योगमार्ग – राजयोग

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५१)

(स्वाध्याय – १९)

चहूकडे नजर फिरवली की लगेच लक्षात येते की विश्‍वाची परिस्थिती महाभयंकर आहे. मानवा-मानवांमध्ये विविध तर्‍हेचे भेदाभेद आहेत म्हणून तंटे-लढाया चालू आहेत. त्याला जोडून नैसर्गिक आपत्ती वाढतातच आहेत. त्याशिवाय सामाजिक समस्या तर आहेतच. माणूस हा माणसापासून, निसर्गापासून, भगवंतापासून दूर चालला आहे. म्हणूनच स्वाध्यायाची नितांत आवश्यकता आहे. 

ऋषींनी, संतमहात्म्यांनी सांगितले की ‘स्वाध्याय करण्यात प्रमाद (आळस) करू नका. त्यामुळेच जीव-जगत-जगदीश यांचा मूलभूत परस्पर संबंध काय आहे ते समजेल. विविध आपत्तींसाठी – वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, वैश्‍विक समस्यांसाठी हा एकमेव उत्कृष्ट उपाय आहे.
अनेक लोक, संप्रदाय, स्वाध्याय करतातही. पण स्वाध्याय म्हणजे आहे तरी काय हे नक्की न समजल्यामुळे स्वाध्याय कसा, केव्हा, का, किती करावा?… असे विविध प्रश्‍न आमच्यासारख्या सामान्य जनांना पडतात.
पू. पांडुरंगशास्त्री यांचे कार्यच ‘‘स्वाध्याय’’ आहे. त्याचा अभ्यास करता करता थोडा बोध होतो. शास्त्रीजी म्हणतात की काही जण स्वाध्यायाला मानसिक दृढता तसेच बौद्धिक स्थिरता आणण्यासाठी वापरण्यात येणारे औषध समजतात. स्वाध्याय जीवनाचे औषध आहेच. पण औषध आपण आजारी पडतो तेव्हाच घेतो. निरंतर घेत नाही. म्हणून औषध हा शब्द परिपूर्ण नाही.
इतर काही व्यक्ती स्वाध्यायाला अन्न मानतात. काही अंशाने हे बरोबर आहे. कारण जसे अन्न दररोज घ्यावे लागते तसा स्वाध्यायसुद्धा दररोज व नियमित करावा लागतो. पण पुढे विचार केला तर लक्षात येते की अन्न दिवसातून दोन-तीन वेळा किंवा ठरावीक वेळेनंतर घेतले जाते. त्यामुळे अन्नाची उपमाही पर्याप्त नाही.
शास्त्रीजी म्हणूनच पुढे जाऊन म्हणतात की स्वाध्याय हा प्राणवायू आहे. जन्मतःच म्हणजे मातेच्या गर्भाशयात आल्यापासूनच माणूस फुप्फुसाद्वारे प्राणवायू आत घेतो आणि नंतर रक्ताद्वारे सर्व शरीरात पोहोचतो. हे कार्य जन्माला आल्यापासून नियमितपणे चालू असते. प्राणवायूमुळे प्रत्येक पेशी प्रफुल्लित, चैतन्यमय होते. जागृतावस्थेत, झोपेत, उठता-बसता, हिंडता-फिरता, खाता-पिता अशा प्रत्येक कृतीत व स्थितीत प्राणवायूची गरज असते व ती मृत्यूच्या म्हणजे शेवटच्या घटकेपर्यंत अत्यंत आवश्यक असते व चालू राहते. खरेच, अशी उपमा दिल्यामुळे स्वाध्यायाचे महत्त्व कळते. त्याची गरज लक्षात येते. तो केव्हा करावा याची दृष्टी येते. म्हणजेच स्वाध्यायाची समग्रता, व्यापकता, स्पष्टता लक्षात येते.
शास्त्रीजी सांगतात की ‘स्व’ म्हणजे शरीरात असलेले चैतन्य व त्याला चिकटलेला अहम् व इच्छा. यामध्ये दोन्ही गोष्टी मुख्य आहेत…
