भारत-पाक लष्कर भिडले; सीमेवर तणाव वाढला

0
95

४० भारतीय चौक्यांवर गोळीबार
जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर काल पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर तणाव वाढला. भारत-पाकिस्तानचे लष्कर भिडल्याने भीतीने सीमेलगतच्या हजारो लोकांनी घरदार सोडून पलायन सुरू केले आहे. पाकिस्तानच्या बाजूने होत असलेल्या गोळीबारात भारतीय लष्करानेही आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरू केले आहे.पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन चालूच असून काल ४० भारतीय चौक्या व सीमेवरील २५ छावण्यांच्या दिशेने गोळीबार व रॉकेटचा मारा केला. यात नऊ जण जखमी झाले. जम्मू सेक्टर तसेच पूंछ भागातील नियंत्रण रेषेकडे हा प्रकार घडला.
दरम्यान, शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मूच्या भागात काल लोकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार नारेबाजी केली.
भारतीय लष्करानेही चोख प्रत्यूत्तर दिल्याचे प्रवक्त्याने सांगितले. काल दुपारी २.३० वा. सुरू झालेला गोळीबार रात्री उशीरापर्यंत पूर्णपणे थांबला नव्हता.
भारतीय अधिकार्‍यांच्या आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या सीमेवरील गोळीबारामुळे आतापर्यंत सुमारे २० हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. परवा, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात पाच नागरिक ठार झाले होते. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे इस्लामाबादमध्ये पाकिस्तानने भारतीय लष्करावर चिथावण्याचा आरोप करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षक पथकाकडे तक्रार नोंदवली आहे.