जलसफरींवर नियंत्रणासाठी समुद्र किनार्‍यांवर ‘किऑस्क’

0
125

परवा खणगिणी-बेतूल येथे जलसफरीसाठीची बोट बुडून तीन रशियन महिला पर्यटक बुडून ठार होण्याची जी दुर्घटना घडली त्या पार्श्‍वभूमीवर जलसफरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलसफरी होतात त्या किनार्‍यांवर एक गाळेवजा कार्यालय (किऑस्क) उघडण्यात येईल. तेथे पर्यटक खात्याचा एक प्रतिनिधी व जलक्रीडा संघटनेचा एक प्रतिनिधी असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.या जलसफरींचे योग्य प्रकारे आयोजन करण्यात येते की नाही. सुरक्षेसंबंधीची काळजी घेतली जाते की नाही. शुल्क आकारताना पर्यटकांची लुबाडणूक होत तर नाही ना या सगळ्या गोष्टींकडे ते लक्ष ठेवतील, असे परुळेकर यांनी सांगितले.
धोक्याची सूचना दिलेली असताना बोट जलसफरीसाठी निघाली होती. जलसफरींचे आयोजन करताना कोणती काळजी घ्यायला हवी त्यासंबंधी उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नाही.
दरम्यान, गोव्यात पर्यटन मोसम सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येत्या २ तारखेपासून युरोपी राष्ट्रांतून गोव्यात चार्टर विमाने येणे सुरू होणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. रशियातून यापूर्वीच चार्टर-विमाने येणे सुरू झाले असल्याचे ते म्हणाले.