‘बेळगाव मार्ग’ अधिवेशनाच्या निमित्ताने…

0
96

– गुरूनाथ केळेकर
प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी नागरिकांची इच्छा असते, पण ते शक्य नसते. किमान परिसर स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण, शिस्त, बंधुभाव जोपासणे हे नागरिकांच्या हाती आहे. याबाबत त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. हे काम गोव्यात ‘गोवा मार्ग’ ही समाजसेवी संघटना गेली पंधरा वर्षे करीत आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन बेळगावात दोन वर्षांपूर्वी ‘बेळगाव मार्ग’ या संघटनेची स्थापना झाली.
बेळगाव शहराची लोकसंख्या वाढली. त्याचबरोबर वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे, पण अपवाद वगळता बहुतांश रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे रहदारीची समस्या अत्यंत तीव्र बनली आहे. बेळगाव शहरात सात रेल्वेे गेट आहेत व रेल्वे जाण्या-येण्याच्यावेळी प्रत्येक गेटवर रहदारीची कोंडी होते. वाहने व्यवस्थित उभी केली जात नाहीत. अशातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेले असल्यामुळे नागरिकांना पायी चालत जाणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त कचरा टाकण्यात येत असल्यामुळे अस्वच्छता निर्माण होते. रस्त्यांवरील आपली वर्तणूकसुद्धा बर्‍याचवेळा अयोग्य असते. वृक्षांची प्रचंड तोड केल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. प्लास्टिकचा वापरही बेसुमार वाढला आहे. काम झाल्यावर हे प्लास्टिक बर्‍याचवेळा गटारामध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे गटारे तुंबतात. सांडपाणी रस्त्यावर येते व सर्वत्र दुर्गंधी पसरते. यामुळे रोगराई पसरते. याबाबी टाळणे हे आपल्या हातात असते. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचे काम बेळगाव मार्ग आपल्या परीने करीत असते.
गोवा व बेळगावचे संबंध हे अतिशय घनिष्ट आहेत. पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करण्यासाठी जो अभूतपूर्व लढा झाला, त्याचे केंद्र हे बेळगाव शहर होते. देशभरातून आलेल्या सत्याग्रहींना गोव्याच्या हद्दीपर्यंत नेऊन सोडण्याचे काम बेळगावच्या कार्यकर्त्यांनी केले. इथेच नव्हे, तर प्रत्येक घरातील महिलांनी सत्याग्रहींना शिदोरी बांधून दिली. पोर्तुगीज पोलीसांच्या गोळीबारात जखमी झालेल्यांना बेळगावात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असत. दोन वर्षांपूर्वी गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बेळगावात तत्कालीन गोवा सरकारच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. ‘बेळगाव मार्ग’ ने हा सोहळा साजरा करण्यात पुढाकार घेतला होता. बेळगावचे व गोव्याचे असे दृढ नाते आहे. ते दिवसेंदिवस बळकट होत आहे.
आजही खरेदीच्या निमित्ताने, आठवडाभराचा शीण घालवण्यासाठी गोव्याचे नागरिक मोठ्या संख्येने बेळगावला येत असतात. तसेच बेळगावचे नागरिकही गोव्याला येत-जात असतात. या पुढच्या काळात बेळगाव व गोव्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्यासाठी बेळगाव मार्ग प्रयत्नशील राहणार आहे.
