गोमेकॉच्या खंडित वीज पुरवठ्याला आरोग्यमंत्री जबाबदार : राष्ट्रवादी

0
81

गोमेकॉत दोन दिवस वीजपुरवठा खंडित होऊन रुग्णांचे हाल होण्याची जी घटना घडली, त्याला आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेच जबाबदार असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
वीजपुरवठा खंडित झाला त्याला वीजखातेच जबाबदारी असल्याचा जो आरोप आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला आहे तो खोटा आहे. गोमेकॉला वीजपुरवठा करण्यासाठी बांबोळी उपकेंद्रावरून भूमीगत वीज वाहिन्या घालण्यात आलेल्या असून त्यात दोन समांतर केबल्सचा समावेश आहे. एका केबलमध्ये काही बिघाड झाल्यास दुसर्‍या केबलद्वारे वीजपुरवठा करता यावा यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे डिमेलो यांनी सांगितले. गोमेकॉ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी त्यांचे स्वत:चे उपकेंद्र आहे. गोमेकॉला वीजपुरवठा करणार्‍या फीडरमध्ये कोणताही बिघाड झालेला नसल्याचे वीज खात्याने स्पष्ट केले असल्याचे डिमेलो यांनी यावेळी स्पष्ट केले. गोमेकॉमधील सदर वीज उपकेंद्राची जबाबदारी पूर्वी पीडब्ल्यूडीच्या उपविभाग ४ व ५ कडे होती. आता ती एका खासगी एजन्सीकडे सोपवण्यात आलेली असून त्याचे कारण काय हे आरोग्य खात्याने स्पष्ट करावे अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे. दोन दिवस वीजपुरवठा नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. बर्‍याच रुग्णांवर होऊ घातलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलव्या लागल्या. पाण्याअभावीही रुग्णांचे हाल झाले. संडासात घाणीचे साम्राज्य पसरले आसे डिमेलो यांनी यावेळी सांगितले.
गोमेकॉत व दंत महाविद्यालयात प्रवेशासाठीच्या धोरणात पुन्हा पुन्हा बदल केले जात असल्याचा आरोपही डिमेलो यांनी यावेळी केला. निविदा काढून पुन्हा पुन्हा त्या पुढे ढकलण्यात येतात. गोमेकॉत रक्त घोटाळा होऊ लागलेला आहे व त्याला जबाबदार व्यक्तीची हकालपट्टी करण्यास ४८ तास लागल्याचे ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी शेवटी केली. दरम्यान, मडगाव येथे होऊ घातलेला ‘आतंकवादी गोंयात नाका’ या तियात्राचा खेळ काही लोकांच्या दबावामुळे रद्द करावा लागल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला असल्याचा आरोप त्यांनी केला.