१. स्वतःचा ‘स्व’ ओळखणे.
२. दुसर्‍याच्या ‘स्व’ बद्दल आदर असणे.
म्हणजेच आत्मगौरव व परसन्मान!
सर्व विश्‍वांत अनेक समस्या या अहंमुळेच उत्पन्न होतात. म्हणून मानसोपचार तज्ज्ञ अहंकारावर बोलतात, लिहितात- अहंकार = अहं + आकार.
या ‘अहं’चा आकार दोन प्रकारचा असतो. एक ‘अहंगंड’ आणि दुसरा ‘न्यूनगंड’.
अहंगंड – बहुदा सगळीकडेच दिसतो. ज्याच्याकडे विद्या, संपत्ती, सत्ता असते त्यांना आपल्या मोठेपणाचा फारच गर्व असतो. मग ते ज्यांच्याकडे या गोष्टी नसतात त्यांच्याकडे हीन दृष्टीने बघतात. कित्येकवेळा त्यांच्यावर अत्याचारही करतात. काही जणांकडे अफाट शक्ती (शारीरिक) असते. ते गुंडगिरी करतात. काहीजण सज्जन असतात. ते फार भक्ती करतात. पण त्या भक्तीचासुद्धा त्यांना अहंकार होतो. म्हणून शास्त्रीजी अनेकवेळा म्हणतात, की भक्तीचा अहंकार फार वाईट असतो. तो त्या व्यक्तीचा नाश करू शकतो.
या सर्व गोष्टींचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महान शिवभक्त रावण! सर्व शक्ती असलेला हा भक्त होता. पण अहंकारामुळे विध्वंसक ठरला. राक्षस मानला गेला. काही तत्त्ववेत्ते म्हणतात की रावणाने आपल्या सर्व शक्तींना व भक्तीला जर जीवन- विकासाकडे वळविले असते तर तो कदाचित रामापेक्षा मोठा ठरला असता. पण तो स्वार्थाने, अहंकाराने आंधळा झाला होता. स्वतःचा तर नाश त्याने केलाच पण त्याबरोबर कुटुंबाचा व समाजाचाही सर्वनाश केला. आजच्या जगात पदोपदी असे अनेक रावण भेटतात. त्यांना परसन्मान करायला हवा, याची जाणीवच नसते आणि ती करून दिली तरी त्यांना क्रोध येतो. सांगणार्‍यावरच ते उलटतात.
काही व्यक्तींना न्यूनगंड असतो. बहुतेकजण ज्यांच्याकडे विद्या, संपत्ती नसते किंवा जीवनात ज्याला अपयश येते किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडत नाही असे लोक या गटात असतात. जीवनात त्यांना रस असतो. त्यांना औदासिन्य येते. काहीजण आत्महत्यासुद्धा करतात.
तत्त्ववेत्ता फ्रॉड आणखी एक प्रकारचा गंड आहे असे सांगतो- तो म्हणजे ‘भयगंड’. थोड्या व्यक्तींना भीतीच वाटते. सर्व घटनांची भीती, विविध माणसांची भीती, अनेक परिस्थितींची भीती, वर्तमानाची भीती, भविष्याची भीती. त्यामुळे या व्यक्ती बेचैन असतात. त्यांचा कुणावरही विश्‍वास नसतो – ना स्वतःवर, ना इतरांवर, ना भगवंतावर. त्यांना मानसिक रोग होतात. अनेकांना जन्मभर मानसोपचार तज्ज्ञाकडून नियमित औषधे घ्यावी लागतात. कारण त्या भीतीपासून ते बाहेरच येत नाही कारण बहुतेक वेळा त्यांची भीती काल्पनिक असते. असे हे ‘अहम्’चे तीन गंड.
यावर उत्तम उपाय म्हणजे ‘शास्त्रशुद्ध’ स्वाध्याय. पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-
