बिबट्या-मानव संघर्ष (?) व्यवस्थापन हवे!

0
619

 – नीला भोजराज

श्रीमती विद्या अत्रेय यांच्या म्हणण्यानुसार मुळात खरंच मानव आणि बिबट्या यांच्यामध्ये संघर्ष आहे का? संघर्ष हा शब्द नकारात्मक अर्थाचा आहे. त्याऐवजी संवाद हा शब्द वापरणे योग्य होईल असे त्या म्हणतात. कारण जोपर्यंत या पृथ्वीवर मानव आणि प्राणी आहेत तोपर्यंत त्यांच्यात संवाद होतच राहणार. पण मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी त्याचा बागुलबुवा बनवल्यामुळे याविषयी चर्चेला उधाण आले. वन्य प्राणी मानवाला शत्रूसमान वाटू लागले. पण प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही. 

मुख्य प्रश्‍न असे आहेत – या बिबट्या वाघांनी कुठे राहावयास हवे? त्यांचा आहार कोणता? आपला आवाज ते कशाला ऐकतील? हे प्रश्‍न अनुत्तरित राहतात. मुंबईचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, गुजरात, महाराष्ट्र या भागात बिबट्यांचे अस्तित्व लोकवस्तीत आढळून आले. मुख्यत्वे कुत्रे, डुक्कर, मांजरी आणि बकर्‍या हे बिबट्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यांना खाण्यासाठीच ते लोकवस्तीत दचकून प्रवेशतात. म्हणून लोकांचा गैरसमज आहे की ते माणसांना खायला येतात. पण हे साफ चूक आहे.
लहान गावातले लोक बिबट्याच्या सहवासात वावरत असतात. उसाच्या शेतात बसलेल्या स्त्रियांच्या समूहाजवळच पिकाच्या आड लपलेला बिबट्या दिसत नसल्यामुळे त्या बिनधोकपणे तिथे गप्पा मारीत बसलेल्या दिसतात. तसेच बिबट्यांची पिल्ले अनेकदा उसाच्या शेताच्या आसपास बघायला मिळतात. आणि पिल्लू असले म्हणजे जवळपास त्यांची आई असतेच. या प्राण्याला कुटुंबात राहायला आवडते. ते दिवसभर आपल्या घरातून सहसा बाहेर पडत नाहीत. त्यांच्या घरात एक नर बिबट्या असतो व ३-४ मादी बिबट्या असतात. पिल्ले एकदा १२-१३ वर्षांची झाली की त्यांना घरातून बाहेर काढले जाते. मग ते स्वतःसाठी जागा शोधतात आणि आपल्या खाण्याची व्यवस्थाही स्वत:च करतात. त्यावेळीच ते पकडले जातात. सामान्यपणे रात्रीच ते आपले खाद्य शोधण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडतात.
श्रीमती अत्रेय यांनी अशा बिबट्यांना पकडण्यासाठी मायक्रोचिप्सचा उपयोग केला. त्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधून त्यामध्ये मायक्रोचिप्स, सीमकार्ड ठेवायचे म्हणजे ते कुठे आहेत त्याचा पत्ता कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपल्याला कळतो व त्यांना पकडणे सोपे होते. त्यांचे म्हणणे असे आहे की भारताची लोकसंख्या भरपूर आहे. त्यामुळे इथे लोकवस्ती घनदाट आहे. त्यामानाने बिबट्यांची संख्या बरीच कमी आहे. १० किलो मीटरच्या पट्‌ट्यात फक्त पाच वाघ सापडतात. ते ४० % कुत्र्यांना फस्त करतात व १० टक्के मांजरींना खातात. आत्तापर्यंत उसाच्या शेतामधील कुणाचाही मृत्यू बिबट्यांने हल्ला करून खाल्ल्यामुळे झाल्याचे ऐकिवात नाही. ते उसाच्या शेताजवळ बसलेले असतात; पण तेथील लोकांना काडीचाही धक्का लावत नाही. बकर्‍यांना सुद्धा ते फारसे खात नाहीत.
युरोप आणि अमेरिकेत कमी लोकसंख्या असूनही ते बिबट्यांना मारून टाकतात. पण भारतात आपण इतर विभागातल्या सर्व लोकांची मदत घेऊन त्यांच्यावर नियंत्रण आणू शकतो. त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करायला हवे. मुंबईत यावर बर्‍यापैकी कार्य झाल्यामुळे संजय गांधी उद्यानातील बिबट्यांची संख्या आता बरीच कमी झाली आहे.
बिबट्या – मानव संघर्ष – व्यवस्थापनाचे मुद्दे
१. लोकांमध्ये चांगले संबंध असणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना याबद्दल ज्ञान देऊन त्यांच्यामध्ये जागृती करणे गरजेचे आहे. म्हणजेच त्यांचे सहकार्य याकामी मिळेल.
२. बिबट्यांचा कधीही पाठलाग करू नये. त्यांचा पाठलाग केल्यास ते वैतागतात. पहिल्यापेक्षा आता त्यांची संख्या बरीच कमी झालेली आहे. आपल्याकडील प्राण्यांना जर आपण सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि लहान मुलांचा त्यांच्यापासून बचाव केला तर त्यांचा उपद्रव आपल्याला होत नाही. बिबट्यांना पकडण्यासाठी आपण संबंधित लोकांना सहकार्य केले तर त्यांच्यापासून आपल्याला कोणतीही भीती उरणार नाही.
३. काही ठिकाणी जसे हिमाचल प्रदेशात मेलेल्या वाघाला स्त्रिया कुंकू लावतात. गावातील लोक त्याची पूजा करतात. दुर्गेचे वाहन समजून काही ठिकाणी त्यांची पूजा केली जाते. गोव्यातही वेळीप समाजाचे लोक वाघोबाची पूजा करतात.
हे सर्व ऐकल्यावर असे दिसून येते की बिबट्यांपासून मानवाला कुठलेही भय नाही. ते माणसांना खात नाहीत. कुठेही त्यांचे अस्तित्व आढळल्यास वनखात्याला किंवा संबंधित व्यक्तीला कळवून त्यांना पकडण्यासाठी लोकांनी सहकार्य केले पाहिजे.
…………..