गणेश चतुर्थी विशेष – स्वागत गणरायाचे

0
615

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर 

मंगलमूर्ती मोरया’ अशा गजरात दरवर्षी ज्या गणरायाचे स्वागत होते, त्याची आपण सारेच उत्सुकतेने वाट पाहत असतो. नावातच ‘मंगल’ शब्द असलेल्या गणेशाच्या आगमनाने वातावरणात पावित्र्य, मांगल्य याचं वास्तव्य भरून राहतं. येताना तो आपल्यासाठी घेऊन येत असतो आनंदाचा ठेवा, सुखशांतीचा- भरभराटीचा आशीर्वाद. संकटे नि चिंता तर याच्या आगमनानेच दूर पळून जातात.
सण-उत्सव हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संस्कृतीचा मूळ उद्देश आहे व्यक्तीला व त्याबरोबरच समाजाला धर्मपरायण व कर्तव्यनिष्ठ बनवणे. मानवात सामूहिकतेची भावना दृढ व्हायला मदत होण्याच्या दृष्टीने सण-उत्सव साजरे केले जातात. अशा ठिकाणी लोक एकमेकांना भेटतील, प्रेमाने बोलतील व त्यातून सामूहिकतेची भावना वृद्धिंगत होत जाईल या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाचा पाया रचला गेला. सामाजिक प्रबोधनाचे माध्यम या दृष्टीने हे सण सुरू झाले.
या गणपतीबाप्पाची येण्याची ही वेळ अगदी योग्य अशीच असते. श्रावणात घननिळा बरसून गेलेला असतो. सारी धरती ओलेती नववधू होऊन सजलेली- नटलेली असते, सारे वातावरण प्रसन्नतेने भरून गेलेले असते. त्यामुळे हे सारे उत्सव ‘मन करा रे प्रसन्न’ म्हणत, दारी दस्तक देत येऊन उभे ठाकतात.
श्रावणसरी परतीच्या वाटेवर असतात नि चाहूल लागते ती गणेशाच्या आगमनाची. गोव्यात त्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत होते. गोव्यातला गणेशोत्सव हा कुटुंबाचा एकत्र साजरा करायचा उत्सव असतो; व ही जी पूर्वापारपासून चालत आलेली प्रथा आहे ती ङ्गारच योग्य अशी आहे. या निमित्ताने आपल्या मूळ घराकडे त्या घरातल्या सर्वच नातेवाईकांचे, भाऊबंदांचे एकत्र येणे होते, एकत्र रहाणे होते. एकमेकांशी ङ्गोनवरून, वोट्‌सपवरून व लांबून संपर्कात असलेले नातलग यांची प्रत्यक्षात भेट झाल्याने, त्याचा एक वेगळाच आनंद होतो. साक्षात भेटीचा प्रसंग हा जास्त जवळीक निर्माण करणारा ठरतो. पोरांपासून थोरांपर्यंत सर्वजण गणेशाच्या तयारीला लागतात. बायकांनाही एकमेकींची मदत मिळते. नैवेद्य बनवणे, रांगोळ्या काढणे, दिवे, समया, आरत साङ्गसङ्गाई करून तयार करणे, गोडधोडाचे- करंज्या, मोदक बनवणे ही सारी कामे बायकांमध्ये वाटली जातात, तर सजावट करणे, माटोळी बांधणे, पताका लावणे, बाहेरून आणावे लागणारे सामान आणून देणे, ङ्गुले-ङ्गळे, पूजेचे साहित्य, ङ्गटाके आणून देणे ही कामे पुरुषमंडळी उचलतात. त्यात लहानग्यांची लुडबूड चालू असतेच. घुमट आरतीला त्यांचाच तर जोरदार आवाज असतो.
पाऊस उतरणीला लागलेला असतो त्यामुळे घरातले रंगकाम, साङ्गसङ्गाई करायला सुरुवात होते. गणरायाच्या नेहमीच्या मखराची रंगरंगोटी केली जाते, त्याला नवे रूप दिले जाते. पताका लावल्या नि मखर सजले की केव्हा एकदा मूर्ती घरी येते याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते.
