मठग्राममधील विराट वटवृक्ष

0
251

– डॉ. सोमनाथ कोमरपंत
मडगाव शहराला समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. १९१० नंतरच्या कालखंडात गोमंतकात सांस्कृतिक उत्थानाचे नवे पर्व निर्माण झाले. त्याची परिणती म्हणून येथे सामाजिक, वाङ्‌मयीन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अनेक संस्था स्थापन केल्या गेल्या. सुशिक्षितांची पहिली पिढी सृजनशील साहित्यनिर्मितीकडे वळली. मडगावमध्ये ध्येयवादी तरुणांच्या अंतःप्रेरणेने ‘गोमंत विद्या निकेतन’ ही संस्था निर्माण झाली. आज शतकाची परिक्रमा पूर्ण करून गतिमान युगाकडे ती वाटचाल करीत आहे. संपूर्ण गोमंतकाचा एक मानबिंदू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेला जाण्यापूर्वी १८९२ साली स्वामी विवेकानंदांचे मडगाव नगरीत आगमन झाले होते. खाप्रूमाम पर्वतकर यांच्याबरोबर त्यांची लय, ताल आणि सूर यासंदर्भात जुगलबंदी झाली होती. १८ जून १९४६ रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांनी याच शहरात गोमंतकाच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे रणशिंग फुंकले होते. तत्कालीन तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते.या इतिहासाचे आणि संचिताचे प्रगल्भतेने भान बाळगणारा एक परिणतप्रज्ञ आणि विराट वटवृक्ष ९० वर्षांच्या पूर्तीप्रसंगी आत्मनिर्भर वृत्तीने उभा आहे. त्याची जीवनेच्छा अभंग आहे. इतरांना ती प्रेरणा देणारी आहे. कृतिशीलतेचा मंत्र देणारी आहे. परिस्थितिजन्य संकटांमुळे समाजात निर्माण झालेले कश्मल घालविणारी आहे. अनेक मिती असलेल्या या वटवृक्षाचे नाव आहे प्राचार्य भिकुबाब पै आंगले. वटवृक्षाचे गुणवैशिष्ट्य असे असते की त्याच्या पर्णशाखा आकाशात विलसत असतात. असंख्य पारंब्या भूमीशी हृदयसंवाद करीत असतात. अनेक पक्ष्यांचे ते विश्रांतिस्थल असते. याच्या संस्कारशील बीजात महान वटवृक्ष होण्याचे दृढ आश्‍वासन असते. भिकुबाबांच्या सान्निध्यात गेल्यावर या सार्‍या गुणवैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. पक्ष, पंथ आणि प्रणाली कुठलीही असूद्या, या माणसाकडे माणसे आकर्षून घेण्याची चुंबकीय शक्ती आहे. त्यांच्या चेहर्‍यावरचे मोहक हास्य हे त्यांच्या चिरतारुण्याचे प्रतीक आहे. बत्तीस वर्षांतील गाठीभेटीत आणि सहवासात मी त्यांना कधी दुर्मुखलेले पाहिले नाही. त्यांच्या चेहर्‍यावर निराशेचा तवंग कधी दिसला नाही. अध्ययन, अध्यापन, नाट्यलेखन, अभिनयकला, दिग्दर्शन आणि वाङ्‌मयाचे वाचन-लेखन यांची नव्याने संथा घेणार्‍यांना आजही मार्गदर्शन करायला ते तत्पर असतात. आपण ज्या प्रकारच्या मुशीतून घडलो त्याविषयीची कृतज्ञताबुद्धी ते निरंतर बाळगतात. याच प्रकारच्या प्रयोगशाळेतून समाजमनस्क माणसे घडावीत आणि समाजाची निरपेक्ष वृत्तीने त्यांनी सेवा