छाप्याच्या वृत्ताने लोकमान्य पतसंस्थेच्या ठेवीदारांत घबराट

0
95

पैसे काढण्यासाठी गोव्यातही ठेवीदारांच्या रांगा
लोकमान्य मल्टिपर्पज संस्थेच्या गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शाखांवर आयकर विभागाने मंगळवारी छापे टाकल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर या पत संस्थेच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले. परिणामी काल आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी ठेवीदारांनी राज्यभरातील सर्व शाखांत रांगा लावल्या होत्या.
गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्यात अल्पावधीतच या सोसायटीने कोट्यावधींच्या ठेवी जमा करण्यास यश मिळवले होते. १८०० कोटी रु. पर्यंत या ठेवी आहेत. ही संस्था सर्वाधिक व्याज देत असल्यानेच ती अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय ठरली होती. या पत संस्थेवर परवा आयकर विभागाने छापे टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल बुधवारी गोव्यातील विविध शाखांमध्ये ठेवीदारांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
दै. तरुण भारताचे समूह प्रमुख किरण ठाकूर हे या संस्थेचे प्रमुख आहेत. संस्थेने गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात आपल्या शाखांची आकर्षक कार्यालये थाटली आहेत. अल्पावधीत १८०० कोटी रु.च्या ठेवी जमवण्यात या पत संस्थेला यश आलेले आहे. संस्थेने कर्मचारी भरतीही मोठ्या संख्येने केलेली आहे. मात्र, छाप्यांची बातमी येताच ठेवीदारांत घबराट पसरली.
दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँकातील ठेवीदारांना सरकारी विम्याचे कवच असते. त्यामुळे बँका बुडाल्या तरी ठेवीदारांचे नुकसान होत नाही. त्यामुळेच आर्थिक ज्ञान असलेल्या व्यक्ती जास्त व्याजाच्या आमिषाला बळी न पडता त्यापेक्षा कमी व्याजदर देणार्‍या व सुरक्षित अशा राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच पैसे ठेवणे पसंत करतात, असे एका अर्थ तज्ज्ञाने सांगितले.