तर तिकडे चित्रशाळेत मात्र कधीचीच लगबग सुरू झालेली असते. आता तर मूर्ती परदेशगमनही करू लागल्या आहेत. कारण आयटी इत्यादीतील नोकरीमुळे युरोप-अमेरिकेत आपले लोक पसरलेले आहेत. तेवढ्यासाठी भारतात येणे शक्य नसल्याने आपल्या लहानपणीचा गणपतीच्या सहवासाचा आनंद, आपल्या लहानपणीची आठवण आपल्या बायका-मुलांसह ते तेथेही अनुभवू पाहतात. अगदी मे महिन्यापासूनच तयारी सुरू होते. मूर्ती पूर्णपणे सुकल्याशिवाय रंगवता येत नाहीत. एकदा का पाऊस लागला तर ते अवघड जाते.
मला मुंबईला, दादर- शिवाजीपार्कला माझ्या बहिणीकडे गणपतीच्या मूर्तीचं घडवणं, रंगवणं, सजवणं हे सारं जवळून पाहायला मिळालं. गेल्या पासष्ट वर्षांपासून त्यांच्याकडे गणपती तयार करायची परंपरा चालत आलीय. चतुर्थीच्या दोन-अडीच महिने आधीपासून मूळ व्यवसाय बाजूला सारून गणपतीचे काम सुरू होते. पूर्वी मुंबईतच मूर्ती तयार करायचे, पण जागेअभावी आता ते शक्य नाही. शाडूच्या मूर्ती सुकायला काही दिवस लागतात. मुंबईत जागेची टंचाई. मग यादी तयार करून पेण, पनवेलच्या खेपा सुरू होतात. मूळ मूर्ती पेणहून आणल्या जातात. खास ऑर्डरच्या मंडळाच्या मूर्ती हाताने घडवल्या जातात, तर बाकी साच्यातून घडवतात. मूर्तीचा कोरीवपणा माती ओली असतानाच घडवला जातो. त्यासाठी लाकडी कोरण्या वापरल्या जातात. ठिकठिकाणच्या अवयवांचे कोरून पट्टीने ङ्गिनिशिंग केले जाते. त्यावरचं नक्षीकाम, दागदागिने बारकाईने कोरले जातात. निव्वळ मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती पेणहून येतात. मूर्ती गाडीतून आणणे, त्या नीट सुखरूपपणे उतरवून घेणे मोठे जिकिरीचे नि नाजुक काम असते. कुठे धक्का लागता कामा नये याची खबरदारी घ्यावी लागते. शिवाय मुंबईच्या ट्राङ्गिक प्रॉब्लेममुळे त्या मध्यरात्री वगैरे उतरून घ्याव्या लागतात. कारण बरेच वेळखाऊ व सावधानी घेऊन करायचे ते काम असते.
चित्रशाळेत स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्या रंगकामाला सुरुवात होते. पहिला पूर्ण पांढरा रंग दिला जातो, त्यावर बॉडी कलर दिला जातो. नंतर शेले, पितांबर वेगवेगळ्या रंगात रंगवले जातात. त्यावर थोडं शाईनिंगसाठी अभ्रकाच्या पाण्याचा ङ्गवारा मारतात. डोळे, गंध, सोंडेवरची नक्षी, कान सारं बारकाईने नाजूकपणे रंगवलं जातं. डोळे आखणी करणारा एखादा स्पेशल कारागीर असतो. डोळ्यातला जिवंतपणा ही त्याच्या हाताची कला असते. त्याला लिखाई म्हणतात. नंतर मुकुट, बाजूबंद, दागिने सोनेरी रंगाची पावडर वापरून रंगवले जातात. रंगांमध्ये गोंद वापरला जातो. शाडूच्या मातीत नारळाचा काथ्या मिक्स करून त्याद्वारे घट्टपणा, जाडपणा आणला जातो. काही ठिकाणी इकोङ्ग्रेंडली म्हणून कागदाच्या लगद्यापासूनही मूर्ती घडवल्या जातात. अशा मूर्ती परप्रांतीय लोक परदेशी नेण्यासाठी अथवा विसर्जन न करता कायमचे घरात ठेवण्यासाठी करतात. ही सर्व कामे रात्र रात्र जागून केली जातात. दिवसा कामावर जाऊन रात्री रंगकामाला येणारी हौशी कलाकार मंडळी आपली हजेरी लावतात. बहुतेक सर्व कलाकार मूळचे कोकण आणि गोवा या भागातीलच असतात. अंगच्या कलेबरोबरच गणपतीचे प्रेम त्यांच्यात उपजतच असते.
