समुपदेशन गीतेतून – पत्रं पुष्पं फलं तोयम् …

– प्रा. रमेश सप्रे

आपण करतो ते सर्व भगवंताला अर्पण – समर्पण करणं हे गीतेत ‘राजगुह्य’ सांगितलंय. म्हणजे भगवंत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ रहस्य (तत्त्व) सांगितलंय. त्याचबरोबर हे अर्पण कसं करायचं ती कलाही सांगितलीय. तिला ‘राजविद्या’ असं म्हटलंय. म्हणजे सर्व कलांचा, विद्यांचा राजा किंवा राणी!

वरवर हे फार सोपं वाटतं. तसं ते आहे ही. कृती करणं सोपं आहे पण मनात जर समर्पण भाव नसेल तर सारं नाटकच होऊन जातं. यात नुकसान अर्थात आपलंच असतं.
तशी इतरही काही भगवद्प्राप्तीची रहस्यं सांगितली आहेत. उदा. अनन्यभावानं अखंड चिंतन (अनन्याश्‍चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते|), अखंड नामस्मरण (सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर|), अनन्यशरणागती (माम् एकं शरणं व्रज) इ.
यातून मिळवायचं काय तर ऐहिक-प्रापंचिक सुखं वा उपभोग नाहीत. अगदी स्वर्गप्राप्तीसुद्धा मानवी जीवनाचं सर्वोच्च ध्येय नाही. ते आहे अखंड आनंदप्राप्ती अर्थात् जीवनमुक्ती!
भगवंताचे शब्द तसे सोपे आहेत –
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|
तत् अहं भक्त्युपहृतम् अश्‍नामि प्रयतात्मनः॥
अर्थ असा – पान, फूल, फळ अगदी पाणीसुद्धा जो मला भक्तिभावानं देतो (भक्त्या प्रयच्छति) ते प्रेमपूर्वक अर्पण केलेले (भक्ति उपहृतम्) मी (आनंदानं) ग्रहण कर तो. (अश्‍नामिं) आपल्या संस्कृतीची ही दृष्टी सर्वमंगलाकारक अशीच आहे. त्याकाळी गुरूकुलात विद्यार्थी अनेक वर्षें राहून शिक्षण घेत. गुरू हा पिता व गुरुपत्नी ही माता या नात्यानंच नव्हे तर प्रेमभावनेनं सारे एकत्र राहून विद्यार्जन करत (शिक्षण घेत). शेवटी गुरुदक्षिणा देण्याचा कार्यक्रम असे. श्रीमंतांची, राजघराण्यातली मुलं भरभक्कम गुरुदक्षिणा देत असत. पण त्याचवेळी गुरुकुलात अत्यंत गरीब कुटुंबातली मुलंही शिक्षण घेत असत. श्रीकृष्णाच्याच वर्गात सुदामा नव्हता का? या निर्धन विद्यार्थ्यांनी गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय अर्पण करायचं? यासाठीसुद्धा काही नियम असायचे.
अशा गरीब विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू (उदा. विणलेलं वस्त्र, बनवलेले जोडे-पादुका इ.) गुरुंना अर्पण करायच्या. हेही नसेल तर ‘समित्पाणि’ म्हणजे हातात समिधा (यज्ञासाठी लागणार्‍या काड्या) घेऊन त्या अर्पण केल्या तरी चालत असे. या सार्‍याचा कळस म्हणजे काहीही नसलं तरी डोळ्यामधले कृतज्ञतेचे अश्रू – गुरुंच्या आपल्यावरच्या ऋणाचं स्मरण होऊन आलेलं पाणी – गुरुदेवांना प्रेमपूर्वक अर्पण केले तरी चालत होतं. महत्त्व आहे ते वस्तूला नाही तर अर्पण भावनेला!
भगवंताची गोष्टही अशीच आहे. उलट गुरु-शिष्य नात्यापेक्षा भगवंत-भक्त नातं अधिक मधुर आहे. ‘सुदाम्याचे पोहे खूप रुचकर लागले. बर्‍याच दिवसांनी इतका तृप्त झालो’. हे केवळ पोकळ उद्गार नव्हते तर भगवंताचा तो खरा अनुभव होता. या पोह्यांच्या बदल्यात भगवंतानं त्याला सुवर्णनगरी दिली. अशा प्रसंगातला भाव महत्त्वाचा असतो. बाकीचा तपशील बर्‍याच वेळा त्या- त्या काळाशी सुसंगत असतो. पण तत्त्व किंवा मूल्य (व्हॅल्यू) मात्र सर्वकाळासाठी असतं.
स्वतः भगवंत सांगताहेत- पान, फूल, फळ किंवा पाणीही मला अर्पण केलं तरी चालेल. काही प्रसंग पाहू या. त्यात आपल्यासाठी कोणतं समुपदेशन आहे यावर सहचिंतन करु या.
१. पत्रम् ः पान अर्पण करणे. द्रौपदीचा प्रसंग सर्वांना माहीत असतो. त्याचा आपल्याला असलेला संदेश पाहू या. दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुर्वास ऋषी त्यांच्या दहाहजार शिष्यांसह पांडव वनवासात असताना त्यांच्याकडे रात्रीच्या भोजनासाठी आले होते. युधिष्ठिराला सूर्यानं उपासनेचं फळ म्हणून दिलेल्या ‘सूर्यस्थाली(थाळी किंवा भांडं)’तून सूर्यास्तानंतर अन्न तयार होत नव्हतं. दुर्योधनाचा हेतू स्पष्ट होता- दुर्वासांना जेवण मिळू शकणार नाही व क्रोधानं ते पांडवांना शाप देतील. दुर्वास आल्यावर युधिष्ठिरानं नम्रपणे त्यांना शिष्यांसह स्नान करून यायला सांगितलं. इकडं द्रौपदीला मात्र ते मोठं संकट वाटलं. तिनं आर्तपणे कृष्णाचा धावा (प्रार्थना) केला त्याबरोबर तो धावून आला. त्यामुळे भूक लागली म्हणून त्यानं खायला मागितलं. ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी द्रौपदीची अवस्था झाली. कृष्णानं सूर्यस्थाली बघायला मागितली. त्याला एक पान (पत्रम्) चिकटलेलं होतं. ते खाऊन भगवान कृष्णानं तृप्तीचा ढेकर दिला. त्याबरोबर दुर्वास व शिष्यांचीही पोटं तुडुंब भरली व ते परस्पर निघून गेले.
या कथेत ‘पान’ महत्त्वाचं नाहीये पण आता काहीही दुसरा उपाय नाही असं पाहून आता केवळ कृष्णच या भावनेनं द्रौपदीनं केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे.
दुसरी कथा महाशिवरात्रीसंबंधात येते. एक व्याध (शिकारी) रात्री झाडावर चढून जलाशयाजवळच्या झाडावर लपून बसतो पाणी प्यायला आलेल्या जनावराची शिकार करण्यासाठी. रात्रभर कोणीही जनावर त्या जलाशयावर आलं नाही. या व्याधाचं एक काम मात्र चालूच होतं. झाडाची पानं तोडून खाली टाकण्याचं. ते झाड बेलाचं होतं. त्यानं नकळत टाकलेली बिल्वदलं झाडाच्या मुळाशी असलेल्या स्वयंभू शिवलिंगावर पडत होती. त्याला उपवासही घडला व उपासनाही घडली. शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाला. हा केवळ पानाचा महिमा नाही तर त्याचबरोबर त्या शिकार्‍याचं निष्पाप मनही कारण होतं. अगदी पहाटे आलेल्या हरिणीला व तिच्या पाडसांना त्यानं न मारता तसंच जाऊ दिलं कारण त्याच्यात परिवर्तन झालं होतं. केवळ हिंसेवर आधारित जीवन त्याला आता योग्य वाटत नव्हतं. असो.
२. पुष्पम् ः साधं फूल अर्पण करूनही भगवंताला आपलंसं करता येतं अन् आपलाही उद्धार करून घेता येतो. पण त्यासाठी सर्वभावानं समर्पण मात्र केलं पाहिजे. प्रसंग आहे – गजेंद्रमोक्षाचा! हत्तींचा एक राजा (कळपाचा नेता) आपल्याबरोबर काही हत्तीणींसह सरोवरात स्नान करत होता. एका मगरीनं पाण्यातून येऊन त्याचा पाय तोंडात धरून त्याला खाली ओढायला सुरुवात केली. हत्तीनं प्रयत्नांची शिकस्त केली म्हणजे सर्व सामर्थ्य वापरून पाहिलं. पण पाण्यात त्याच्यापेक्षा मगरीची शक्ती अधिक होती. आपण आता मरणार – आपला सर्वनाश होणार हे लक्षात आल्यावर सरोवरात उगवलेलं एक कमळ सोंडेनं उपटून ते अत्यंत भक्तिभावानं भगवंताला अर्पण केलं. वैकुंठातून विष्णू आला व त्यानं त्या मगरीचा वध करून गजेंद्राला सोडवलं. खरं तर दोघेही गज व मगर शापित होते व या प्रसंगानं त्या दोघांचाही उद्धार होणार होता. तसा तो झालाही पण गजेंद्राच्या सर्वस्व समर्पण भावामुळेच. त्याचप्रमाणे रुक्मिणीच्या भक्तिपूर्वक केलेल्या अर्पणामुळे साध्या तुलसीदलानं कृष्णाला तोललं.
३. फलम् ः ही कथाही पूर्णभावानं अर्पण केलेल्या साध्या पानाचा महिमाच सांगते. शबरीची कथा तर सुपरिचित आहेच. ‘उष्टी बोरं’ साक्षात् परब्रह्म राम (आपला मोठा भाऊ) खातोय हे पाहून लक्ष्मणाच्या चेहर्‍यावर विचित्र भाव उमटले – याला उद्देशून ‘गीतरामायणांत’ राम उद्गारतो- ‘
का सौमित्री (सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण) शंकित दृष्टि| अभिमंत्रित ही नव्हेत उष्टी॥
साध्या भिल्लीणीनं ज्या भावनेनं बोरं चाखून अर्पण केली होती तो भाव श्रीरामाला खूप महत्त्वाचा वाटला. संतवाङ्‌मयात नेहमी या प्रसंगाचा उल्लेख असतो भक्तिभावाचं व समर्पणाचं माहात्म्य सांगण्यासाठी. ही रचना हा भाव व्यक्त करते- ‘लोग कहते हैं भगवान खाते नहीं|
भिलनी की तरह हम खिलाते नहीं॥
महत्त्व आहे ते समर्पण भावनेला, वस्तूला वा पदार्थाला नव्हे.
रविंद्रनाथ टागोरांना एकदा जपानमध्ये रेल्वेनं प्रवास करताना फळं हवी होती. पण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर काही त्यांना मिळाली नाही. एका छोट्या विक्रेत्याला त्यांनी त्याबद्दल विचारलं. पण त्या मुलाकडेही फळं नव्हती. काही स्टेशनं गेल्यावर तो मुलगा फळांनी भरलेली टोपली घेऊन आला. त्याचे पैसे न घेता तो एवढंच म्हणाला, ‘ही फळं घ्या. पण कधीही कुणालाही म्हणू नका की जपानमध्ये मला फळं मिळाली नाहीत’. इथं फळं मोलाची नाहीत खरं मोल आहे त्या छोट्याच्या राष्ट्रभक्तीचं! असे संस्कार असलेल्यांचा स्वतःचा उद्धार होतोच पण त्यांच्या कुटुंबाचा, देशाचाही होतो.
४. तोयम् ः- म्हणजे पाणी! साध्या पाण्याच्या बदल्यात मोक्षाचं फळही मिळू शकतं. या संदर्भात राजा रंतिदेवाची कथा प्रसिद्ध आहे. मोठा दुष्काळ पडल्यामुळे त्याच्या राज्यातील लोक व पशुपक्षी सारे अन्नपाण्याविना मरू लागले होते. आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यभावनेनं राजानं अनेक दिवस उपोषण सुरू केलं होतं. ज्यावेळी ते सोडायची वेळ आली तेव्हा रंतिदेवाचे प्राण अगदी कंठाशी आले होते. राजगुरुंनी त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. तो ते पिणार त्याचक्षणी एक आसन्नमरण म्हणजे कोणत्याही क्षणी मरेल अशा अवस्थेतला एक याचक तिथं आला. राजानं स्वतःचा मृत्यू दिसत असूनही ‘अतिथी देवो भव’ या भक्तिभावनेनं ते सारं पाणी त्या याचकाला मनोभावे अर्पण केलं. त्याची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी भगवान दत्तात्रेय आले होते. प्रकट होऊन त्यांनी राजाला आशीर्वाद दिला व त्याची मनोकामना पूर्ण होईल म्हणजेच पाऊस पडून राज्य पुन्हा आबादीआबाद झालं. ही महती आहे अर्पण भावनेची.
भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी युद्धासंबंधी बोलणी (शिष्टाई) करण्यासाठी हस्तिनापूरला आले असताना त्यांच्या स्वागताची, भोजनाची सारी तयारी दुर्योधनानं आधीच करून ठेवली होती. पण प्रत्यक्षात दुर्योधनाची कपटी वृत्ती पाहून कृष्ण स्वतःच विदुराकडे जेवायला गेला. त्यावेळी धृतराष्ट्रानं विदुराचा त्याग केला होता कारण तो सतत दुष्ट दुर्योधनाला पांडवांची बाजू न्याय्य कशी आहे हेच पटवून देत होता. यानंतर विदुर अरण्यात जाण्याऐवजी हस्तिनापुरातच अत्यंत गरीब अवस्थेत राहत होता. कृष्ण अचानक त्याच्या घरी जेवायला गेला तेव्हा विदुर काही कामानिमित्त बाहेर गेला होता. विदुरानी (विदुराची पत्नी) एकटीच घरी होती. कृष्णाला पाहून तिला काय करू नि काय नको असं होऊन गेलं. त्याचं स्वागत केलं. त्याला खाण्यासाठी केळं दिली. आपण सोलून द्यावीत या पवित्र भावनेनं ती केळी सोलू लागली अन् नादात, देहभाव नष्ट झाल्यामुळे ती कृष्णाला सालं खायला देऊन केळी स्वतःच खाऊ लागली. कृष्ण आनंदानं केळीची सालं खाऊ लागला. त्याचवेळी विदुर आला. त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. वाईटही वाटलं. पण भगवान श्रीकृष्ण तृप्त होऊन म्हणाला, ‘विदुरा, आयुष्यात केळी खूप खाल्ली, पण सालीही इतक्या स्वादिष्ट असतात हे आज प्रथम कळलं. इथंही विदुरानीचा भक्तिभाव महत्त्वाचा आहे.
एकूण काय भगवंताला प्रसन्न करायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं याचा अर्थ काय? भगवंत म्हणजे मूर्तिमंत आनंद. कशावरही अवलंबून नसणार्‍या, कोणत्याही अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीत मिळू शकणार्‍या आनंदालाच भगवंत म्हणायचं. भगवंताचा साक्षात्कार झालेली किंवा भगवंताच्या अनुभवात डुंबत असलेली व्यक्ती आनंदानं भरलेली व भारलेली असते जसं बर्फात पाणी नि साखरेत गोडी.
आपल्याला असा आनंद अखंड मिळवण्याची युक्ती इथं भगवंत सांगून राहिलेयत. कारण अशी आनंदी व्यक्ती आपल्या भवतीच्या इतरांनाही आनंदी बनवते. यासाठी भगवंताला मंदिरात जाऊन तिथल्या मूर्तीला वा आपल्याला आदरणीय व पवित्र वाटणार्‍या श्रेष्ठ व्यक्तीला ‘पत्रंपुष्पंफलंतोयम्’ अर्पण करायचं. हे खूप सोपं आहे. अनेक जण हे करतही असतात पण ते अक्षय आनंदात राहात असतात का? आसपासच्या इतर संबंधित लोकांना आनंदी बनवतात का? आपला अनुभव वेगळाच असतो.
इथं वस्तू किंवा पदार्थ अर्पण करणं या उपचाराला महत्त्व नाहीच आहे तर जीवनात जे जे काम आपल्या वाट्याला आलंय ते कोरड्या कर्तव्यभावनेनं न करता प्रेमानं, आपुलकीनं, आत्मियतेच्या भावनेनं केलं पाहिजे. जसं आपले हात आपल्याला भरवतात किंवा दुखणारं अंग आपलं आपणंच चेपतो अन् त्यात काहीही विशेष करतो असं आपल्याला वाटत नाही तितक्या सहजपणे इतरांसाठी काम करणं, त्यांची सेवा करणं महत्त्वाचं. खर्‍या भक्तीचंच नव्हे तर समाधानी संपन्न व धन्य जीवनाचं हेच रहस्य आहे. इतकं सोपं व सहज असूनही आपल्याला का जमत नाही? अहंकारशून्य बनून अर्पण करता येत नाही म्हणून.. विदुरानीसारखं नि शबरीसारखं!
……………………………………………………..

Leave a Reply