‘बेळगाव मार्ग’चे पहिले अधिवेशन दि. २३ व २४ ऑगस्ट २०१४ असे दोन दिवस भरणार आहे. गोव्याचे वाहतुक संचालक अरूण देसाई यांच्या हस्ते या अधिवेशानाचे उद्घाटन होणार असून बेळगावच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. मिसाळ हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी बेळगावचे महापौर महेश नाईक, खासदार सुरेश अंगडी, आमदार फिरोज सेट, आमदार संभाजी पाटील, आमदार संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून व ‘गोवा मार्ग’चे संस्थापक गुरूनाथ केळेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुसरे दिवशी रविवार दि. २४ रोजी सकाळी दहा वाजता होणार्‍या पहिल्या सत्रात ‘सुरक्षित रहदारी’ या विषयावर गोव्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई मार्गदर्शन करणार आहेत, तसेच ‘सार्वजनिक स्वच्छता’ यावर बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त आरोग्यअधिकारी डॉ. सतीश पोतदार, ‘नागरिकांचे कर्तव्ये’ यावर बेळगावचे कायदेतज्ज्ञ माधवराव चव्हाण व गोव्याचे निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांची भाषणे होणार आहेत. त्यानंतर मराठी, कन्नड, हिंदी व कोंकणी कवींचे बहुभाषिक कविसंमेलन होणार आहे.
सायंकाळी होणार्‍या समारोपप्रसंगी गोव्याचे वाहतुकमंत्री सुदिन ढवळीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. बेळगावच्या चव्हाट गल्लीतील जालगार मारूती मंगल कार्यालयात हे अधिवेशन होणार आहे.
‘मार्ग’ चे पंचशील
१. आम्ही रस्ता रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळू
रस्त्याने कसे चालावे, वाहने कशी चालवावीत, रस्त्यावर वाहने कुठे थांबवावीत यासंबंधी कायदे कानून आहेत. अनेकांना रस्त्यावरून कसे चालावे हे कळत नाही. अनेकजण वाहने चालवतात, पण वाहतूक नियमांकडे लक्ष देत नाहीत. आपणास गाडी चालवता येते यात आनंद मानताना वाहने काळजीपूर्वक चालवली पाहिजेत. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत.
२. आम्ही रस्ते स्वच्छ व मोकळे ठेवू
आपण जिथे दैनंदिन व्यवहार करतो, तिथे कचर्‍याचे ढीग तयार होतात. बरेच लोक विचार न करता हा कचरा रस्त्यावर फेकतात. कचरा असा रस्त्यात टाकण्याऐवजी कचराकुंडीतच टाकला तर साफसफाईवरील कितीतरी खर्च वाचेल. रस्त्याचा नैसर्गिक विधीसाठी दुरूपयोग होतो. काहीजण पान खाऊन थुंकतात, काहीजण लघवी करतात. खरे नागरिक कधीच या गोष्टी करणार नाहीत.
३. आम्ही रस्त्यावर ध्वनी प्रदूषण होऊ देणार नाही.
आपला आनंद आणि उत्साह आपण गोंगाट करून प्रकट करीत असतो. ध्वनीप्रदूषणामुळे कानांच्या पडद्यावर परिणाम होत असतो. मेंदूची सहनशक्ती कमी होते. चित्त स्थिर राहत नाही. घरी वडील किंवा आजारी माणसे असतात, त्यांना त्रास होतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
४. आम्ही मार्ग सुंदर व सुशोभित ठेवू
आपले रस्ते सुंदर व सुशोभित दिसावयास हवेत. गावातील रस्ते अरुंद असतात, पण हिरवाईने नटलेले असतात. तेथून जाताना कसे प्रसन्न वाटते! याउलट शहरी रस्त्यांचा गैरवापर होत असतो. अतिक्रमणे होतात, रस्ते गलीच्छ व विद्रुप करून टाकतात. खरे नागरिक रस्त्यांच्या टापटिपीकडे लक्ष देतील.
५. आपण रस्त्यावरील व्यवहार सभ्यतेने करू
रस्ते आपली ओळख करून देतात. आपल्या संस्कारांची पारख करता येते. आपण चांगला पेहराव केला, मस्त खाणेपिणे केले म्हणजे सार्वजनिक जीवन सुधारणार नाही. जवळच्यांविषयी कळकळ, दुसर्‍याचा आदर करण्याइतपत नम्रता, स्वच्छतेची आवड, शांततेने व्यवहार करण्याची गोडी या आपल्या संस्कारिततेच्या खुणा आहेत
‘मार्ग’ च्या पंचशिलाचे काटेकोरपणे पालन करून इतरांपुढे एक आदर्श ठेवूया.