नेपाळच्या विकासासाठी मोदींचा ‘हिट’ मंत्र

0
123
नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांना पुष्पगुच्छ प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

एक अब्ज डॉलर्स मदतीची घोषणा
नेपाळच्या विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या संविधान सभेला दिले. भारत-नेपाळ दरम्यानची सीमा दोन्ही देशांना जोडणारा पूल व्हावी असे ते म्हणाले. नेपाळला १ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे १० हजार कोटी नेपाळी रुपये) पतहमीच्या रूपाने मदत करण्याची घोषणाही मोदी यांनी केली. नेपाळच्या विकासासाठी ‘हिट’ फॉर्मुलाही त्यांनी सूचवला. ही भारतीय पंतप्रधानाची १७ वर्षांनंतरची नेपाळभेट होती.
मोदी म्हणाले की, नेपाळ विकसित राष्ट्र झाले पाहिजे. त्यासाठी मदत करायला भारत तयार आहे. विकासासाठी नेपाळने ‘हिट’ मंत्र आचरणात आणायला हवा असे ते म्हणाले. हिट म्हणजे एच-हायवे (महामार्ग), आय- इन्फॉर्मेशन वेज (माहितीचे रस्ते), टी- ट्रान्सवेज (दळणवळण) असे त्यांनी सांगितले.
नेपाळ हे सार्वभौम राष्ट्र आहे. देशाच्या अंतर्गत व्यवहारात भारत कधीच हस्तक्षेप करणार नाही. उलट नेपाळने एखादा निर्णय घेतल्यास तो पुढे नेण्यास भारत मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नेपाळच्या संसदेला संबोधित करणारे मोदी आतापर्यंतचे दुसरे परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत. याआधी १९९० साली जर्मन चान्सलर हेलमट कोहल यांना हा बहुमान देण्यात आला होता. मोदींनी सुमारे ५४ मिनिटे नेपाळच्या संविधानसभेला संबोधित केले.
तीन करारांवर स्वाक्षरी
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोयराला व पंतप्रधान मोदी यांनी तीन करारांवर स्वाक्षरी केली. यात ५६०० मे.वॅ. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्पाचे थांबलेले काम सुरू करण्याबाबतच्या कराराचाही समावेश आहे. दुसरा करार दुरदर्शन व नेपाळ टेलिव्हिजन यांच्यात भागीदारीसाठी असून तिसर्‍या करारान्वये भारत हा नेपाळच्या ग्रामीण भागात आयोडायज मीठाचे वितरण करण्यासाठी ६५ दशलक्ष रूपये मदत करणार आहे.