सज्जता आहे?

अल कायदा आणि आयएसआयएस यांनी मिळून गोव्यासह देशातील काही महत्त्वाच्या पर्यटनकेंद्रांवर घातपात घडवून आणण्याचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी नुकताच दिला आहे. अल कायदाने भारतात आपली शाखा स्थापन केल्याचे अलीकडेच जाहीर केले होते. तिकडे इराक आणि सीरियामध्ये बराच मोठा भूभाग गिळंकृत करून तेथे आपली राजवट स्थापन करणार्‍या आयएसआयएसला भारतात विशिष्ट घटकांकडून समर्थन मिळू लागल्याच्या बातम्याही अधूनमधून येत असतात. मुंबईचे काही तरूण आयएसआयएसला जाऊन मिळाले, तामीळनाडूतील काहींनी त्या संघटनेला पाठिंबा दर्शवणारी स्वतःची छायाचित्रे झळकवली, श्रीनगरमध्ये त्या संघटनेचे झेंडे नाचवले गेले. हे सगळे जे चालले आहे, ते पाहिले तर या संभाव्य धोक्याची भीषणता आपल्याला जाणवल्यावाचून राहणार नाही. गोवा हे तर दहशतवाद्यांचे पूर्वीपासून लक्ष्य राहिले आहे, कारण येथे मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. बर्‍याच वर्षांपूर्वी गोव्यातील पाच ठिकाणांची घातपाती हल्ल्याच्या दृष्टीने रेकी करण्यात आली होती आणि त्यासाठी कर्नाटकातून आलेला एक दहशतवादी म्होरक्या परत जाताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने चुकून पोलिसांच्या हाती लागला होता आणि त्याच्या संशयास्पद वागण्यातून त्या गंभीर कटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर भटकळ बंधूंच्या इंडियन मुजाहिद्दीनविरुद्ध आपल्या सुरक्षा यंत्रणांनी फास आवळत नेले, तेव्हापासून देशातील घातपाती कारवायांना थोडा आळा बसला. मात्र, ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे, हे आता नव्या धमक्यांमुळे जाणवू लागले आहे. गोव्यामध्ये ज्या पाच ठिकाणांची जवळजवळ दहा वर्षांपूर्वी रेकी करण्यात आली होती, त्यामध्ये कळंगुटसारखी पर्यटनस्थळे तर होतीच, पण हणजूण व हरमल येथील ज्यूंच्या छबाड म्हणजे प्रार्थनाकेंद्रांचाही त्यात समावेश होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड कोलमन हेडली यानेही गोव्यातील या ठिकाणांची संभाव्य हल्ल्याच्या दृष्टीने पाहणी केली होती असेही उघड झाले होते. हे सगळे पाहिले, तर ज्यूंच्या या प्रार्थनाकेंद्रांना लक्ष्य केले जाण्याची मोठी शक्यता आहे. दहशतवाद्यांचा रोख अधिकतः विदेशी पर्यटकांवर राहील, कारण तसे केल्याने जागतिक प्रसारमाध्यमांचे लक्ष त्या घटनेकडे वेधले जाते आणि त्याचा परिणामही सर्वदूर होत असतो. त्यामुळे गोव्यात आता पर्यटक हंगाम सुरू झालेला असल्याने विदेशी पर्यटकांची रीघ लागणार असल्याने साहजिकच धोका वाढला आहे. आता दिवाळी आहे. नंतर सेंट झेवियरच्या शवदर्शन सोहळ्याचे आयोजन ही एक फार मोठी जबाबदारी आहे. त्यानंतर नववर्ष तर आहेच. नुकत्याच काही सुट्या जोडून आल्या तर पर्यटकांची जी प्रचंड रीघ गोव्यात लागली, तेव्हा सरकारच्या सार्‍या यंत्रणा कशा कोलमडून गेल्या ते आपण पाहिले. येणार्‍या काळात याहून अधिक संख्येने पर्यटक गोव्यात येणार आहेत. त्यांचे व्यवस्थापन कसे करणार, त्यांच्या वाहनांपासून गोव्याचे रस्ते कसे मुक्त करणार, त्यांना आणि अन्य गोमंतकीयांना सुरक्षा कशी पुरविणार असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचे उत्तर जबाबदार पोलीस अधिकार्‍यांनी द्यायला हवे. दहशतवादी शक्तींशी मुकाबला करण्यास आपले पोलीस दल मुळात सक्षम आहे का? त्यासाठीचे प्रशिक्षण आणि मुख्य म्हणजे अद्ययावत उपकरणे यांनी ते सज्ज आहेत का याचेही उत्तर जनतेला द्यावे लागेल. दहशतवादाच्या घटना घडू नयेत या दृष्टीने कोणकोणती खबरदारी आपल्या सुरक्षा यंत्रणा घेणार आहेत? काही काळापूर्वी देशात अकरा शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवणार्‍या यासिन भटकळने आपल्याला सूरतवर अणूबॉम्ब टाकायचा होता आणि त्यासाठी छोट्या आकाराचे अणुबॉम्ब तयार करता येतील का याची चाचपणी आपण करीत होतो असे जबानीत कबूल केले होते. दहशतवाद्यांची मजल आता कुठवर जाऊ लागली आहे हे सांगण्यास ही मग्रूर भाषा पुरेशी आहे. अशा नवनव्या आव्हानांना सामोरे जाणे सोपे नाही. राष्ट्रीय सुरक्षा दलासारख्या आपल्या खास या कामासाठीच निर्माण केलेल्या दलापाशीही आज स्वतःची गुप्तचर यंत्रणा नाही. त्यांची रासायनिक व जैविक हत्यारांचा मुकाबला करण्याची आजही सज्जता नाही, तेथे पोलिसांचा काय निभाव लागणार? सुरक्षेच्या विषयाकडे आत्यंतिक गांभीर्याने पाहण्याची वेळ निश्‍चितच येऊन ठेपली आहे. दहशतवादाचे संकट वेशीवर उभे आहे.

Leave a Reply