भावगर्भ मंदिरांचे माहेरघर ‘पट्टदकल’

0
941

– सौ. पौर्णिमा केरकर 

भारतीय स्थापत्त्यकलेच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक संपदेला विलक्षण कलाटणी देणारी मंदिरे कर्नाटक राज्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या कालखंडात उभी राहिली. भारतीय धर्म आणि संस्कृतीची यशोध्वजा अविरतपणे मनामनांत फडकत राहावी, जीवनाला नवनवीन प्रेरणा लाभावी म्हणून शिल्पकार-कारागिरांनी आपले संपूर्ण कसब पणाला लावून ही मंदिरे उभी केली. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या आराध्य दैवतांविषयीची भक्ती, प्रेम आणि आदर अभिव्यक्त करण्यासाठी मंदिरे उभारली. आजही या वास्तू या प्रदेशाच्या केवळ धार्मिक संपदेचेच दर्शन घडवित नाहीत तर या प्रदेशात समूर्त झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडवितात. अशीच एक जागा, जिथे गेल्यानंतर सांस्कृतिक संचितांची श्रीमंती थक्क करून सोडते, ती म्हणजे ‘पट्टदकल.’पट्टदकल हे गाव कर्नाटकातील इतर गावांप्रमाणेच अज्ञान, दारिद्य्र, अनास्था यांची वेदना ऊरी घेऊन जीवनमान उंचाविण्यासाठी धडपडणारे. गावाचे असे विदारक चित्र एका बाजूला दिसत असले तरी तेथील एकापेक्षा एक सुंदर-सरस मंदिरांमुळे आज हा गाव जागतिक वारसास्थळांच्या लौकिकास पोहोचलेला आहे. या स्थळाला भेट देणार्‍या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांमुळे सर्वसामान्य कष्टकरी जिवांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. वरवर पाहता ही जागा कोरडी, शुष्क वाटते. परंतु इतिहास- संस्कृतीच्या परंपरेला तिने मोठ्या कलात्मकतेने, लडिवाळपणाने आपल्या उदरात जतन करून ठेवलेले आहे.
बेळगाव ते बागलकोट या राजमार्गावरती वसलेल्या पट्टदकल या गावाला इथल्या मंदिरांनी लौकिक मिळवून दिला. बदामीपासून दहा मैलांवर मलप्रभा नदीच्या काठी वसलेला पट्टदकल बदामी चालुक्याच्या कारकिर्दीत दुय्यम राजधानी होती. बदामी चालुक्य राज्यकर्ते धर्मपरायण व संस्कृतीअभिमानी, त्यामुळे त्यांनी आपल्या आराध्य दैवतांची मंदिरे उभारली. उत्तर-दक्षिण मंदिरशैलीचा संगम जणू काही या मंदिरांतून प्रथमदर्शनीच अनुभवता येतो. त्यामुळे लांबून या मंदिरसमुहाकडे नजर गेली की एक क्षण वाटते, आपण खजुराहोला तर पोहोचलो नाही ना? पट्टदकल म्हणजे ‘सिंहासनाची शिळा’ असे म्हटले जाते. अभ्यासकांच्या दृष्टीतून पर्यटनाचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा या नावातील सत्यता पटते. संगमेश्‍वर, विरुपाक्ष, मल्लिकार्जुन, पापनाथ या मंदिरांतील शिल्पकलेचे दर्शन प्रेक्षकांना अपूर्व सुखाचा ठेवा देणारे आहे. इ.स. आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्य राजा विजयादित्य यांनी संगमेश्‍वर मंदिराची उभारणी करून पट्टदकल येथील मंदिरसंस्कृतीचा पाया रचला. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी त्याच्यावरती कळस चढविला. विक्रमादित्य दुसरा हा चालुक्यांचा महापराक्रमी राजा. त्याने पल्लवाची राजधानी कांची जिंकून घेतली. आपणाला जे यश लाभले त्यामागे परमेश्‍वरी अधिष्ठान आहे याची जाणीव विक्रमादित्याला होती. त्यासाठी आपल्या महाराण्या लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी यांच्यासाठी विरुपाक्ष व मल्लिकार्जुन यांची मंदिरे उभारली. पट्टदकल येथील मंदिराची उभारणी करताना तत्कालीन कारागिरांनी नागर व द्राविड या दोन्ही पद्धतीची मंदिरे इथे उभी केलेली आहेत.
