कॉंग्रेसमध्ये दुफळीची चिन्हे

0
84

– गंगाराम म्हांबरे
देश पातळीवर कॉंग्रेसमध्ये ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या धुसफुशीने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अधिक तीव्र स्वरुप धारण केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर, पक्षात निर्माण झालेली अस्वस्थता आणि असंतोष रोखण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने जे धैर्य आणि संयम यांचे दर्शन घडवायला हवे होते, त्याचा मागमूसही कुठे दिसला नाही. याचाच परिणाम म्हणून जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे आवाज येऊ लागले. अर्थातच हे आवाज पक्षनेतृत्वाविरोधात होते. कथित हायकमांडला जाग आणण्यासाठी चाललेला हा खटाटोपही व्यर्थ जातो की काय, असे वातावरण निर्माण झाल्यावर मात्र बोलके मानणारे दिग्विजयसिंग यांनीही आपला आवाज त्यामध्ये मिसळला. ६४ वर्षांचे नरेंद्र मोदी युवावर्गाला आकर्षित करू शकले, मात्र ४४ वर्षांचे राहुल निष्प्रभ ठरले अशा स्पष्ट शब्दांत दिग्विजयसिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यापुढे जाऊन अलीकडे त्यांनी काश्मीरमधील पुरस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगली कामगिरी बजावून पाकिस्तानलाही मदत देऊ केल्याबद्दल जाहीर अभिनंदन केले आहे. दिल्लीत भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर माजी महालेखापाल विनोद राय यांनी केलेल्या टीकेशी सहमती दर्शविली आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची ही भूमिका कॉंग्रेसच्या धोरणाशी विसंगत आहे.तरीही हे सारे खुल्लमखुल्ला चालू आहे, याचा नेमका अर्थ काय निघतो? राजकीय निरीक्षकांच्या मते राहुल गांधी यांच्यावर या निवेदनांचा रोख आहे. सोनिया गांधी वाढत्या वयात आपली कार्यक्षमता आणि प्रभाव गमावून बसल्या आहेत, ती जागा भरून काढण्यात राहुल यांना आलेले अपयश जुन्या नेत्यांना पक्षासमोर आणायचे आहे, ते नकळतपणे देशासमोरही आले आहे. राहुल यांचे सल्लागार मानले जाणारे दिग्विजयसिंग वेगळ्याच सुरात बोलत आहेत हे तर पक्षाला मारकच आहे. नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी मोहीम सुरू करायला दिवंगत पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरूंच्या १२५ व्या जयंतीचा मुहूर्त कॉंग्रेसने काढला आहे. पं. नेहरूंची प्रतिमा, त्यांची धोरणे यांच्यावर मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, त्याची जबाबदारी ज्या शीला दिक्षित यांच्यावर टाकण्यात आली आहे, त्याच दीक्षित दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर यावे, अशी अपेक्षा व्यक्त करतात, हेच मुळी सामान्यांना बुचकळ्यात टाकणारे आहे.
