एक यादगार साहित्य संमेलन!

0
107

– चंद्रकांत महादेव गावस
अचानक एक दिवस मनात आले, आपल्या सत्तरीत एखादी साहित्यिक संस्था हवी, जी सातत्याने काही कार्यक्रम करील. मनातल्या मनात काही जुळणी केली आणि एक दिवस ऍड. भालचंद्र मयेकरांना सहज बोललो. ते एकदम एक्साईट होऊन म्हणाले, ‘‘करूया की. आम्हाला अशी एखादी संस्था हवीच आहे.’’ मग माधव सटवाणी वगैरे चार दोन लोकांना म्हटले. सगळ्यांनीच उत्साह दाखविला. त्यांचा उत्साह पाहून मी आणखी उत्साहित झालो आणि त्या दिशेने आखणी सुरू झाली. ठरल्या प्रमाणे एक दिवस बैठक बोलावली. मी मनात हिशेब मांडला होता त्यापेक्षा जास्त मंडळी जमा झाली.अध्यक्षपदाची माळ कोणातरी बुजूर्ग व्यक्तीच्या गळ्यात घालावी असे मनात आले, पण बुजूर्ग म्हणाले, ‘‘म्हातार्‍या अर्कापेक्षा तरूण तुर्क बरे. आता आमचे हातात शस्त्र धरण्याचे नव्हे. ज्यावेळी होते त्यावेळी धरलेच की! मराठी अकादमीच्यावेळी खाकेला झोळी बांधून फिरलोच की. आता सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा भूमिकेत आहोत आम्ही.’ त्यांचे म्हणणे बर्‍याचजणांना पटले. त्यामुळे अध्यक्षपदाची घंटा माझ्याच गळ्यात बांधली.
निर्मितीक्षम लेखकांनी संस्थांच्या जबाबदारीत पडू नये असे वाचले होते. पण संस्था स्थापनेची कल्पना माझी. लोकांचा आग्रह. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
एक दोन कार्यक्रम केले नेटाने. पण कार्यक्रम करायचा म्हटला तर संन्याशाच्या शेंडीपासून तयारी. यात बराच वेळ जाऊ लागला. दोन तासांचा कार्यक्रम. पण तो उभा करायला अनेक दिवस बळी पडू लागले. त्यामुळे माझी लेखननिर्मिती स्वल्पविरामाच्या दिशेने होऊ लागली. आर्थिक बळ उभे करताना नाकातून फेस येऊ लागला.
अशी दोन वर्षे गेली आणि एक दिवस मयेकर म्हणाले,‘‘यावर्षी साहित्य संमेलन घेऊया.’’
‘‘नाही जमणार. एखादा छोटासा कार्यक्रम उभा करताना आम्ही आडवे होतो. एवढा संमेलनाचा कार्यक्रम उभा करायचा म्हणजे सपशेल आडवे.’’
‘‘काही नाही आडवे होत. अहो, अशा मोठ्या कार्यक्रमाच्यावेळी चार लोक उभे राहतात. सगळयांना कामे वाटून दिली म्हणजे आपल्याला काही कामच उरणार नाही.’’
‘‘आणि पैशांचे काय?’’
‘‘पैशांचे काय घेऊन बसला आहात? अहो, सध्या पाऊस कोसळतोय सत्तरीत पैशांचा. बाबाच्या कृपेने दिवसाकाठी लाख लाख रुपये घेऊन येताहेत सत्तरीचे लोक. साधी पोरंटोरं क्रिकेट आणि अशाच फालतु खेळांच्या नावाने रूपये आणतात.’’
‘‘अहो, ते त्यांचे कार्यकर्ते असतात. आपण थोडेच त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला पैसे द्यायला. आपल्या माणसाला कोणीही देईल. तुम्ही तुमच्या मुलाला खळखळ न करता हजार रुपये द्याल एखाद्या गोष्टीसाठी, म्हणून माझ्या मुलाला देणार आहात काय?’’
माझ्या या युक्तीवादाला सुरुंग लावीत मयेकर म्हणाले,‘‘अहो, त्यांना कार्यकर्ता वगैरे काही लागत नाही. एवढे मोठे साहित्य संमेलन आपल्या सत्तरीत होतेय म्हटल्यावर ते स्वतःहून देतील पैसे. तुम्ही, मी नसलो तरी त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत आपल्याकडे.’’
मयेकरांची एक गंमत आहे. त्यांना कोणतेच काम कठीण वाटत नाही. अशा काही चार गोष्टी सांगतील तुम्हाला की तुम्ही बळी पडायलाच हवे त्यांच्या बोलण्याला. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फक्त म्हणायचे, ‘‘मला गोव्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. करता येईल काही?’’ ते तुम्हाला इतकी सोपी पद्धत सांगतील एखादी की तुम्हाला वाटले पाहिजे, पुढच्या चार दिवसांत मी मुख्यमंत्री झालोच! ‘‘पण हे सगळे त्यांना सांगणार कोण?’’
‘‘मी आहे ना! त्यांच्याशी बोलायला त्यांचे कार्यकर्ते भीत असतील तर आम्हाला काय त्याचे? त्यांना सांगायचे तुमच्या मतदारसंघात एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. एक उत्तम कार्यक्रम घेतल्याचे श्रेय तुम्हाला जाईल. असे श्रेय कुणाला नको आहे?’’