आज पट्टदकल गाव गतकालीन राजधानीचा लौकिक हरवून बसलेला असला तरी इथे असलेली मंदिरे या गावातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाच्या संपदेचे नयनरम्य दर्शन घडवितात. त्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत पट्टदकलचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. इथल्या वैभवशाली मंदिरांचे दर्शन घेतल्यानंतर एकेकाळी पट्टदकल येथे चालुक्य कालखंडात जी शिल्पशैली विकसित झाली ती लक्षात येते. बदामी चालुक्याचे आराध्य दैवत म्हणजे भगवान शिवशंकर, आणि म्हणूनच येथे शिवशंकर कोठे विरुपाक्ष, तर कोठे मल्लिकार्जुन, पापनाथच्या रूपातही वेगवेगळ्या रूपांतून आपल्याला भेटतो. मंदिरे जरी शिवाशी निगडीत असली तरीसुद्धा मंदिररचनेत कलात्मक वैविध्य जाणवते. पापनाथाच्या मंदिराचे शिल्पकाम द्राविड शैलीचे, तर शिखर नागर शैलीतील. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, पुराणे यांतील प्रसंगांचे कोरीवकाम केलेले आहे. शिखरांचाच विचार केला तर विरुपाक्ष मंदिर चौकोनी शिखर असलेले, तर मल्लिकार्जुनाचे शिखर गोलाकार रूपातील आपल्याला दिसते.
इतिहासात चालुक्य राजवटीचा कालखंड हा नेहमीच कला, संस्कृती, सौंदर्य, जीवनातली अभिजातता यांना उत्तेजन देणारा ठरलेला आहे. सुदृढ राजकारण, सर्वधर्मसमभावाची प्रेरणा, शांती, समृद्धी यांनी भरलेलं आणि भारलेलं सौहार्दपूर्ण वातावरण होतं. त्यामुळेच सामाजिक जीवन, शासनव्यवस्थेतील शिस्त, उत्कृष्ट प्रशासन आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक आणि कलात्मक दृष्टिकोन या मंदिरशिल्पांतून प्रतिबिंबित होताना दिसतो. कलेची आराधना जिच्या मनीमानसी भिनलेली होती, त्या त्रैलोक्यमहादेवी यांच्या मनस्वी इच्छेची पूर्ती म्हणजे ही शिल्पशैली. आठव्या शतकातील संगमेश्‍वराच्या मंदिरात तर राजा विजयादित्याने स्वतःला समर्पित केले होते. हे मंदिर पाहताना कोठेतरी काहीतरी अधुरे राहिले असे वाटत असले तरी आकाराने मोठे असलेले हे मंदिर सौंदर्यपूर्ण असेच आहे.
त्र्यैलोक्यमहादेवीप्रमाणेच लोकमहादेवी राणी ही कलासक्त मनाची होती. ‘विरुपाक्ष’ मंदिर नजरेत भरून घेताना तिची सौंदर्यानुभूती किती उच्च दर्जाची होती हे कळते. एका मोठ्या प्रांगणात नंदी, सुवर्णगंगा यांची प्रतिष्ठापना, तर खांबांवर असलेल्या कोरिवकामातून शृंगारिक जोड्यांची अदा अचंबित करते. द्वारपालाचे दरवाजावरील शिल्प आणि त्रिशूलधारण करून राहिलेला शिव यांचे वेगळेपण टिपत असतानाच रामायण, महाभारत, भगवतगीता या महाकाव्यांतील प्रसंगांशी, कथानकाशी निगडीत असलेल्या कलाकृती बघताना ही महाकाव्ये उलगडत जातात. या मंदिराला लागूनच असलेले आणखी एक महत्त्वपूर्ण मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. गजांतक, हरिहर, पंचतंत्र, रामायण, महाभारत विरुपाक्ष मंदिरांप्रमाणेच या मंदिराचे स्तंभसुद्धा याप्रकारच्या कथानकाच्या कोरिवकामाने भरलेले आहेत. विरुपाक्षाच्या दक्षिणेला असलेले ते पापनाथाचे मंदिर. इतर तीन मंदिरांची तुलना करता या मंदिरावरील कोरिवकाम कालौघात उद्ध्वस्त झालेले दिसते. असे असले तरी मंदिराचे मूळचे देखणेपण त्याच्या एकंदरीत रचनेतून दिसते. या सर्व महत्त्वाच्या मंदिरांबरोबरीनेच इतरही छोट्यामोठ्या मंदिरांनी हा परिसर भरलेला दिसतो. मुख्य चार मंदिरे, त्यांच्या आजूबाजूला असलेली काडसिद्धेश्‍वर, जबलिंग, गळगनाथ, काशिविश्‍वेश्‍वर ही मंदिरे तेवढ्यात कलात्मकतेने उभी असलेली दिसतात. या मुख्य मंदिरांचा जागतिक वारसास्थळांत समावेश केला गेला असल्याने त्यांची योग्य ती बडदास्त ठेवण्यात आलेली आहेच. सभोवताली दगडी कुंपण, आतील परिसरात संपूर्ण अंथरलेला हिरवागार गालिचा, वरती आकाशाचे ऋतुपरत्वे बदलणारे विभ्रम या पार्श्‍वभूमीवर ही मंदिरे उठावदार दिसतात. लांबूनही पाहताक्षणी इथे येणारा प्रत्येक पर्यटक त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. शेकडो वर्षांपासून इथे शिवारधना चालू होती. ते चैतन्य आणि धीरगंभीरता इथल्या वातावरणात भरून राहिलेली दिसते.
