अप्रतिम आरू आणि बेताब व्हॅली

0
273

(चिनारच्या छायेत-६)
– परेश वा. प्रभू
पहलगामच्या परिसरातील दबियान, बैसरन आदी निसर्गरम्य ठिकाणे पाहून झाल्यावर आवर्जून पाहण्याजोगी दोन ठिकाणे जवळपासच्या परिसरात आहेत, ती म्हणजे आरू व्हॅली आणि बेताब व्हॅली. खरे तर ही दोन्ही ठिकाणे पहलगामच्या दोन दिशांना आहेत, परंतु अवघ्या बारा – पंधरा कि. मी. च्या अंतरावर असल्याने या अनुपमेय निसर्गाच्या सान्निध्यातील स्थळांना भेट न देणे म्हणजे करंटेपण ठरेल.
आरू हे गाव पहलगामपासून बारा कि. मी. वर आहे. तेथवरचा साराच परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि हे सृष्टीसौंदर्य डोळ्यांत किती साठवू नि किती नको असे प्रत्येकाला होऊन जाते. आरू हा ओव्हेरा – आरू बायोस्फिअर रिझर्व्ह या ५११ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या अभयारण्याचा भाग असल्याने येथे जाणार्‍या वाहनांना प्रवेश शुल्क भरूनच आत प्रवेश घ्यावा लागतो. या हिमालयन अभयारण्यामध्ये दुर्मीळ पशु पक्ष्यांचे वास्तव्य आहे. विशेष म्हणजे या जंगलामध्ये कस्तुरीमृगाचे वास्तव्य आहे. स्थानिक भाषेत ‘हंगूल’ संबोधले जाणारे काश्मिरी काळवीटही येथे आढळते. मात्र, बदलत्या परिस्थितीत नामशेष होत चाललेले हे प्राणी पहलगामच्या ‘डिअर पार्क’मध्येच आता पाहायला मिळतात.
आरू खोर्‍याच्या दिशेने जाणारा रस्ता खूपच अरूंद आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. एका बाजूला डोंगरकडे आणि दुसर्‍या बाजूला खोल दरीतून खळखळत वाहणारी लिडारची उपनदी असलेली आरू नदी यांच्या साक्षीने खाच खळग्यांतून दणादण धावणार्‍या छोट्या वाहनातून प्रवास करताना धडकीच भरते. पण या परिसरातील निसर्ग अतिशय लोभसवाणा आहे. आम्ही आरूकडे निघालो तेव्हा पावसाळी कुंद वातावरण होते. त्यामुळे मूळचाच हिरवागार असलेला हा परिसर अधिकच रम्य भासत होता. आरू खोर्‍यातून येणार्‍या या नदीला अमरनाथच्या वाटेवरील शेषनाग तलावातून येणारी पूर्व लिडार नदी पहलगामजवळ भेटते आणि लीडार नदी बनून तिचा पुढचा खळाळता प्रवाह अनंतनागच्या दिशेने धावू लागतो. अनंतनागजवळ ही लिडार झेलमला जाऊन मिळते.
आरू खोर्‍याचा हिरवागर्द निसर्ग आणि वरच्या शिखरावरून खाली येताना गोठल्याने धवलरूप धारण केलेली हिमनदी आणि देवदाराची घनगर्द वृक्षराजी पाहात आपण पहलगामहून झोकदार वळणे घेत आरूला येऊन पोहोचतो. कोलहोई ग्लॅशियरसाठी जाणार्‍या ट्रेकचा आरू हा बेसकॅम्प आहे. येथून तरसर – मरसर या जोड तलावांकडेही घोड्यावरून जाता येते. तीन दिवसांचा सोनमर्गचा ट्रेकही येथून करता येतो असे समजले. आरू गावातील एक हिरव्यागर्द रंगाची बंगली लक्ष वेधून घेते. येथेच सुभाष घईंच्या ‘कर्मा’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे असे सांगण्यात आले. आरूत प्रेक्षणीय स्थळे वगैरे नाहीत. जाता येताना दिसणारा निसर्ग हीच प्रेक्षणीय बाब!
पहलगामजवळचे दुसरे प्रसिद्ध खोरे म्हणजे बेताब व्हॅली. या खोर्‍याचे खरे नाव हंगून व्हॅली. पण १९८३ साली ‘बेताब’ चित्रपटाचे चित्रीकरण या परिसरात झाले आणि येणार्‍या पर्यटकांसाठी या खोर्‍याची ओळखच ‘बेताब व्हॅली’ बनून गेली. ७२०० फुटांवरील पहलगामहून ९५०० फूट उंचीवरील चंदनवाडीला जाताना वाटेत उजव्या बाजूला खोल दरीत दिसणारे खोरे म्हणजेच ही प्रसिद्ध ‘बेताब व्हॅली’. हिरव्यागर्द कुरणात वाटा वळणांच्या रस्त्याच्या पांढर्‍या रेषा आणि बाजूने खळखळणारी पूर्व – लिडार नदी वरून आकर्षक दिसतेच, पण तेथवर खाली जाण्यासाठी रस्ता आहे. सनी देओल – अमृतासिंग अभिनीत ‘बेताब’ या सुपरहिट चित्रपटाचे जवळजवळ सत्तर टक्के चित्रीकरण येथेच झाले आहे. आज ‘बेताब’ नव्या पिढीला माहीत नाही, पण त्याच्या नावाने हे खोरे मात्र काश्मीरला येणार्‍या पर्यटकांमध्ये अजरामर झाले आहे.