करावी हा त्यांचा ध्यास आहे. ‘आधी केले; मग सांगितले’ अशी निर्मम वृत्ती त्यांच्या अंतरंगात आहे. ‘आमच्या वेळी असं होतं’ असा सूर व्यक्त न करता स्वागतशील मनाने गतिमान समाजाकडे ते पाहू शकतात. त्यामुळे त्यांची नातवंडेदेखील त्यांची सुहृद होऊ शकतात. समान पातळीवर येऊन सुसंवाद साधण्याची आणि माणसे जोडण्याची अजोड कला त्यांना अवगत आहे. त्यांच्याकडे सत्य सांगण्याची परखड वृत्ती आहे. पण ते कटुता कधी ठेवत नाहीत. विद्यार्थिदशेपासून अंगी बाणवलेली शिस्तप्रियता हे त्यांच्या उज्ज्वल यशाचे गमक आहे. शालेय अभ्यासात, क्रीडांगणावर आणि वक्तृत्वकलेत ते सतत आघाडीवर राहिले. अभिनयकला ही तर त्यांच्या नसानसांत भिनलेली. शिस्तीमुळे व्यक्तिमात्रांचा सर्वांगीण विकास होतो; शिस्तीमुळे राष्ट्र मोठे होते हे त्यांनी पुरतेपणी ओळखले होते. शिस्तीबरोबरच नियोजनबद्धता आणि अखंडित परिश्रम करण्याची तयारी हेही त्यांचे गुणविशेष आहेत. मडगावच्या २२व्या ‘गोमंतक मराठी साहित्यसंमेलना’च्या कार्याध्यक्षपदाची ते धुरा वाहताना आणि ‘शालान्त परीक्षा मंडळ, गोवा’च्या पाठ्यपुस्तकनिर्मितीचे ते अध्वर्युपद सांभाळताना मला त्यांचे जवळून दर्शन घडले. त्यांच्याबरोबर काम करणे हा एक आनंदानुभव होता. व्युत्पन्नता, रसज्ञता आणि अष्टावधानीपणा यांमुळे अनेक आव्हाने ते सहजतेने पेलत. वृत्तिगांभीर्याबरोबर नर्मविनोदी वृत्तीने ते सर्वांची मने जिंकत असत.
***********
प्राचार्य भिकुबाब पै आंगले यांच्या संवेदनक्षम वयापासून तारुण्याच्या नव्हाळीपर्यंतचा जडणघडणीचा कालखंड आणि त्यापुढचा त्यांच्या दीप्तिमान कर्तृत्वाचा आलोक न्याहाळणे आवश्यक आहे. नव्या पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या बालपणाचा काळ त्यांनी नेरूल या निसर्गरम्य भूमीत घालविला. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. उन्हाळ्यात तर्‍हेतर्‍हेच्या भाजीपाल्याची पैदास केली जायची. फळफळावळ पिकविली जात असे. त्यामुळे श्रमांचे मूल्य भिकुबाबांना लहानपणीच कळले. त्यांच्या आत्याबाई राधाबाई भोबे यांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले. गोपाळकृष्ण भोबे आणि श्याम भोबे या सन्मित्रांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचे भावजीवन बहरत गेले. नाट्यप्रेमाचे बीज इथेच पडले. सुंवारीवादन, दशावतारी काला, गौळण काला व रोमट इत्यादी पारंपरिक कलाप्रकारांत त्यांचे मन रमू लागले. नेरूलच्या शाळेत प्रख्यात इतिहाससंशोधक डॉ. पां. स. पिसुर्लेकर हे त्यांना तीन महिन्यांकरिता शिक्षक म्हणून लाभले. आपल्या संग्रहातील इसापनीती आणि अन्य छोटी पुस्तके त्यांनी भिकुबाबांना वाचायला दिली. पिसुर्लेकरांकडून त्यांना अशा प्रकारे वाचनाचा बीजमंत्र मिळाला. पिसुर्लेकर येथून पणजीला गेले आणि भिकुबाब त्यांच्या सहवासाला मुकले.