माझ्या सर्व शंकांवर बुलडोझर फिरवित त्यांनी साहित्य संमेलन घेण्यासाठी माझे मन तयार केले. आर्थिक प्रश्‍न असा उभा राहत असेल तर बाकीच्या गोष्टी करायला अडचण येणार नाही असा विचार करून मी तयार झालो. कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली. उत्साहाने फसफसलेले ७०-८० लोक उपस्थित होते. आयोजन समिती स्थापन झाली. अधिकतर कार्यकर्ते त्यांचेच असल्यामुळे आयोजन समितीच्या अध्यक्षपदी मोठ्या साहेबांची निवड झाली. तर कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या पुत्राची!
आता ही गोष्ट रीतसर त्यांच्या कानावर घालायला हवी म्हणून एका सकाळी मोठ्या साहेबांच्या घरी गेलो. तशी भेट लवकर झाली. पण आयोजन समितीच्या अध्यक्षपदाची कल्पना मात्र त्यांनी उडवून लावली. मी आशाळभूतपणे मयेकरांकडे पाहिले. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण साहेब ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मनधरणी केली तेव्हा तयार झाले. पण म्हणाले,‘‘मला फार वेळ मात्र देता येणार नाही.’’ त्यांनी आपला शब्द शेवटपर्यंत पक्का पाळला.
एक दिवस मग त्यांच्या मुलाला भेटायला पणजीला गेलो. बोलावले तसे आत गेलो. सविस्तर सगळे सांगितले. ऐकून ते म्हणाले,‘‘साहित्य संमेलनातले मला काही कळत नाही. ते साहेबानाच चांगले कळते. तुम्ही त्यांच्याकडे चला.’’
त्यांनी आमची विनंती पार उडवूनच लावली. काही सांगणार म्हटले तर मयेकर आत आलेच नाही.
‘‘काही आर्थिक मदत लागली तर बघू.’’ आमचे पडके तोंड पाहून ते म्हणाले. तशी त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हती आमची. प्रमुख होता तो आर्थिक प्रश्‍न. तो जर सुटत असेल तर कामाला लागायला हरकत नव्हती. लागलो कामाला. पण उत्साह अंग धरेना. दिवसेंदिवस तो बारीक होत चालला. कारण आता त्यांचे जवळचे कार्यकर्तेही फिरकेनासे झाले. आता सगळेे काम आमच्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. संमेलन उभे करायचे त्यासाठी आर्थिक बळ उभारायचे, सगळेच आमच्यावर आले. म्हणून मी म्हटले,‘‘आम्ही आता त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आमचे चार मार्ग शोधूया.’’
पण मयेकर म्हणाले,‘‘त्यांचा एक प्रमुख कार्यकर्ता मला कालच भेटला. त्याने माझ्याकडे येऊन मुद्दाम सांगितले. दोनेक लाख आपण देतो म्हणून.’’ पण माझी त्यांच्या बाबतीतली आशा मेली, ती जिवंतच होईना.
आता खर्चाचे चार मार्ग शोधायलाच हवे होते. त्यातला एक मार्ग सापडला. प्रायोजित कार्यक्रमाचा. सगळे कार्यक्रम संस्था आणि व्यक्ती यांच्याकडून प्रायोजित करून घेतले. नंतर सगळ्याच प्रायोजकांनी पैसे दिले नाहीत ही गोष्ट वेगळी.
स्वागताध्यक्ष म्हणून माझ्या मनात माधव सटवाणी याचे नाव होते. खूप वर्षांपासून ते सत्तरीच्या साहित्य क्षेत्रात आहेत. कवी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. पण सुरुवातीपासून आमच्या हातून सूत्रे निसटत चालली असल्यामुळे नगराध्यक्षांचे नाव स्वागताध्यक्षपदासाठी पुढे आले. अध्यक्षपदासाठी गुरूनाथ नाईकांचे नाव पुढे आले. ते मूळचे सत्तरीचे. त्यांच्या नावावर एक हजारपेक्षा जास्त कादंबर्‍या होत्याच मराठीत. सत्तरीत संमेलन होतेय तर त्यांच्या नावाला आडकाठी आणायचे कुणाला काही कारण नव्हते. त्यामुळे पुढे तेच नाव नक्की झाले. सगळी सोंगे आणता येतात म्हणतात. पण पैशांचे सोंग कसे आणणार? त्यामुळे पायाला भिंगरी लावली आणि काही मोजकेच कार्यकर्ते फिरायला लागलो. काम उभे राहता राहता दिवस उजाडला. उद्घाटनचा कार्यक्रम सुरू झाला. पण मंडप मात्र रिकामा रिकामा दिसत होता.
आयोजक संस्थेचा अध्यक्ष मी. त्यामुळे भाषणाची थोडी तरी तयारी करायला हवी होती. पण तसा निवांत वेळच नव्हता. तरी थोडी फार तयारी केलीच. भाषणासाठी आता माझी वेळ येईल. आता मला बोलावले जाईल पण शेवटपर्यंत ती वेळ आलीच नाही. आश्रयदाते पितापुत्र कार्यक्रमालाही फिरकले नाहीत. म्हणून आयोजन समितीच्या अध्यक्षांचे व कार्याध्यक्षांचे भाषण झाले नाही. विसरले म्हणून संस्थेच्या अध्यक्षाचे भाषण नाही. गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे पहिले साहित्य संमेलन असे यादगार बनले!