पोलिसांच्या पारदर्शक कारभारासाठी प्रत्येक पोलीस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा

0
95

पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांची माहिती
तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकावर जाणार्‍यांशी पोलिसांचे कसे वर्तन असते, याची माहिती मिळावी, तसेच अन्य सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देऊन ऑक्टोबर अखेरपर्यंत गुन्हेगारी जाळे पद्धती (क्रिमिनल नेटवर्क सिस्टम) विकसित करणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महारनिरीक्षक सुनील गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
दरमहा निरीक्षक-नागरिक सुसंवाद बैठक
वरील यंत्रणा देशातील सर्व पोलीस स्थानकांना जोडली जाईल. त्यामुळे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे गर्ग यांनी सांगितले. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना दरमहा ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील अन्य चांगल्या घटकांना बोलावून बैठका घेण्यासही सांगितले आहे.
अधीक्षक, उपअधीक्षकांना पोलीस स्थानकभेटीची सूचना
पोलीस स्थानकावरील अधिकार्‍यांच्या कारभारावर वचक राहावा व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी पोलीस अधीक्षक व उपअधीक्षकांना प्रत्येक दिवशी किमान एका पोलीस स्थानकाला भेट देण्याची सूचना आपण केली आहे. पोलीस अधीक्षक जनतेपर्यंत पोचला पाहिजे, असे गर्ग म्हणाले.
भविष्यात ई-चलन
सरकारने २ ऑक्टोबरपासून महामार्गावर हेल्’ेट सक्ती निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, असे सांगून भविष्य काळात वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना ई-चलन देण्यास सुरुवात करतील, अशीही माहिती त्यांनी दिली. ई-चलन देण्यासाठीची प्रक्रिया चालू आहे.
ब्लॅकमेल करणार्‍या युवतीला अटक
सायबर गुन्हे नियंत्रण कक्षही बळकट करण्यात येणार असून या विभागाकडे अनेक प्रकरणे असतात, असे सांगून दोन अल्पवयीन बालिकांचे बनावट अश्‍लील फोटो तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील एका संशयित युवतीला (२२) अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. या संशयिताने फेसबुकवर ८ खाती उघडली होती. सकाळच्या वेळीच फेसबुकवरून संदेश पाठविण्याचे काम ती करीत होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी काणकोण व केपे पोलीस स्थानकांवर गुन्हे नोंदविले होते. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी गेलेल्यांना उडवा उडवीचे प्रश्‍न विचारणार्‍या, गैरवर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे गर्ग यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
१७०९ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई
कांपाल अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या १७०९ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पो. अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.