प्राथमिक शिक्षण हा मुलाच्या संस्कारांचा पहिला टप्पा. हा पाया दृढ झाला तर पुढची इमारत मजबूत होते. भिकुबाब याबाबतीत अतिशय भाग्यवान ठरले. वालावलकर आणि रेडकर या कुशल शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांच्या अक्षराला त्यांनी उत्तम वळण दिले. आज नव्वदीतदेखील भिकुबाबांचे देखणे हस्ताक्षर पाहणे हा आल्हाददायी अनुभव आहे. रामदासांनी वर्णन केल्याप्रमाणे व्यवस्थित शीर्षरेषा… अक्षरांच्या वळणा-वाकणांत कुठेही कंप नाही… सर्व अक्षरे समान आकाराची… पत्रातील शेवटचा मजकूरही नीटनेटक्या अक्षरांत…
रेडकरांनी भिकुबाब यांचा गणित विषय पक्का करवून घेतला. या वयातच त्यांच्यावर राष्ट्रप्रेम, समाजप्रेम आणि नीतिमत्ता यांचे संस्कार केले. मराठी चौथीनंतर पोर्तुगीज ‘सेगुंदग्राव’पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.
एप्रिल १९४१ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. परिस्थिती प्रतिकूल होती, पण भिकुबाबांच्या मनात शिक्षण घेण्याची जबरदस्त ऊर्मी होती. मुंबईसारखे विशाल क्षेत्र अभ्यासासाठी लाभणे ही त्यांच्या आयुष्यातील सुवर्णसंधी होती. नवे क्षितिज त्यांना नित्य खुणावत होते. ठाकुरद्वार येथील प्रभू सेमिनारी हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीचे ते दिवस होते. या रणधुमाळीत सारे शिक्षक या लढ्यात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. मोठ्या प्रयासाने त्यांना गिरगावच्या राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत प्रवेश मिळाला. भिकुबाबांना इथे अलिबाबाची गुहाच सापडली. ते त्यांच्या आयुष्यातील मंतरलेले दिवस होते. त्यांच्या चारित्र्याची कोनशिला निगुतीने बसविली. त्यांच्या भावनाशील मनाची निगराणी करणारे प्रेमळ शिक्षक त्यांना लाभले. विद्यार्थ्यांची मने घडविणारी ती आदर्श शाळा होती. शुभशकुनाच्या या क्षणी गणेश लक्ष्मण चंदावरकर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. ‘प्रार्थनासमाजा’च्या सेवाभावी, उदारमतवादी आणि सहिष्णू विचारधारेचे नवनीतच ग. ल. चंदावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्यांच्या आचार-विचारांत सुसंगती होती. भिकुबाबांचा अध्ययनाचा काळ त्यांच्या सान्निध्यात सुखावह तर झालाच; शिवाय पुढील वाटचालीसाठी त्यांनी येथूनच पाथेय घेतले.
‘उपासनेशी दृढ चालवावें’ या लेखात डॉ. सरोजिनी वैद्य यांनी समर्थपणे ग. ल. चंदावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविले आहे. ‘स्पर्श होता परिसाचा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून ग. ल. चंदावरकर यांचे हृद्य चित्रण भिकुबाब यांनी केलेले आहे ः
‘‘गुरुवर्य चंदावरकर हे त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक होते. ते मोठे कल्पक, सतत नवनवीन शैक्षणिक उपक्रमांना जन्म देणारे आणि ते उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सांस्कृतिक, शारीरिक आणि नैतिक उन्नती झालीच पाहिजे यावर ठाम विश्‍वास ठेवणारे, अडलेल्यांना आवश्यक ती मदत देऊन त्यांना जीवनात योग्य मार्गदर्शन करणारे असे एक थोर शिक्षक होते.’’
व्यं. ना. नायक यांच्यासारखे कुशल अध्यापक भिकुबाबांना येथेच लाभले. त्यांनी त्यांना अनेक चांगल्या गोष्टी प्रदान केल्या.
पावणेदोनशे वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या विल्सन कॉलेजमध्ये भिकुबाबांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. या महाविद्यालयाला उदारमतवादी विचारांची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या आयुष्याला आधुनिक वळण लावणारा हा महत्त्वाचा बिंदू ठरला. अभ्यासाची शिस्त, क्रीडानैपुण्य, नेतृत्वाचे गुण आणि वक्तृत्वशैली या त्यांच्या गुणांचा इथे उत्तरोत्तर विकास झाला. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे मर्मज्ञ समीक्षक त्यांना मराठीचे प्राध्यापक म्हणून लाभले. त्यांनी भिकुबाबांवर वाङ्‌मयीन निष्ठेचे आणि उच्च अभिरूचीचे संस्कार केले. त्यांना व्यं. ना. नायक यांच्या सुंदर हस्ताक्षरांचे जसे आकर्षण होते तसेच प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या हस्ताक्षरांचेही. या दोघांच्या अक्षराचे वळण गिरवता गिरवता त्यांनी त्यांची अखंडित व्यासंगप्रियता स्वीकारली. विश्‍वसाहित्यातील मानदंडांचा आणि मराठीतील अक्षरवाङ्‌मयाचा त्यांना जवळून परिचय झाला तो प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यामुळे. भिकुबाबांचा जीवनप्रवास ही योगायोगांची मालिका आहे. आयुष्याच्या पुढच्या प्रवासात त्यांना नाशिकच्या गोदावरीकाठावर कुसुमाग्रजांसारखा ऋषितुल्य साहित्यिक आणि मोठ्या मनाचा माणूस भेटावा… तोही वा.लं.चा निकटचा सुहृद असावा हाही एक शुभयोग. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचे महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेजमध्ये झाले; त्याच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणसंस्थेमध्ये प्रा. वसंतराव कानेटकर यांच्यामुळे भिकुबाबांचा अध्यापनकार्यासाठी प्रवेश झाला. ‘बार्न्स स्कूल’ आणि त्यानंतर ‘कँपियन स्कूल’मध्ये त्यांनी अध्यापनाचा ओनामा केला; तरी ओझर येथील एच.ए.एल. शाळा ही त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेची प्रयोगभूमी ठरली.
‘आयुष्यात आदर्श शिक्षक व्हायचे’ हे त्यांचे स्वप्न येथे पूर्णत्वाला गेले. तात्यासाहेब शिरवाडकर आणि प्रा. वसंतराव कानेटकर यांचे सान्निध्य त्यांना ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’ वाटले नाही तर नवलच! कानेटकर हे भिकुबाबांच्या स्वप्नांचे सहोदर झाले. या दोघांच्या हृदयसंवादातून ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ ही मराठीतील अक्षय आनंद देणारी नाट्यकृती जन्मास आली. या नाटकाच्या उगमापासून रसिकसंगमापर्यंत भिकुबाब पै आंगले साक्षीदार आहेत. हा सारा नजीकचा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकणे आणि त्यांच्या संस्मरणात्मक लेखानातून वाचणे हा एक आनंदानुभव आहे. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’ आणि ‘तुझा तू वाढवी राजा’ यांच्या नाट्यनिर्मितीचे आणि प्रयोगांचे ते साक्षीदार आहेत. तात्यासाहेबांच्या ‘नटसम्राट’ या अक्षय स्वरूपाच्या नाटकाचे भिकुबाब दिग्दर्शक होते.
कविश्रेष्ठ बोरकर सर्वांचे बाकीबाब; मात्र भिकुबाबांचे बाकीमामा. त्यांचे मातुल घराणे बोरीचे. बोरकरांच्या घराण्याशी निकटचे. भिकुबाबांना कविता प्रिय. त्याहून बाकीमामा प्रिय. त्यांच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात बोरकरांचा ‘आनंदभैरवी’ होता. तो त्यांनी बाकीमामांकडून समजावून घेतला. कवीकडून कविता शिकवून घेण्याचा अमृतयोग फार थोड्या भाग्यवंतांना लाभतो.
प्राचार्य भिकुबाब पै आंगले यांच्या अध्यापनकौशल्याबद्दल आणि प्रशासकीय नैपुण्याबद्दल विस्ताराने सांगायला पाहिजे असे नाही. त्यांच्या शैक्षणिक अनुभवावर आधारलेले ‘स्पर्श होता परिसाचा’ हे उत्कृष्ट निर्मितिमूल्ये असलेले आत्मनिवेदन वाचल्यावर याचा प्रत्यय येईल. आजच्या काळात ‘मिथ’ ठरावी अशी ती सत्यकथा आहे. त्यांच्याकडून शिक्षणाचे पाठ घेतलेले कितीतरी विद्यार्थी महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत चमकलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढदिनी गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा प्रदान करणारा हा कार्यकुशल आणि वत्सल मुख्याध्यापक याबाबतीत त्यांची तुलना पुण्यातील ‘नू.म.वि.’च्या नारळकरांशी अधवा पार्ल्याच्या ‘टिळक विद्यालया’च्या सहस्रबुद्धे यांच्याशीच करावी लागेल. प्रज्ञा, प्रतिभा, उपक्रमशीलता, सातत्य आणि शिस्त या गुणांमुळे शालेय नेतृत्वात ते यशस्वी झाले. क्रिकेटच्या मैदानावरही ते चमकले. ‘हंसिनी’सारख्या वार्षिकाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला जोपासले म्हणूनच तर ते तेथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा तो उच्चबिंदू ठरला.
नाटक हा विषय भिकुबाब पै आंगले यांच्या श्‍वासाचा. बालपणापासून आजमितीला ते नाट्यनिर्मिती, अभिनय आणि दिग्दर्शन यांच्याशी सातत्याने जोडले गेलेले आहेत. त्यांच्या या देदीप्यमान पैलूचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यायला हवा. ‘वळून बघता मागे’ या त्यांच्या आत्मनिवेदनातून सरसरमणीयतेने त्यांनी नाट्यप्रवासाचा मागोवा घेतलेला आहे. कालिदासाने ‘मालविकाग्निमित्रम्’च्या नांदीश्‍लोकात ‘नाटक हा यज्ञ असून नट आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यात समिधा टाकत असतो’ असे म्हटलेले आहे. अशा कितीतरी समिधा भिकुबाबांनी तन्मयतेने आणि कौटुंबिक जीवनात अडीअडचणी असताना समर्पित वृत्तीने टाकलेल्या आहेत.
‘दंश’, ‘मराठी रंगभूमी’ व ‘रंगगंध’ ही पुस्तके या सच्च्या नाट्यप्रेमामुळेच त्यांनी लिहिली. भाऊसाहेब बांदोडकर हे मुक्त गोमंतकाला आकार देणारे शिल्पकार. त्यांचे ‘दयानंद’ हे उत्कृष्ट चरित्र लिहिले. मराठीवरील निस्सीम प्रेमामुळे त्यांनी स्वतःला या चळवळीत झोकून दिले. ‘शैक्षणिक सप्तस्वर’ हे त्यांच्या शिक्षणसाधनेचे नवनीत आहे. ‘अमृतधारा’ हे जीवनाच्या सम्यक पैलूंना स्पर्श करणारे पुस्तक आहे. ते सदैव समाजसन्मुख राहिले आहे.
प्राचार्य भिकुबाब पै आंगले हे एक शिक्षक म्हणून मला आवडतात. माणूस म्हणून ते मला प्रिय आहेत. आदरणीय आहेत. त्यांची समाजमनस्कता मला भावते. त्यांच्या कलानैपुण्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. नव्वदी त्यांनी ओलांडली आहे. निरामय स्थितीत त्यांनी शतकाची परिक्रमा पूर्ण करावी. या वटवृक्षाला अभिवादन!
एक आठवण सांगावीशी वाटते. मडगावला जयवंत धोंड यांच्याकडे इंदूरचे कवी आणि ‘शब्ददरवळ’चे संपादक श्रीकृष्ण बेडेकर उतरले होते. समुद्रदर्शन सहसा न घडणार्‍या या इंदूरनिवासी कवीने ‘कोलव्याला जाऊ या’ असे म्हटले. आम्ही निघालो. त्यापूर्वी भिकुबाबांना भेटण्याची त्यांना उत्सुकता होती. बोलता बोलता संध्याकाळ उलटून रात्र झाली. बेडेकर म्हणाले, आता समुद्र कशाला? समुद्रदर्शन तर मडगावलाच घडले!