कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीतच : प्रवाशांचे हाल

0
115

रोहा ते रत्नागिरीदरम्यान ३० गाड्या रखडल्या

करंजाडी- वीर दरम्यानच्या मार्गावर रविवारी मालगाडीचे डबे घसरल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसत असतानाच काल पुन्हा कोकण रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पार कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे बरेच हाल झाले. मध्य रेल्वेच्या ड्रायव्हर-गार्ड यांनी घातलेल्या हद्दीच्या वादानेही या गोंधळात भर घातली आहे. या प्रकारामुळे रोहा ते रत्नागिरीदरम्यान ३० गाड्या रखडल्या आहेत.
करंजाडी ते वीर स्थानकादरम्यानच्या ट्रॅकचे दुरुस्तीकाम पूर्ण होण्याधाच वाहतूक सुरू करण्यात आल्याने ही स्थिती उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीमुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द झाल्या असून बर्‍याच गाड्या चार ते पाच तास उशीरा धावत होत्या. तथापि कोकण रेल्वेने गाड्या रद्द केल्या नसून त्या ४ ते ५ तासांनी उशिरा धावत असल्याची कबुली कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली आहे.
कोकण रेल्वेच्या गलथानपणामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची हाल झाले असल्याचे दिसून आले आहे. ट्रॅक दुरुस्त न झाल्याने सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रद्द झाली आहे. ही गाडी ऐनवेळी रद्द झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर मडगांव-मांडवी एक्स्प्रेस ३ तासांपासून रत्नागिरी स्टेशनवर खोळंबली आहे. करमळी-सीएसटी गणपती स्पेशल डबलडेकर खेड स्थानकावर थांबवलेली आहे.