केळावडेचा अनोखा कृषी महोत्सव

0
117

– उदय रामा सावंत, कोपार्डे-वाळपई
गोवा व महाराष्ट्र यांच्या सीमेवर गोवा हद्दीत असलेल्या केळावडे व रावण गावाने नुकत्याच आयोजित केलेल्या आगळ्या-वेगळ्या व पूर्णपणे वेगळी दिशा घेऊन आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाबद्दल सर्वप्रथम प्रशंसा करावीशी वाटते, कारण अशा स्वरूपाचे कार्यक्रम, ते सुद्धा सरकारच्या आर्थिक आधाराशिवाय आयोजित करणे वाटते तेवढे सोपे नाही. अनेक वेळा कोणताही अशा स्वरूपाचा कार्यक्रम चांगला झाल्यास तो चांगला म्हणण्याचा मोठेपणा क्वचितच कोणापाशी असतो, मात्र समजा अशा कार्यक्रमात छोटीशी चूक जरी झाली तरी त्याचा पराचा कावळा करण्यात येतो. रावण गावातील काही हाडाच्या शेतकर्‍यांनी केलेल्या प्रयत्नांना खरोखरच सलाम करावासा वाटतो. सदर स्वरूपाचा महोत्सव कृषी राखण मंच या व्यासपीठाखाली आयोजित करण्यात आला. एरव्ही कोणतीही गोष्ट करण्यामागे कोणता ना कोणता तरी हेतू असतो. मात्र मंचाची स्थापना एका वेगळ्या त्रस्ततेच्या भावनेतून झालेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. जवळपास सात-आठ महिन्यांपूर्वी रावण, केळावडे आदी भागातील शेतकर्‍याच्या कष्टांनी फुललेल्या बागायतीवर रानटी जनावरांनी नांगर फिरविल्यानंतर याच त्रस्त शेतकर्‍यांवर रानटी जनावरांच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी आली होती. याच वेळी कृषी राखण मंचाची स्थापना झाली.
एका विशिष्ट हेतूने एकसंध झालेल्या शेतकरी बांधवांना जनावरांबाबत नुकसानीच्या विषयावर नकारात्मक स्वरूपाचा विचार बाधताना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविकासासाठी सकारात्मक विचारधारेलाही महत्त्व दिलेले आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे, कारण अनेकवेळा आपण नकारात्मक स्वरूपाच्या विचारांना खतपाणी घालून भलत्याच खडतर मार्गाचा अवलंब करतो. यामुळे अनेकवेळा आंदोलनांमध्येच आपला वेळ खर्च होतो व आपल्या झोळीत काहीच पडत नाही.
कोणत्याही गोष्टीवर सकारात्मक व नकारात्मक स्वरूपाचा विचार झाल्यास त्याचा अनेकवार फायदा होतो. सदर स्वरूपाचा निष्कर्ष केळावडे राखण महोत्सवाच्या माध्यमातून समोर आला आहे. जरी या मंचाची स्थापना रानटी जनावरांचा प्रतिकार करण्यासाठी झाली असली, तरी त्यातून महोत्सवाचा विचार जन्माला येऊन केळावडे गावाची नवी ओळख समाजासमोर आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत व नवीन विचार जन्माला येऊ शकतात, याचा उलगडाही या निमित्ताने झाला आहे. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
कायदे हे फक्त कागदावरच रंगविलेले असतात, यांचा वापर प्रत्यक्षपणे करायचा झाल्यास ती बाब किती कटूपणाने समोर येणार याबद्दल विचार करायला लावणारा हा विषय आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत नैसर्गिक संपत्तीमधील जनावरांना मारणे कायद्याने गुन्हा आहे, हे सर्वश्रृत आहे. रानटी जनावरांपासून कृषीबागायतीचे, शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकार शेतकरी बांधवांना बंदुकीचा परवाना देते. शेतीमध्ये येणार्‍या किंवा नुकसान करणार्‍या जनावरांना आळा बसावा, हा यामागचा हेतू असतो. मात्र सरकारने दिलेल्या या परवान्याचा खरोखरच वापर करण्यास मिळतो का? हा महत्त्वाचा प्रश्‍न प्रतापसिंह राणे यांनी या मेळाव्यात उपस्थित केला.
आपल्या कृषी क्षेत्रात रानटी जनावरांकडून होणारा हैदोस हताशपणे पाहण्याचे दुर्दैव जर आपल्या नशीबी आहे तर या बंदुकीचा काय उपयोग? असा सवाल केल्यावर राणे पुढे म्हणतात की यावर कायद्यात तरतूद करताना अशा जनावरांना मारण्याची मुभा मिळणे गरजेचे आहे. अशा स्वरूपाच्या रानटी जनावरांना मारल्यानंतर त्याचा ताबा वनखाते अधिकार्‍याकडे देण्याची व्यवस्था कायद्यात केल्यास बर्‍याच प्रमाणात या गोष्टींवर मर्यादा येऊ शकतात. मात्र आपण पर्यावरणाच्या नावाखाली विकासाच्या गंगोत्रीला लगाम लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण जरूर व्हावे, मात्र विकासाचाही विचार त्याच ताकदीने होण्याची खरी गरज आहे. निसर्ग आपला प्राणवायू आहे हे आपणास मान्य करावेच लागेल. मात्र पर्यावरणाच्या नावाखाली रानटी जनावरांचा फैलाव अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आपणास भविष्यात भोगावे लागणार आहेत. केळावडे गावावर आजही अशी परिस्थिती कायम राहिल्यास आपणाला शेती व्यवसायाचे चित्र फक्त कागदावरच शोभून दिसेल.
सध्या सरकारने या गावाच्या कृषी संरक्षणासाठी बहुचर्चित ‘‘अळमो’’ डोंगरावर जनावरांना प्रतिबंध करणारी यंत्रणा राबविण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत डोंगराच्या चहुबाजूंनी सौर ऊर्जा कुंपणाचे संरक्षण घालणे यासारखा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. यातून गावाच्या कृषी संरक्षणाचा भार कितपत हलका होणार हे येणारा काळच ठरविणार आहे. महाराष्ट्र हद्दीपलीकडील भागातील रानटी जनावरांना सदर भाग अधिवासासाठी असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी आपला मोर्चा गोवा हद्दीत वळविला आहे, हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. यासाठी गोवा सरकारची महाराष्ट्र शासनाशी बोलणी करण्याची जबाबदारी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे.
आता केळावडे गावातील शेतकरी बांधवांनी आयोजित केलेल्या महोत्सवाबद्दल बोलायचे झाल्यास हा एक दिवसीय महोत्सव खरोखरच गावाच्या कृषी विकासाच्या प्रक्रियेला गती देणारा ठरणार आहे.
साध्या-भोळ्या शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रात आधुनिक स्तरावर झालेल्या तंत्रयुक्त बदलाच्या प्रोत्साहनाचा विचार शेतकरी मनावर झाल्यास त्याचा मोठा फायदा केळावडे गावाला होणार आहे. कारण केळावडे, रावण आदी ग्रामीण भाग अंजुणे धरणाच्या पाणलोट क्षेत्राखाली येणार आहेत. यामुळे या गावांना पाण्याची कमी नाही. यामुळे मुबलक मिळणारे पाणी, उपलब्ध शेतजमीन, त्यांना प्रोत्साहनाचे बळ मिळाल्यास त्यांच्या कष्टकरी पंखातून नवीन क्रांती निर्माण होऊ शकते.