पट्टदकलमधील संरक्षित केलेली मंदिरे पाहून बाहेर पडलो की अवतीभोवती अशी खूपच लहानमोठी मंदिर विखुरलेली दिसतात. त्यांची उपेक्षित अवस्था पाहून वाईट वाटते. काही काही मंदिरे रचनेच्या दृष्टीतून एवढी आकर्षक आहेत की त्यांना नावच नाही. तर काहींचे गाभारेच उद्ध्वस्त स्थितीत आढळतात. शतकांची परंपरा असलेले हे सुंदर दस्ताऐवज ही एखाद्या राज्याची समृद्ध अवस्था असायला हवी. पट्टदकलच्या या मंदिरसमुहातून हा सशक्त, समृद्ध कलेचा वारसा पर्यटकांना, इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना, कलाकारांना आपल्याकडे खेचून घेत आहे. बदामी, पट्टदकल, ऐहोळे येथील शिल्पकला, मंदिरशैली जर घाईघाईनेच पाहायची असेल तर स्वतःच्या वाहनाने प्रवास करीत एक ते दीड दिवसात याचा अनुभव घेऊ शकतो, परंतु या मंदिरांच्या शिल्पशैलीशी, तेथील प्रत्येक स्तंभावर, भिंतीवर, छतावर कोरल्या गेलेल्या पौराणिक, ऐतिहासिक काळातील कथानकाशी जर समरस व्हायचे असेल तर मात्र त्यासाठी काही दिवस खासच राखून ठेवावे लागतील हे निश्‍चित. या स्थळाला धार्मिकतेचे, पावित्र्याचे, आध्यात्मिकतेचे वलय जरी लाभलेले असले तरी त्यातून पदोपदी जाणवतो तो आपला कलात्मक इतिहास. मानवी मनाला कलेची, सौंदर्याची असलेली ओढ ही उपजतच होती. त्याचाच आविष्कार वेगवेगळ्या शिल्पकलेतून, कोरिवकामातून आपल्यासमोर येतच राहतो.
आपली रोजची जीवनशैली तणावविरहित कशी राखायची, महाकाव्यातील विचारांच्या आधारे आपले जगणे, वागणे कसे परिपक्व करायचे व ही प्रगल्भतेची जाणीव ऊरी बाळगून स्वतःला कसे उन्नत करायचे याची शिकवण इथेच आपल्याला मिळते. अशी अगणित स्थळे आहेत जिथे गेल्यावर इतिहास आपल्यासोबत वावरताना दिसतो. त्यात डोकावताना तो कालखंड, ती माणसे, ती अभिजात कलासक्त मनोवृत्ती, विचारांची, कलेची, चैतन्याची खूण सदोदित आपल्याबरोबरीनेच राहते. म्हणून कोठे आपल्या मनाला मरगळलेपण आले, समस्यांची गुंतवळ वाढत राहिली की अशा जागा आपल्याला समाधान मिळवून देतात. जीव आणि शिव यांची भावगर्भ समरसता येथे नांदतानाचा आपल्याला अनुभव येतो.