कामाला लागा

0
324

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या दोन्ही गोष्टी पूर्णत्वास गेल्याने आता गोव्यातील लक्ष्मीकांत पार्सेकर सरकार आता आपली कामगिरी दाखविण्यास सज्ज झाले असेल अशी अपेक्षा आहे. मनोहर पर्रीकर यांच्या संरक्षणमंत्री म्हणून जाण्याने राज्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत असताना आपण पर्रीकरांचे आंधळे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार नाही, तर लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणूनच स्वतःची छाप उमटवण्याचा प्रयत्न करू असे पार्सेकर यांनी सांगितले आहे आणि त्यांची ही भूमिका अगदी योग्य आहे. पर्रीकर यांचे मार्गदर्शन सदैव उपलब्ध असेल ही पार्सेकर यांच्यासाठी जमेची गोष्ट जरी असली, तरी ते कोणाच्या हातचे कळसूत्री बाहुले आहेत, अशी प्रतिमा जनतेच्या मनात उत्पन्न होऊन चालणार नाही. त्यामुळे स्वयंप्रज्ञेने आणि प्रतिभेने राज्यशकट हाकणे ही आता पार्सेकर यांच्यावरील जबाबदारी राहणार आहे. पर्रीकर यांनी आपल्या दमदार कार्याने लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करणे सोपे नाही याची पुरेपूर जाणीव पार्सेकर यांना आहे. त्यामुळे स्वतःच्या मर्यादांचे भान ठेवून, परंतु अधिकाधिक चांगली कामगिरी करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळ सहकार्‍यांची सक्रिय साथ त्यांना यासाठी अर्थातच अत्यंत महत्त्वाची असेल. सरकारची बारा तोंडे बारा दिशांना असे न होता, संपूर्ण मंत्रिमंडळ एका जनहितकारी उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी वावरते आहे, असा विश्वास जनतेला मिळायला हवा. नुकत्याच झालेल्या खातेवाटपातून काही प्रमाणात कुरबूर ऐकू येते आहे. विशेषतः मगोचे आमदार दीपक ढवळीकर यांच्याकडून सहकार खाते काढून घेऊन त्यांना किरकोळ खाती बहाल केल्याने ढवळीकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष आहे. मात्र, त्यांचे बंधू सुदिन यांच्या खात्याला हात लावण्यात आलेला नाही. यातून मगोला एक संदेश मात्र भाजपाने दिलेला आहे. सगळे महत्त्वाचे असले तरी अपरिहार्य मात्र कोणी नाही अशा प्रकारचा हा सुप्त संदेश आहे. भाजप गोव्यातही वडील बंधूचीच भूमिका बजावणार आहे हेही मगोला अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले फ्रान्सिस डिसोझा यांना आरोग्य, नगरनियोजन आदी अतिरिक्त खाती देण्यात आलेली आहेत. पुन्हा उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलेले असल्याने त्यांच्या मनातील असंतोष एव्हाना शमला असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या पर्रीकर सरकारमध्ये सबकूछ मुख्यमंत्री असे एकखांबी सरकार चालल्याचे दिसत होते, ती परिस्थिती आता पार्सेकर यांच्या राजवटीत पालटेल. मंत्र्यांना आणि नोकरशहांना मोकळा श्वास घेता येईल हे खरे असले, तरी त्यातून भ्रष्टाचार बळावता कामा नये याची दक्षता पार्सेकर यांना घ्यावी लागेल. दक्षता खाते अर्थात त्यांच्या हाताशी आहेच. गृह आणि अर्थ ही खाती बहुतांशी मुख्यमंत्री आपल्या हाती ठेवत असतात. त्यातून मुख्यमंत्र्याची कार्यक्षमता व्यक्त होत असते. पार्सेकर यांनी ही खाती स्वतःजवळ राखून आपणही मुख्यमंत्री म्हणून कामगिरी यशस्वीपणे पार पाडून दाखवू शकतो हा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा बर्‍यापैकी अनुभव आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आज असलेल्या शंका कुशंका दूर सारून गोव्याला एक चांगले, कार्यक्षम सरकार देण्याचे आव्हान त्यांना यापुढे पेलावे लागेल. शुभेच्छा आणि हार – तुर्‍यांचे सत्र एव्हाना संपले असेल. त्यामुळे जनतेकडून यापुढील हार आणि प्रहार हे यापुढे सरकारच्या कामगिरीनुसार मिळतील. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात सरकारचा पहिला कस लागणार आहे. आजवर प्रश्न कोणत्याही खात्याचा असला, तरी पर्रीकर त्यांची मंत्र्यांच्या वतीने उत्तरे द्यायचे. मंत्र्यांना वाव मिळत नाही अशी तक्रार त्यामुळे होत असली, तरी पर्रीकर हे पूर्ण अभ्यासानिशी उभे राहत असल्याने विरोधकांच्या कचाट्यात आपला कोणताही मंत्री सापडणार नाही यासाठी एक संरक्षक कवच ते उभे करीत असत. आता पार्सेकर हे ती कामगिरी कशी पार पाडणार याबाबत लोकांना उत्सुकता आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जान फुंकली गेलेली कॉंग्रेस, पर्रीकरांच्या अनुपस्थित अधिक आक्रमक होणार असणारे अपक्ष आमदार यांच्या मार्‍याला यापुढे तोंड द्यावे लागणार आहे. भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ व कार्यक्षम प्रशासन जनतेला हवे आहे आणि आता सरकारच्या कामगिरीच्या मोजमापाला जनतेकडून प्रारंभ झालेला आहे.