प्रत्येक भक्ताची वेगळी अशी मूर्तीची मागणी असते. कुणाला मोरावरचा, कुणाला उंदरावर बसलेला, कुणाला सिंहासनावर आरूढ झालेला, हरिणावरचा, गाईवरचा, सिंहावर बसलेला, तर कुणाला कमळातला, कुणाला सूर्यङ्गुलातला, कुणाला जास्वंदीच्या ङ्गुलातला, तर कुणाचा दरवर्षी ठरलेला त्याच पारंपरिक पद्धतीचा, कुठे पुणेरी पगडीतला, कुठे ङ्गेटेवाला, ठरलेल्या रूपातला म्हणजे दगडूशेठ, लालबागचा राजा, टिटवाळ्याचा गणेश, सिद्धिविनायक अशी मागणी असते. या गणेशाचे अनंत रुपांत दर्शन घडते ते इथेच. शंकर-पार्वतीसोबत मांडीवर बसलेला बालगणेश, नागाच्या ङ्गण्यावर उभा राहिलेला कृष्णाच्या रूपातला गणेश, सिंहासनाधिष्ट गणांचा गणनायक इत्यादी. यावर्षी त्यात आणखी काही नवी रुपं पाहायला मिळाली. साईबाबांच्या वेशात गणेश, मल्हारीमार्तंडच्या रुपात गणेश (सध्या याची टीव्हीवर सिरीयल चालू आहे म्हणून?) विठ्ठलाच्या पुढे माऊली गणेश, एवढेच नव्हे तर एक मूर्ती बाळ ठाकरेंच्या वेशातल्या गणेशाचीही होती. (ऑर्डर करणार्‍याला बहुतेक विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे तिकीट हवे असेल)
प्रत्येकाच्या भक्तिभावाप्रमाणे त्याचं रुपडं प्रत्येकाला भावत असतं. कुणाचा नवसाचा असतो, त्याच्या कानात भिकबाळीसाठी भोक पाडून ती घालून द्यावी लागते, तर कुणाच्या गणपतीला सोन्याचे तोडे घालायचे असतात म्हणून ती सोय करून द्यावी लागते. असा हा पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला भक्तीमय प्रपंच आहे.
मूर्ती न्यायलाही घरचे तीनतीन पिढ्यांतले आजोबा, मुलगा व नातू असे एकत्र दहा-बारा येतात. वाजत-गाजत नसले तरी निदान टाळ तरी वाजवत मूर्ती घरी नेतात. गणपतीची मूर्ती उचलताना मूर्तीच्या किमतीव्यतिरिक्त आपल्या मर्जीप्रमाणे रुपये अकरा किंवा एकवीस, पानसुपारी किंवा नारळासोबत ठेवून मगच मूर्ती उचलतात. मूर्तीच्या किमतीत घासाघीस केली जात नाही. ठरलेली किमत दिली जाते. त्या देवाधिदेव आनंदकंदाचे मोल तरी कसे ठरवावे?
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचे भरते, उल्हासाचा उमाळा. वर्षानुवर्षे हा असाच चालत आलेला उत्सव असला तरी त्यात कालानुरूप बरेच बदल घडत गेलेत. उत्सव साजरे करायच्या पद्धतीतही बदल झालेले दिसतात. लोकमान्य टिळकांच्या वेळची सामाजिक परिस्थिती व आताची परिस्थिती यात खूपच फरक आहे. त्यामुळे त्यांनी पारतंत्र्याच्या काळात ज्या विचाराने हा उत्सव सुरू केला तो विचार मागे पडत चाललाय. गणेशोत्सव आज सगळीकडे अगदी थाटामाटात साजरा होताना दिसतो. पण या साजरा होणार्‍या उत्सवात मोठमोठ्या गणेशमूर्ती, त्यासाठी वापरण्यात येणारी कृत्रिम माती, रासायनिक रंगांचा वापर त्यामुळे विसर्जनानंतरची प्रदूषणाची समस्या वाढतच चाललीय. शिवाय त्याबरोबर ध्वनिप्रदूषणाचा विळखा वाढू लागलाय. ङ्गटाके, ऑर्केस्ट्रा, दणादण मुझिक सिस्टीम, ढोल-ताशे आवाजाची तीव्रता वाढवतात. आज पुण्यात हजारोंच्या संख्येने ढोल-ताश्यांची पथके आहेत व ती या उत्सवात सक्रिय असतात. तारुण्याचा जोश आणि उन्माद व्यक्त करण्याचा गणेशोत्सव हा प्रसंग नव्हे हे या लोकांच्या लक्षात कोण आणून देणार? त्यांच्या अशा या गजराने कान बधीर