे मतदारसंघात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह दादर मतदारसंघात मतदान केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ, पतंगराव कदम, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या केंद्रांवर मतदान केले.

भाजपला दोन्ही राज्यांत सर्वाधिक जागा : एक्झीट पोल
महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत भाजप हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरणार असल्याचे अनुमान एक्झीट पोल चाचण्यांनी वर्तविले आहे. दोन्ही ठिकाणी भाजप मोठा पक्ष असेल मात्र बहुमतापेक्षा थोड्या कमी जागा पक्षाला मिळतील, असे वर्तविण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेत असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष यांचा धुव्वा उडेल व शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असेही या चाचण्या म्हणतात. महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेत येईल, असेही अनुमान काढले आहे.
फक्त ‘टुडेज् चाणक्य’ चाचणीनुसार दोन्ही राज्यात भाजपला बहुमत प्राप्त होईल. महाराष्ट्रात २८८ जागेच्या विधानसभेत बहुमतासाठी १४५ जागांची आवश्यकता आहे.काही चाचण्यांचे निष्कर्ष असे – सी-व्होटर चाचणी : भाजप-१२९, शिवसेना ५६, कॉंग्रेस ४३, राष्ट्रवादी ३६, मनसे १२, इतर १२.
एसी नीलसन – भाजप १२७, शिवसेना ७७, कॉंग्रेस ४०, राष्ट्रवादी ३४, मनसे ५.
इंडिया टीव्ही – भाजप १२४ – १३४, शिवसेना ५१-६१, कॉंग्रेस ३८-४८, राष्ट्रवादी ३१-४१, इतर ९-१५. टुडेज् चाणक्य – भाजप १५१, शिवसेना ७१, कॉंग्रेस २७, राष्ट्रवादी २८, मनसे ११.
दरम्यान, हरयाणात टुडेज चाणक्य चाचणीनुसार भाजपला ५२, इंडियन नॅशनल लोकदलला २३, कॉंग्रेसला १० व इतरांना ५ जागा मिळतील.
महाराष्ट्रात गेल्या विधानसभेत भाजपच्या ४७, शिवसेनेच्या ४५, कॉंग्रेसच्या ८२, राष्ट्रवादीच्या ६२ तर मनसेच्या १२ जागा होत्या. हरयाणात कॉंग्रेसकडे ४०, भाजपकडे ४, इंडियन नॅशनल लोक दलकडे ३१ आणि एचजेसीकडे ६ व इतरांकडे ९ जागा होत्या.
हरयाणात मतदारांकडून विक्रम
हरयाणात मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. राज्यात विधानसभेसाठी आतापर्यंतचे सर्वाधिक ७५.८ टक्के एवढे मतदान झाले. दरम्यान, यापूर्वीचे सर्वाधिक मतदान १९६७ साली ७२.६५ एवढे जाले होते, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. मतदानाची वेळ संपली त्यावेळीही केंद्रांवर लांब रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी आणकी वाढण्याची शक्यता आहे. २००९ साली ७२. २९ टक्के मतदान झाले होते. ९० मतदारसंघांत १ कोटी ६३ लाख १८ हजार ५७७ मतदारांनी हक्क बजावला. याठिकाणी १३५१ उमेदवार असून त्यात ११६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. काही तुरळक हिंसेचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.
काही मतदान केंद्रांवर काही लोक घुसल्याच्या तक्रारी झाल्या मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले. बारवाला येथे दगडफेक व मोटरसायकली जाळण्याचे प्रकार घडले. महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला. राज्यात १२ अनिवासी भारतीयांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले.