राडा भोवला

शिवसेनेने दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनामध्ये केलेल्या ‘राडा’ शैलीच्या आंदोलनाला त्यांना अनपेक्षित असलेले धार्मिक वळण मिळाल्याने ते पूर्णपणे अंगलट आले आहे. संसदेमध्येही त्याचे पडसाद गेले दोन दिवस उमटले. सनदशीर मार्गांनी आंदोलन करता येते हे शिवसेनेला स्थापनेपासून कधीच मान्य नव्हते आणि आजही त्यांना ते मान्य झालेले दिसत नाही. त्यामुळे दांडगाईच्या बळावर प्रश्न सोडविण्याची त्यांची आक्रमक वृत्ती दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील गैरसोयींविरुद्धच्या आंदोलनात प्रकटली आणि कर्मधर्मसंयोगाने ज्याच्या तोंडात जबरदस्तीने चपाती कोंबण्याचा प्रयत्न झाला तो मुसलमान निघाल्याने आणि त्याने आपला रमजानचा उपवास तोडण्याचा प्रयत्न झाला आणि आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केल्याने हे प्रकरण सेनेच्या अंगलट आले आहे. शिवसेनेचे आंदोलन हे नव्या महाराष्ट्र सदनातील गैरसोयींविरुद्ध होते हे खरे असले तरी ज्या प्रकारे हे आंदोलन झाले, तो मार्ग सनदशीर नव्हता आणि त्यातूनच पुढचा सारा घटनाक्रम घडला. एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी या खासदारांनी त्याच्या तोंडात चपाती कोंबली असे म्हणता येणार नाही. तसा गदारोळ करणार्‍यांना या विषयाचे केवळ राजकीय भांडवल करायचे आहे. पण चपाती कितीही निकृष्ट दर्जाची असली तरी एखाद्याच्या तोंडात ती जबरदस्तीने कोंबण्याचा प्रयत्न करणे ही दांडगाई कायद्याने गुन्हा आहे. या खासदारांनी महाराष्ट्र सदनामधील भिंतीवरचे घड्याळ तोडले, निवासी आयुक्तांच्या खोलीत ‘जय महाराष्ट्र’ लिहिले अशी नवी माहितीही आता समोर आली आहे. आंदोलनाची ही तर्‍हा सेनेची खासीयत जरी असली, तरी कायदा हाती घेण्याचा हा प्रकार लोकप्रतिनिधींना तरी शोभादायक नाही याचे भान या खासदारांनी ठेवणे आवश्यक होते. दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन प्रशस्त आहे, सुंदर आहे, परंतु सुरवातीपासून ते वादाचा विषय बनले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्याच्या उभारणीतील भ्रष्टाचार पुराव्यांनिशी समोर आणला होता. तेथे अनेक गैरसोयी असल्याची खासदारांची तक्रार आहे. तेथे पिण्याचे पाणी नाही, कँटिनचा दर्जा चांगला नाही, महाराष्ट्रातील खासदारांना सापत्न वागणूक मिळते अशा तक्रारी बरेच दिवस येत होत्या. शिवसेनेचे खासदार गेले काही दिवस त्याविरुद्ध आवाज उठवीत होते. त्या तक्रारींची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच घेतली असती, तर पुढचा प्रकार टळला असता. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशी सुरू केली आहे, परंतु या नव्या वादात मूळ विषय बाजूला पडला आहे. शिवसेना केंद्रात सत्तेत सहभागी असल्याने आणि महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने या विषयाला जेवढे भडक रूपात मांडता येईल, तेवढे मांडण्याचा पद्धतशीर प्रयत्नही सुरू झालेला सध्या दिसतो. हा प्रकारही गैर आहे. अशाने धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. औवैसी, रमेश बिधुडी वगैरेंनी संसदेत जी बेताल बडबड केली, तीही आक्षेपार्ह आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने ट्वीटरवरून या प्रकरणात अत्यंत चिथावणीखोर, प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि तो अतिशय घातक ठरेल. शिवसेनेच्या खासदारांनी जे दुर्वर्तन केले, त्याची भरपाईही केवळ माफी मागून होणार नाही. खरे तर ते माफी मागायलाही तयार नव्हते. १७ जुलै रोजी महाराष्ट्र सदनामध्ये सदर प्रकार घडला. जेव्हा त्याचा गवगवा झाला, तेव्हा असे काही घडलेलेच नाही असा त्यांचा दावा होता. नंतर जे घडले त्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांतून समोर आला, तेव्हा आपल्याकडून काही चुकीचे घडले हे मान्य करायलाही राजन विचारे तयार नव्हते. ‘ही चपाती खाऊन बघ’ एवढेच आपण सांगत होतो असा त्यांचा दावा असला, तरी विचारे संतापाच्या भरात त्याच्या तोंडात चपाती कोंबत आहेत याचा दृश्य पुरावा आता उपलब्ध आहे. आता चहुबाजूंनी घेरले गेल्यानंतर सेनेचे नेते दिलगिरीची भाषा बोलत असले, तरी केवळ दिलगिरीतून या वादग्रस्त वर्तनाबाबत मिटवामिटवी करणे योग्य नव्हे. लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळाला काय? आंदोलनाचे निमित्त करून दांडगाई करणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले, तरच अशा प्रकारांना थोडा चाप बसेल आणि हाफीज सईदसारख्यांना अशा विषयाचा फायदा उपटत जातीय देशात तेढ पसरवण्याची संधी मिळणार नाही.

Leave a Reply