आकाशी झेप घे रे मनोहरा!

0
97

– रमेश सावईकर
गोव्याचे तडफदार मुख्यमंत्री म्हणून देशभर नावलौकिक मिळविलेले मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून स्थान मिळणे ही तमाम गोमंतकीयांना भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे. देशाचे संरक्षणमंत्री बनण्याचा मान गोव्यासारख्या चिमुकल्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या राजकीय व्यक्तीला मिळाला याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी कॉंग्रेस पक्षालाही सार्थ अभिमान वाटायलाच हवा. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी आनंद व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोव्याच्या राजकीय इतिहासात मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री बनले ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. राज्य पातळीवरील राजकारणात चार दशकांहून अधिक काळ राहून सक्रिय राजकारण करणार्‍या अन्य कोणाच्या नशिबी एवढा मोठा बहुमान, सन्मान मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्यावेळी गोव्यात आले, त्यावेळी पर्रीकरांविषयीचे त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मनोहर पर्रीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले, संस्काराने संपन्न झालेले! त्यामुळे शिस्त, करारी बाणा नि कर्तव्यतत्परता हे गुण त्यांच्या नसानसांत भिनलेले आहेत. एकदा निर्णय घेतला की त्यापासून मागे हटायचे नाही हा त्यांचा करारी बाणा. आपले मत ठासून स्पष्ट करणे, त्याचे मूल्याधिष्ठीत समर्थन करणे ही कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे. काही माणसे जन्मतःच मोठी असतात. काही माणसे आपल्या कर्तबगारीवर मोठी होतात. मनोहर पर्रीकर हे आपल्या कर्तबगारीनेच मोठे झाले आहेत. आपली कार्यक्षमता त्यांनी सिद्ध करून दाखविली, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्‍वासाने त्यांच्यावर देशाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे. पर्रीकर ही जबाबदारी समर्थपणे पेलतील यात शंकाच नाही. गेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या गोमंतकीय जनतेने भाजपाच्या पारड्यात भरभरून मते दिली, ती केवळ भाजपा हा इतर पक्षांहून वेगळा (ए पार्टी विथ द डिफरन्स) म्हणूनच नव्हे तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर झालेले हवे होते म्हणून! त्यांनी राजकीय करिष्मा करून दाखविला. निवडणूक प्रचारावेळी सारा गोवा पिंजून काढला. अविश्रांतपणे निवडणूक प्रचार कार्यात झोकून दिले, कशाचाही तमा न बाळगता, विरोधकांची पर्वा न करता! म्हणूनच भाजपाला एवढे मोठे स्पष्ट बहुमत प्राप्त होऊ शकले.
त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेली मोदी लाट मांडवीच्या किनारी धडकली नाही तर जुवारीच्या तीरीही त्या लाटेने जोरदार धडक देऊन दक्षिण गोव्यात आपली किमया करून दाखविली. उत्तर गोव्यातून खासदारकी भूषविलेले विद्यमान केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडून येतील याची सर्वांना खात्री होती, पण दक्षिण गोव्याबद्दल खुद्द भाजपा समर्थकांसह राजकीय विश्‍लेषकांमध्येही साशंकतेची भावना होती. फक्त पर्रीकर मात्र निवडणूक प्रचारापूर्वीपासून भाजपा लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकले असे खात्रीपूर्वक आवर्जून सांगायचे.
मोदी लाटेचा प्रभाव होताच, पण त्याचा जोडीला पर्रीकरांवरचा विश्‍वास, त्यांची लोकप्रियता, नावलौकिक या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. म्हणूनच तर उत्तर व दक्षिण गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लाखोंच्या मताधिक्क्याने भाजपाने जिंकल्या! मनोहर पर्रीकर ही काय चीज आहे हे फक्त पूर्णतः नरेंद्र मोदींनीच ओळखले होते. त्यामुळे पर्रीकरांची खास अशी प्रतिमा मोदींच्या मनात निर्माण झाली होती. ती नेमकी काय होती हे आता स्पष्ट झाले.
पर्रीकरांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. आपल्या कारकिर्दीत गोव्याचा विकास व्हावा, लोककल्याण व्हावे म्हणून अथक परिश्रम, प्रयत्न व सेवाकार्य केले. गोव्याच्या राजकीय इतिहासात पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंह राणे यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मिळालेला बहुमान त्यांनी सार्थकी लावला, याची नोंद होईलच! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता फक्त प्रमुख नेता कणखर, तडफदार, शिस्तबद्ध, बाणेदार असून भागत नाही, तर त्यांचे सहकारी मंत्री, आमदारही त्याच वृत्तीचे, गुणधारक असावे लागतात. सध्या राजकीय क्षेत्रात स्वार्थी वृत्ती बोकाळली आहे. अफाट माया-संपत्ती जमविण्याच्या जबर इच्छेपोटी राजकीय नेते कसल्याही थराला जातात, ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही वृत्ती बोकाळली आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची शर्यत चालूच असते. अशा राजकीय परिस्थितीत सच्च्या, तडफदार, बाणेदार, करारी मनोहर पर्रीकरांसारख्या नेत्यांची अनेकदा गोची होते. कोंडमारा होतो. पण पर्रीकर त्यातूनही यशस्वीपणे बाहेर पडू शकले. म्हणूनच तर त्यांना ‘हिटलर’ म्हणून संबोधण्याची पातळी विरोधकांनी गाठली.
