पेट्रोल-डिझेल २ रु. स्वस्त

0
90

पेट्रोल दरात रु. २.४१ प्रति लिटर तर डिझेल दरात रु. २.२५ प्रति लिटर कपात करण्याचा निर्णय तेल महामंडळातर्फे काल घेण्यात आला. हे दर काल शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू झाले. पेट्रोल दरातील ही ऑगस्टपासूनची सहावी कपात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांच्या पार्श्वभूमीवर हा दरांचा आढावा घेण्यात आला.

डिझेल काही दिवसांपूर्वी सरकारने नियंत्रणमुक्त केले होते. पेट्रोल आधीच सरकारी नियंत्रणातून मुक्त आहे. दरम्यान, डिझेलसाठी विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये १५ पैसे/लिटर वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
पेट्रोलचे दर आता दिल्लीत ६६.६५/लिटरवरून ६४.२५/लिटर बनले आहेत. मुंबईत पेट्रोल रु. ७१.९१/लिटर मिळेल. दरम्यान, देशातले सर्वात जास्त उपयोगात आणले जाणारे इंधन डिझेल दिल्लीत रु. ५५.६०/लिटर वरून रु. ५३.३५/लिटर झाले आहेत. मुंबईत रु.६१.०४/लिटर दर बनला आहे.
डिझेल आपल्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने १८ ऑक्टोबरला घेतला होता. त्याच दिवशी डिझेल दरात रु.३.३७/लिटर इतकी कपात करण्यात आली होती. ती गेल्या पाच वर्षांतील पहिली कपात होती.
दरम्यान, घरगुती वापराच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर रु. १८.५ इतकी कपात करण्याचा निर्णयही महामंडळाच्या बैठकीत झाला. ऑगस्टनंतरची ही कपात आहे. अनुदानित सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर विकत घ्यावे लागतात.