ब्रेकिंग न्यूज़
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – पोटातील जंतू

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – पोटातील जंतू

– डॉ. राजेंद्र साखरदांडे पोटात जंतू असतात का? खरे म्हणजे आपण आज प्रामुख्याने पोटातील किड्यांविषयी बोलणार आहोत. प्रत्येकाला त्याच्याविषयी माहिती आहे. माझ्या पोटात दुखतेय, मला दंत(जंत) झाले असणार! पूर्वीपासून याविषयी चांगलेच गैरसमज आहेत. साखर खाण्याने किंवा जास्त गोड खाल्ल्यावर जंताचा त्रास होतो. जंत पोटात असणे हे बरोबर – त्याने जेवण पचायला मदत होते. जंतावर औषध घेणे जरुरी आहे, पण थोडेतरी जंत पोटात राहिले पाहिजे नाहीतर पोटात गडबड होणार..वर दिलेले मतं सर्रास खोटे आहे. तरीदेखील सरकारी डॉक्टरांना जंताचे डॉक्टर का म्हणतात? व खाजगी डॉक्टरांकडे गेल्यावर ते पेशंटला जंतावर औषध देत नाही… तर जंतांना थंड करायचे औषध पेशंट डॉक्टरांकडे मागतात व ते देतातही. त्यांना दवाखाना चालवायचा असतो ना! पोटात होणारे किडे किंवा जंत कोणत्या प्रकारचे असतात?… १) राऊंड वर्म, २) हूक वर्म, ३) थ्रेड वर्म व ४) ट्रायच्युरा ट्रायच्युरीस यांपैकी वरील दोन प्रकारचे जंत महत्त्वाचे व याच्यापासून कितीतरी दुष्परिणाम होऊ शकतात. जंत जन्माबरोबर मुलांच्या पोटात असतात का? बिलकूल नाही तर आपण स्वच्छता पाळली नाही तर आमच्या पोटात जंताची अंडी जातात व त्यामधून जंत बाहेर निघतात. जंतांचा फैलाव कसा होतो? ज्याच्या पोटात जंत असतात त्यात नर व मादी असतात व त्यांच्या संडासातून अंडी बाहेर पडतात. उघड्यावर संडास केल्यावर ही अंडी मातीत आपला फैलाव करतात. उन्हात सुकतात. वार्‍याबरोबर उडून घरात, उघड्या ठेवलेल्या पदार्थांवर पडतात. जर आम्ही ते उघडे पदार्थ खाल्ले किंवा हात न धुता जेवलो तर ती अंडी आमच्या पोटात जातात व आम्हाला जंताचा त्रास होतो. अगदी बाजारात गेल्यावर आम्ही फळे खरेदीचे वेळी ती चाखून बघतो किंवा विकणारा चाखायला लावतो. विचार करा, बाजारात गेल्यावर कित्येक वेळा तुम्ही द्राक्षे चाखलीत, बोरे खाल्लीत.. वगैरे. विचार करा, हे तुम्ही बरोबर केले का? नाही. तेव्हा उघड्या ठेवलेल्या वस्तू खाऊ नये. स्टँडवर कितीतरी गाडे पाव, मिरच्या, भजी विकतात.. आजूबाजूला ‘माशी’ नावाची घाण वर दबा धरून बसलेली असते. तरीही आम्ही ते वडे, ती भजी खातोच की नाही? राऊंड वर्म्सचा त्रास जास्त लहान मुलांना होतो. सहा महिन्यांपासून – पाच वर्षांपर्यंत मुलांना हा रोग होतोच. ४० ते ७० टक्के पाच वर्षाच्या मुलांना हा रोग होतोच. चार महिन्याच्या बालकाला हा रोग झाल्याचे आढळते. कारण अंडे पोटात गेल्यावर तीन महिन्यांनी मोठा जंत तयार होतो. या रोगाची लक्षणे… – पोटात दुखणे, उलटी होणे. – संडासला होत राहणे. – जास्त भूक लागणे. – वजन कमी होत जाणे. पोटात जंत झाल्यावर त्यांची संख्या वाढत जाते. एवढी की लहान आतडे, मोठे आतडे त्यांनी भरून जाते. वाढ व्हायला त्यांना अन्न लागते म्हटल्यावर आम्ही जेवतो त्यावर ते पोसले जातात. जास्त झाल्यावर संडासमधून किंवा उलटीतून बाहेर पडतात. एवढे की नाकातोंडातून