बेताब व्हॅलीचा सुंदर निसर्ग पाहात आपण जाऊन पोहोचतो चंदनवाडीला. अमरनाथ यात्रेकरूंच्या तोंडून हे नाव आपण अनेकदा ऐकलेले असते. चंदनवाडी हा अमरनाथ यात्रेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अमरनाथ यात्रेला जाणार्‍यांसाठी दोन मार्ग उपलब्ध असतात. एक सोनमर्ग – बालटालवरून दोमेल – बरारी – संगममार्गे अमरनाथ गुंफेकडे जातो, तर दुसरा पहलगाम – चंदनवाडी – पिस्सूटॉप, शेषनाग, पंचतरणी, संगममार्गे अमरनाथला जातो. पहिल्या मार्गावर बालटालपर्यंत आणि दुसर्‍या मार्गावर चंदनवाडीपर्यंतच वाहने जाऊ शकतात. पुढचा सारा प्रवास घोड्याचे तट्टू घडवते. चंदनवाडी पहलगामपासून सोळा कि. मी. वर आहे. साडे नऊ हजार फूट उंचीवरील चंदनवाडीपासून तेरा हजार फुटांवरील अमरनाथ गुंफेपर्यंतचा सारा प्रवास त्यावरून होतो. अमरनाथ यात्रेकरूंसाठी नोंदणी, तपासणी वगैरेंसाठी खास कक्ष बांधलेले आहेत.
पहलगाम – चंदनवाडी मार्गावर आम्ही गेलो तेव्हा मे महिन्याचा उत्तरार्ध होता, तरी हिम वितळलेले नव्हते. दहा पंधरा फूट उंचीच्या बर्फाच्या भिंतीतूनच रस्ता खोदलेला होता. चंदनवाडीत ग्लॅशियर आहे. त्यामुळे तिथे तर बर्फच बर्फ पसरलेला असतो. काश्मीरचे हिवाळ्यातील रूप कसे असेल त्याचा उन्हाळ्यातच अनुभव घेऊन आम्ही पहलगामला आणि दुसर्‍या दिवशी श्रीनगरला परतलो.
काश्मीरची आठवड्याभराची भ्रमंती ही साधारण अशी असते. ज्यांना वैष्णोदेवीला जायचे असते ते कटडापर्यंत येऊन वैष्णोदेवीचेही दर्शन घेतात. आम्हाला श्रीनगरहून गोव्याला थेट यायचे असल्याने वैष्णोदेवीला तेथूनच नमस्कार करून परत निघालो.
परतीच्या संदर्भात एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे श्रीनगर विमानतळावरची कडेकोट सुरक्षा. या लेखमालेतील पहिल्याच लेखात तिचा उल्लेख केला होता. हा विमानतळ देशातील इतर विमानतळांसारखा नाही. काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशातील हा विमानतळ असल्याने अनेकपदरी सुरक्षेचे कडे या विमानतळाभोवती आखलेले आहे. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच गाड्या थांबवून बॅगा उतरवून स्कॅनरखाली घालून सुरक्षेचे सर्व सोपस्कार करावे लागतात. पूर्वी विमानाच्या परतीच्या प्रवासात कॅबिन बॅगेज न्यायला किंवा कॅमेराही न्यायला परवानगी नव्हती. अलीकडे हे नियम थोडे सौम्य केले असले, तरी सुरक्षा तपासणीची पुन्हा पुन्हा कटकट नको असेल तर सगळे सामान चेक इन बॅगेतच टाकणे श्रेयस्कर. विमानात सामान चढवले जाताना पुन्हा बॅगेज आयडेंटिफिकेशन करावे लागते.
सुरक्षेचे अवडंबर कितीही असो, काश्मीरची सफर ही खरोखरच एक सुखद आठवणी मागे ठेवणारी सफर आहे. निसर्ग आपल्या अस्सल, चैतन्यमयी रूपात आपल्याला येथे भेटत असतो. दहशतवादाचा झाकोळ जरी असला तरी नंदनवन काश्मीर आपल्याला पुन्हा पुन्हा साद घालत राहील. चिनारची घनगर्द छाया आपल्याला खुणावेल. गुलमर्ग – सोनमर्गची हिमाच्छादित शिखरे आपल्याला पुकारतील. पहलगाम – बैसरन – आरूची हिरवाई आपल्या मनाला ताजेतवाने करून जाईल. दल सरोवराचे निळेशार संथ पाणी आपल्याला मनःशांती देईल.
या लेखमालेची सांगता मी येथे करतो आहे. खरे तर ही लेखमाला तशी योगायोगानेच सुरू झाली. ‘अंगण’ पुरवणीचे एक स्तंभलेखक विष्णू सूर्या वाघ यांच्या सदराचा मजकूर एका शुक्रवारी पुरवणी छपाईला पाठविण्याची वेळ झाली तरी येऊ शकला नाही आणि त्या पानाचे काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा नुकत्याच दिलेल्या काश्मीर भेटीवरचा लेख पर्याय म्हणून दिला आणि संपूर्ण काश्मीर एका लेखात सामावणारे नसल्याने आठवडाभराची ही सफर या लेखमालेतून आपल्याला घडविली. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल ती म्हणजे यात सारा भर केवळ स्थलवर्णनावर होता. वैयक्तिक अनुभवांना किंवा आलंकारिकतेला यात पूर्ण फाटा देऊन नेमकेपणाने काश्मीरचे दर्शन आपल्याला घडविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी काश्मीर अनुभवले आहे त्यांना या लेखांमधून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल आणि ज्यांनी पाहिलेले नाही, त्यांना काश्मीरची ओढ लागलेली असेल. चिनार खरेच आपल्याला बोलावतो आहे!… (समाप्त)