पोर्तुगीज वकालतीच्या महोत्सवात मराठीची दखल

0
102

सेमाना-द-कल्चरा इंडो पोर्तुगीजामध्ये (गोवा) यंदा मराठी संस्कृतीची दखल घेण्यात येणार असून मराठी रंगभूमी व विशेष करून संगीत नाटकांना उत्तेजन देण्यासाठी विशेष कार्य केलेले रंगकर्मी रामकृष्ण नाईक यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे या महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष जुझे एलमानो कुएलो पेरेरा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यातील पोर्तुगीज वकालत या महोत्सवाची प्रमुख आयोजक आहे.येत्या २ रोजीपासून हा महोत्सव सुरू होत आहे. उद्घाटनाच्या सत्रात ‘भारतीय संस्कृती आज व उद्या’ या विषयावर यावेळी चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. कोकणीबरोबरच मराठी ही सुध्दा गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून राहिल्याने यंदा प्रथमच या महोत्सवात मराठीला स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त यंदा लघु कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून मराठी, कोकणी, इंग्रजी व पोर्तुगीज या भाषांतून कथा सादर करता येणार आहे.
त्याशिवाय सृजनात्मक लेखन या विषयावर एका कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. लघुकथा लेखन स्पर्धा कामोईश इन्स्टिट्युटो-द- कुपरकाव-इ-दा- लिंगवा पोर्तुगीजतर्फे घेण्यात येणार आहे. ती २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान होईल. ९ रोजी पारंपरिक पोर्तुगीज संगीत असलेल्या ‘फादो’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून ही स्पर्धा इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार आहे. त्याशिवाय १२ ते १४ डिसेंबर या दरम्यान मॅकेनिज पॅलेस येथे ल्युसोफोनिया फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय २२ ते २३ या दरम्यान ताळगाव येथील सभागृहात संगीत व अन्न महोत्सव होणार आहे.
पोर्तुगीज दूतावास, क्लब वास्को-द-गामा, क्लब नासोनिएल, हार्मोनिया क्लब, इंडो पोर्तुगीज फ्रेंडशीप सोसायटी, फुंदासांव ओरिएन्ट, इन्स्टिट्युट कामोईश व बीपीएस क्लब यानी या महोत्सवासाठी मदतीचा हात दिला आहे, असे पेरेरा यांनी सांगितले. यावेळी कौन्सुल जनरल ऑफ पोर्तुगीज डॉ. रुई कार्व्हालो बसैरा हेही हजर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतीय व पोर्तुगीज संस्कृती ही खूप श्रीमंत असून त्यांना मोठा वारसा आहे. गोव्याची स्वत:ची अशी एक वेगळी अस्मिता व संस्कृती असल्याचे सांगून तिचे दर्शन घडवणे हा या महोत्सवामागील उद्देश असल्याचे त्यानी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला उद्योजक अनिल खंवटे हेही हजर होते.