होताहेत की काय असे वाटते. मोठ्यांची ही तर्‍हा तर लहान मुले, आजारी वयोवृद्ध माणसे यांना किती त्रास होत असेल? गोव्यात अजून इतका अतिरेक झाला नाही, पण व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी इकोङ्ग्रेंडली गणेशाची संकल्पना राबवली जावी यावर भर दिला पाहिजे. ज्या गणेशाने आपल्याला भरभरून निसर्गसंपत्ती दिलीय त्याचे जतन केलेच पाहिजे. मागल्या वर्षी मुंबईच्या एका नातेवाईकाने गणपतीच्या दिवसात ङ्गोन केला होता- ‘काय म्हणतोय तुमचा गणपती?’ तेव्हा मी म्हटलं, ‘तो म्हणतोय इथं गोव्यात मला जरा शांतपणे आरामात राहता येतं. त्या शहरांत- पुण्या-मुंबईला जाऊच नये असं वाटतंय असे म्हणतोय! तेव्हा बघा तुमच्याकडे नुसत्याच मोठमोठ्या मूर्ती आहेत पण गणपती यायला तयार नाही. ते म्हणाले, ‘तेही खरंच आहे.’ ‘या उत्सवाच्या नावाखाली जो काही गोंगाट, गडबड, नकली डेकोरेशन, प्लास्टिकच्या वस्तू, थर्मोकोल यांचा वापर या गोष्टींमुळे देवाला काय, आपल्यालाही तो नकोसा वाटू लागलाय. पण कुणा एकट्याने असा विचार करून भागणार नाही. सर्वांनीच एकमताने ठरवलं तरच काही होऊ शकेल. आपल्या निसर्गाचा आपणच समतोल राखायला हवा व तो राखता आला नाही तर निदान त्यात वाईट घटकांची भर तरी घालू नये.’ त्यांनाही ते पटलं होतं. मूळ उद्देशापासून दूर भरकटत चाललोय याचं भान यायला हवं.
गणपतीची भक्तिभावाने केलेली पूजा म्हणजे त्याच्या सर्वांगसुंदर रूपगुणांचं चिंतन, मनन करणे. याचं बालपणीचं रूप म्हणजे बालगणेश जो आईला ब्रह्मांडाइतकं थोर मानतो, तिलाच प्रदक्षिणा घालून तो पृथ्वीचा मान आईला प्राप्त करून देतो अशी मातृप्रेमाची अगाध महती दाखवून देतो. गणांचे योग्य आधिपत्त्य करून जो गणाधिपती झाला, आपल्या बुद्धिमत्ता प्राबल्याने ज्याला प्रथम पूजनाचा मान प्राप्त झाला, अशा बुद्धिवान दैवतेची पूजा व्हायला हवी. आपल्या माता-पित्याला परमपूज्य मानणार्‍या या पुत्राची पूजा व्हायला हवी. देवांना मदत, दानवांना शिक्षा देऊन जगताचे पालन करणार्‍या सुखकर्ता दुःखहर्ता अशा गणेशाचे पूजन व्हायला हवे. विघ्नांचा नाश करून सर्व चिंता दूर करणार्‍या चिंतामणीचे पूजन व्हायला हवे व ते करायला मनापासून केलेली प्रार्थनाच पुरेशी आहे; थाटामाटाची गरज नाही!
गोव्यात जास्त करून दीड किंवा पाच दिवसांचा गणपती असला तरी ‘शॉर्ट ऍण्ड स्वीट’ असं त्याचं वर्णन करता येईल. पण बाहेरगावाहून आलेले कामकरी, नोकरदार यांच्या सुट्टीचेही नेमकेच दिवस असल्याने त्यांना परतीचे वेध लागायला लागतात. त्यांच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरते. परगावाहून, परदेशातून आलेली ही पाखरे परत आपापल्या घरट्याकडे परतू लागतात. आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत दिवस कसे भराभर निघून गेले कळतही नाही. गणेशाच्या विसर्जनापाठोपाठ भरलेली घरे रिकामी होत जातात. पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्याच्या उमेदीत आपापल्या गावी परततात. गणपतीप्रमाणेच पुढच्या वर्षी लवकर या, अशी त्या घराची ओढ त्यांना परोपरीने सांगत असते. म्हणूनच वर्षातून एकदा येणारा हा पाहुणा सर्वांनाच हवाहवासा नि परत परत यावासा वाटतो.