उद्धव ठाकरे यांच्या डावपेचांमुळे भाजप संतप्त

0
98

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे माजी नेते व आताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असलेले छगन भुजबळ यांनी थंड डोक्याचा राजकारणी असे संबोधले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आणि शिवसेना भाजपची २५ वर्षांची महायुती कोसळण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसत असताना भुजबळ यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युतीही उभय पक्षांच्या ताठरपणामुळे तुटण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची उणीव जाणवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपबरोबरील जागा वाटपासंदर्भात उद्धव यांनी कडक धोरण ठेवल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. राज्यभरातील शिवसैनिकांकडूनही भाजपसमोर उद्धव यांनी झुकू नये व पक्षाचे वर्चस्व कमी होऊ देऊ नये यासाठी दबाव आहे. महाराष्ट्रात भाजपला पंख पसरण्यास शिवसेनेने मदत केली याची आठवण भाजपने ठेवावी असेही या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
जे. जे. स्कूल आर्टस्‌चे माजी विद्यार्थी व एक वन्यजीवप्रेमी असलेल्या ५३ वर्षीय उद्धव यांनी आपल्या डावपेचाद्वारे भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे की शिवसेना हा घेणारा नसून देणारा पक्ष आहे. मुख्यमंत्रीपदासह कोणत्याही जबाबदारीपासून अलिप्त राहणार नसल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी वेळ येताच केवळ मोदी लाट नव्हे तर बाळ ठाकरे लाटही महत्त्वाची आहे याची आठवण उद्धव यांनी भाजपला करून दिली आहे.