भाजपाच्या स्वगृही त्यांचे कौतुक व्हायचे, तसे अंतर्गत टीकाही व्हायची. ती उघड-उघड नव्हे. पण अंतर्गत खदखद! विरोधक तर पर्रीकरांवर ‘तिसरा डोळा’ लावून बसलेलेच! त्यांनी राज्याच्या हितकारक प्रकल्प मंजूर करून पुढचे पाऊल उचलले की निद्रिस्त सिंह, कोल्हे, लांडगे यांच्यासह इतरांना जाग यायची. दक्षिण गोव्यातील स्वयंघोषित राजकीय सर्वेसर्वा चर्चिल आलेमाव तर कितीही तळ्यांत-मळ्यांत खेळून दमलेले असले तरी पर्रीकर म्हणाले की, त्यांना विरोध करण्यासाठी खडबडून जागे होतात. ‘दाबोळी’ समर्थकांनी ‘मोपा’ला विरोध करण्यासाठी एकवेळ नव्याने नव्हे तर यापूर्वीच बर्‍याच वेळा रणशिंग फुंकले आहे. पण पर्रीकर सर्वांना पुरून उरलेले आहेत.
विरोधासाठी विरोध करणार्‍यांची त्यांनी केव्हाच गय केली नाही. त्यांचा मुलाहिजा ठेवला नाही. तथापि बर्‍याचवेळा त्यांना राजकीय तारेवरची कसरत करून पुढचा मार्ग सुकर करावा लागला आहे. प्राथमिक शिक्षण माध्यम प्रश्‍न, ‘मोपा’ विमानतळ, पर्यटन धोरण, खाणबंदीचा प्रश्‍न आदीचा त्यात समावेश करता येईल. या सतत तापत असलेल्या, पुन्हा पुन्हा चेतविण्यात येणार्‍या विषयांवरून राजकीय विरोधक, शिक्षणतज्ज्ञ, खाण उद्योजक, खाण अवलंबित, पर्यावरणतज्ज्ञ, एनजीओ, यांच्या विरोधाला सामोरे जाण्याचे एक ना दोन बरेच प्रसंग त्यांच्यावर आले. पण करारी पर्रीकर ना कधी डगमगले, ना कधी हिरमुसले. ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे’ हा सैनिकी बाणा त्यांनी सतत जपला. म्हणूनच त्यांचा कणा आजही ताठर आहे!
राजकीय चर्चेत ते कायमचे आहेत. विरोधकांनाही त्यांची नोंद घ्यावीत लागते. तेही विरोधकांना आपल्या शैलीत ठोशास ठोसा हाणून गप्प करतात. म्हणून वाढत्या विरोधापेक्षाही अधिक लोकप्रियता, नावलौकीक अवघ्या कालावधीत ते संपादन करू शकले.
गोवा हे चिमुकले – अंदाजे १५ लाख लोकसंख्येचे राज्य. त्या राज्याची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. आर्थिक विवंचनेतूनही राज्याला बाहेर काढून सरकारी तिजोरी मजबूत करण्याचे कसब दाखविले. या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर त्यांना आपली राजकीय परिपक्वता आगामी काळातही सिद्ध करून दाखवावी लागेल. १२५ कोटी जनतेच्या, पर्यायाने देशाच्या संरक्षणाची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांची आगामी कारकीर्द कसोटीची आहे.
पाकिस्तान व चीनचे भारत देशाबरोबरचे संबंध वरवर चांगले वाटत असले तरी पाकिस्तान सीमारेषांवर गोळीबार करतो, तर चीन सरहद्दीवर युद्धाचे ढग जमण्यासदृश्य परिस्थिती आहे. अशा कठीण प्रसंगी मोदी सरकारात संरक्षणमंत्रीपदाचा मुकूट मनोहरांच्या शिरी घालण्यात आला आहे. हा मुकूट कांटेरी असला तरी मनोहर पर्रीकर तो ‘मनोहारी’ बनवून भारत देशाचा मान, देशाची शान सार्‍या जगी उंचावण्यात यशस्वी होवोत हीच शुभेच्छा!