ते बाहेर निघतात. औषध दिल्यावर शेकडो जंत बाहेर निघतात. – केव्हा केव्हा अंगाला खाज सुटते. – थुंकीतून रक्तही बाहेर पडते. केव्हा केव्हा जंतामुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. – आतड्यांना विळखा पडतो. (ऑब्स्ट्रक्शन) – राऊंडवर्म एन्सेफेलोपॅथी होते. – कावीळ होते. पोटात पडणारा विळखा हे फार मोठं संकट आहे. वर पोटात जर जास्त जंत झाले तर ते आतड्यातून पोटात येतात. पोटात असलेल्या आम्लात ते मरतात व त्याचे रक्तात शोषण होते व ते मेंदूवर आघात करतात. मुले दगावू शकतात. तेव्हा तुम्ही काय कराल?… * उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नये. * मुलांना किंवा मोठ्यांना उघड्यावर संडास करायला देऊ नका. * जर वर दिलेली लक्षणे आढळली तर डॉक्टरी उपचार करा. * जंत हे शरीराला हानिकारक आहेत. त्यांनी आपले जेवण पचायला मदत होत नाही. * गोड खाल्ल्यामुळे जंत होत नाहीत. * वर्षांतून दोन वेळा तरी जंताचे औषध घ्यावे. * कडू खाल्ल्यावर जंत होत नाहीत हा समज चुकीचा आहे. * भारतात ७० टक्के लोकांना जंताचा त्रास आहे. * जंतामुळे छातीही भरते. खोकला येतो. इओसिनोफिलिया होतो. तेव्हा आपल्या मुलांना औषध द्या. सांभाळा. जंत कमी करायचे औषध मिळत नसते. दुसर्‍या प्रकारचे जंत म्हणजे ‘हूक वर्म’. राऊंड वर्म आपलेच जेवण जेवतात तर हूक वर्म आपले रक्त शोषण करतात. हूकवर्मचे लार्व्हा मातीत असतात. हूकवर्मचे रोगी संडासमधून त्यांची अंडी उघड्या मातीत फेकतात. पायांनी चालणार्‍या व्यक्तीच्या कातडीतून हा लार्व्हा माणसाच्या रक्तात येतो.. मग त्याची वाटचाल आतड्यात होते. लीच तुम्ही बघितली असेल. हाही तसाच आहे. आतड्यात तो चिकटतो व रक्त शोषत राहतो. त्यांच्यातही नर, मादी असतात. आतड्यात त्यांची उत्पत्ती वाढते व मुलांना पंडूरोग(ऍनिमिया) होतो. ते फिकट होतात. त्याची लक्षणे :- १. पातळ संडास होणे, २. पोटात दुखणे, ३. फिकटपणा दिसतो. ४. चक्कर येणे, पंडुरोगामुळे हृदयावरही परिणाम होतो. ५. जठरांवर याचा परिणाम होतो. ६. लिव्हरचा आकार वाढतो- हिपॅटोमेगॅली. डॉक्टरी उपचार करणे रास्त ठरते. स्वतःची काळजी घेणे. उघड्या पायांनी चालू नये. हे वर दिलेले रोग घातक आहेत. या दोन्ही जंतांऐवजी खाली दिलेले जंतही पोटाचा विकार उत्पन्न करतात. ते म्हणजे- – व्हीपवर्म – ट्रायक्युरीस ट्रायक्युरिया – थ्रेड वर्म. थोड्या आया आपल्या मुलांना डॉक्टरांकडे आणतात. म्हणतात, ‘मुलगा संध्याकाळी खाली संडासच्या जागेवर खाजवतो. केव्हा केव्हा छोटे छोटे जंत खाली दिसतात. थ्रेडवर्मचे मादी अंडे घालायला मलद्वारातून बाहेर निघतात व मुलांना तेव्हा खाज येते. लहान मूल असेल तर त्याला वेगळ्या संवेदना होतात व ते मूल रडू लागते. हे रोग आपल्याला किंवा आपल्या मुलांना होऊ नये असे वाटत असेल तर काय कराल?… – उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये. – उघड्यावर संडास करायचे नाही. – स्वच्छता पाळावी. हात, पाय जेवणाअगोदर व काही खाण्याअगोदर स्वच्छ पाण्याने साबण लावून धुवावे. स्वतःची काळजी घ्या हं…! ………………………………………….

Leave a Reply