* स्वाध्यायामध्ये पहिली गोष्ट करायची म्हणजे –
– स्वतःचा म् मृदू बनवणे आणि त्यानंतर
– अहम् ला हळूहळू प्रभूमध्ये विलीन करणे.
अहम्ला मृदू बनविणे म्हणजे वस्तुनिष्ठ अहम्ला प्रभुनिष्ठ बनविणे. शास्त्रीजी विचारतात, अहम् प्रभुनिष्ठ केव्हा बनतो? मग तेच उपायही सांगतात- त्या अहम्‌च्या पाठीमागे ‘मी कोणाचा तरी आहे’, अर्थात् ‘मी प्रभूचा आहे’ अशा तर्‍हेची बदललेली वृत्ती निर्माण होते तेव्हा असा मृदू बनलेला म् प्रभूमध्ये सहज विलीन होतो.
हे सर्व तत्त्वज्ञान ऐकले किंवा वाचले की काही जणांना ते अगदी सोपे वाटते तर इतरांना कठीण व अशक्य वाटते. म्हणूनच नियमित स्वाध्याय हवा- प्राणवायूसारखा
अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट, पवित्र जागा हवी. ती जागा म्हणजे ‘स्वाध्याय केंद्र’. आद्य भारतात आपली मंदिरे म्हणजे अशी केंद्रे होती. पण आता बहुतेक मंदिरात ही सोय उपलब्ध नाही. तिथे भक्तीचे कर्मकांड होते. पण नियमित स्वाध्याय होत नाही.
ही गरज लक्षात ठेवून अनेक संप्रदाय, संस्था आपली स्वाध्याय केंद्रे चालवतात. पू. पांडुरंगशास्त्रींजींची अशी केंद्रे आहेत. त्यांचे वडील वे.शा.सं. श्री. वैजनाथशास्त्री आठवले यांनी १९८६ साली मुंबईच्या मध्यभागी असलेल्या गिरगावातील माधवबागेत श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा स्थापन केली. तिथे नियमित स्वाध्याय चालतो. त्याशिवाय सर्व विश्‍वात स्वाध्यायकेंद्रे चालतात. इथे वेदांचा जिवंत, तेजस्वी, विजिगीषू जीवनवाद ऐकायला मिळतो.
ही फक्त सुरुवात आहे. दर आठवड्यात विशिष्ट ठरलेल्या दिवशी व वेळी एक तास केंद्रात भेटणे. इथेच स्वाध्याय आपल्या जीवनात आणायची सुरुवात होते. अहम्ला अपेक्षित वळण मिळते.
स्वाध्याय केंद्रात सर्व स्तरातील व्यक्ती-बंधू-भगिनी येतात. इथे फक्त ‘दैवी भ्रातृभाव’ असतो. कसलाही भेदभाव नाही. सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब सर्व वर्णांतील व्यक्ती एकमेकांच्या जवळ बसतात. केंद्राबद्दल बोलताना शास्त्रीजी सांगतात- ‘स्वाध्याय केंद्र ही भगवंताची पवित्र जागा आहे. इथे आत मान मिळावा ही अपेक्षा ठेवू नका पण बाहेर गेल्यावर मान द्यायला शिका.’
खरेच, जे अशा केंद्रात नियमित जातात, त्यांचा अनुभव आहे की व्यक्ती विचार ऐकता ऐकता ज्ञानमय तसेच चैतन्यमय होऊन बाहेर निघते. जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती त्यांना इथे मिळते. एक आठवडा जरी चुकला तरी बेचैनी वाटते. प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा अशी ही जागा आहे. मानवाच्या सर्वांगीण जीवन-विकासासाठी उत्कृष्ट – संदर्भ ग्रंथ – ‘एषः पन्था एतत्‌कर्म’- पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित.

Leave a Reply