चौदा हजार विद्यार्थ्यांना समुपदेशकांचा दिलासा

0
123

राज्यातील विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्षण महामंडळाने राबविलेल्या समुपदेशक नियुक्त करण्याच्या योजनेचा बराच फायदा झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात समुपदेशकांनी १४,४४७ विद्यार्थ्यांना हाताळण्याचे काम केले. त्यात आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या ५६ जणांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काल विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहरास उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.
मोर्ले-सत्तरी येथील दोन युवतींनी मांडवी, पुलावरून आत्महत्या करण्याचा केलेल्या प्रयत्नाप्रकरणी डॉ. सावंत यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रकरातून एका युवतीला जीवदान मिळाले आहे. तिची समस्या समजून घेण्याचे काम समुपदेशक करीत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. शिक्षण विकास महामंडळाला १०० समुपदेशकांची गरज होती. पात्र उमेदवार मिळणे कठीण झाल्याने आतापर्यंत ५५ उमेदवारांचीच नियुक्ती केल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. विनयभंग, बलात्कार, कुटुंबातील अडचणी अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.