कॉंग्रेसमध्ये एकेकाळी सिंडिकेट व इंडिकेट असे गट निर्माण झाले होते. स्व. इंदिरा गांधी यांना शह देण्यासाठी ‘सिंडिकेट’ कार्यरत होती. स्व. इंदिराजींनी हा डाव उधळून लावत विरोधी गटाला नामोहरम केले होते. आज अशीच गटबाजी कॉंग्रेसमध्ये निर्माण झाली आहे का, अशी शंका निर्माण होण्यासारखे वातावरण त्या पक्षात आहे. कॉंग्रेसच्या काही सचिवांनी नेत्यांना हायकमांडच्या विरोधात न बोलण्याचा सल्ला दिल्याने तर ही शंका बळावली आहे. सोनिया गांधींची जागा राहुल गांधी घेऊ शकत नाही, असे मानणारा गट आणि तसे न समजणारा गट अशी विभागणी वरवर झाल्याचे सध्या दिसते आहे. राहुल गांधी तरूणांचे नेते आहेत, असे म्हणताना ज्येष्ठ नेत्यांना हिणवण्याची नवी टूम या पक्षात सुरू आहे. सोनिया निष्प्रभ ठरत असल्याने आता राहुल यांच्याशिवाय पर्याय नाही, असे हा गट मानतो. अर्थात दोन्ही नेत्यांना देशाने अव्हेरले आहे, मात्र स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसचा चेहरा म्हणून नेहरू-गांधी घराण्याकडेच पाहिले गेले. तशी स्थिती त्या पक्षातील नेत्यांनीच निर्माण केली. उत्तर भारतातील राज्यांनी सतत कॉंग्रेसची पाठराखण केली, असे चित्र १९७० पर्यंत तर होतेच होते. यात गांधी याच नावाभोवती कॉंग्रेस फिरत राहिला. पक्षाध्यक्ष अथवा पंतप्रधानपदी कोणीही असो, सत्ता गांधी घराण्याच्या हातातच केंद्रीत झालेली पाहायला मिळाली ती तब्बल २०१४ ची निवडणूक होईपर्यंत. गांधी घराण्याचे नाव कमी केल्यास कॉंग्रेस पक्ष जिवंत राहू शकेल का, असाच प्रश्‍न आज निर्माण झाला आहे. त्यामुळे अधुनमधून प्रियंकांचे नावही पुढे आणले जाते. प्रणव मुखर्जी, चिदंबरम, ए.के.ऍन्टनी असे नेते बाजूला फेकले गेले, कारण ते गांधी घराण्यातले नव्हते! या नेत्यांना पदे मिळाली, पण सत्ता नाही, अधिकार नाही अशी त्यांची स्थिती होती. त्यातही घोटाळ्यांनी केलेल्या कहराने कॉंग्रेस पुरती बदनाम झाली. त्यावर नियंत्रण ठेवायचे कोणी? बोफोर्स, राष्ट्रकुल, आदर्श अशा घोटाळ्यांत तर सारेच वरचढ ठरले. कॉंग्रेसचे भवितव्य काय, असा प्रश्‍न काही महिन्यांनी चर्चेत येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीनंतर हे प्रश्‍नचिन्ह निश्‍चितच उपस्थित होणार आहे. कॉंग्रेस पक्ष खरोखरच निर्नायकी बनला आहे का, असा संभ्रम निर्माण करणारी स्थिती तयार होत आहे. आम्ही परत येऊ, असा विश्‍वास देणारा एकही नेता या पक्षाजवळ नाही. पराभवाने एवढा खचलेला पक्ष आपण गोमंतकीयांनी पाहिला, पण देश पातळीवरही वेगळी स्थिती नाही. ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेथे भाजपला काही गमवायचे नाही, मात्र कॉंग्रेसला सत्ता टिकवायची आहे. ती न टिकल्यास हा पक्ष विघटनाच्या दिशेने जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत. निष्ठा, ध्येयधोरणे या बाबी आता इतिहासजमा होत आहेत, मात्र विचारसरणी उत्तरोत्तर वरचे स्थान प्राप्त करीत आहे. जनतेला पटणार्‍या योजना, तळागाळातील लोकांसाठी काम करणारे सरकार असावे अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रगतीच झाली नाही, असे नाही. पण त्याचा वेग, त्यातील भ्रष्टाचार आणि लुटारू नेते यामुळे जे पक्ष बदनाम झाले ते देशवासीयांनी बाहेर फेकले. त्या पक्षांना स्वतः सावरणे आता अवघड बनत चालले आहे. त्यांच्या चांगुलपणावरील विश्‍वासच उडून गेला आहे. जनतेच्या पाठिंब्याशिवाय पक्ष उभारणी किती कठीण आहे, याचा जसा प्रत्यय कॉंग्रेसला येत आहे, त्याचप्रमाणे कणखर नेतृत्वाची उणीवही त्या पक्षाला भासत आहे. वाढत चाललेल्या लाथाळ्या हा त्याचाच परिणाम आहे. सव्वाशे वर्षांचा पक्ष सहजपणे नामशेष होईल, असा याचा अर्थ नाही, मात्र हा टप्पा धोका दर्शवितो हे मात्र खरे.