प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

(भाग – ३)

गरोदरपणाची मानसिक तयारी झाली म्हणायची! बरे झाले. नाहीतर तयारी होता होता वयाची पस्तिशी जवळ यायची व कधी निघून जायची ते पण समजणार नाही व मग मूल व्हावे अशी इच्छा असेल तरीदेखील मग मूल होेणे नाही.

तेव्हा करिअर सांभाळता सांभाळता… आपल्या कुटुंबाचा… मुलांचा विचार करावा. नाहीतर वाढत्या वयात झालेले मूल स्वतः आपण रिटायर होऊ तोवर लहानच… कॉलेजात जाणारे राहील व मग तुम्ही ठरवाल एकच मूल पुरे मग ते काहीही झाले तर चालेल.
तर शेवट तुम्ही गरोदर आहात! गरोदरपणाच्या काळात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात आपण काय कराल?…
* न पचण्यासारखे जेवण जेवणे टाळावे ः कारण कित्येकांना गर्भारपण महागाचे ठरते. त्यांना वांती, चक्कर येते. म्हणजे ज्यांना ‘हायपरमेसीस ग्राव्हिडेरम’चा(जास्त उलट्या होेणे) त्रास होतो त्यांनी स्वतः शांत राहावे.
* पातळ आहार घ्यावा ः भरपूर पाणी, सरबत, शहाळ्याचे पाणी, सूपच आहार घ्यावा. ताक, लस्सी, फळांचे शेक, रस प्यावे. भाजीचा भरपूर वापर करणे.
ज्यांना गरोदरपणाचा त्रास होत नसेल तर त्यांनी शाकाहारी जेवण घेणे योग्य ठरेल.
* मोटरसायकलवर प्रवास करणे धोक्याचे आहे. नाहीतर आजची पिढी कुणाचेही ऐकण्याच्या फंदात पडत नाही. तेव्हा अशाने गर्भपातही होऊ शकतो.
* ज्यांना गरोदरपणाचा त्रास जास्त होतो त्यांनी डॉक्टरी उपचार करावे. हॉस्पिटलात ऍडमिट होऊन सलाईन लावणे योग्य ठरते. केव्हा केव्हा एवढा त्रास होतो की डॉक्टरी सल्ल्यानुसार गर्भपात करावा लागतो. आता डॉक्टरांकडे तपासणीकरता जावेच लागणार.
त्यांच्या सल्ल्यानुसार रक्ततपासणी, रक्तदाब, रक्तगटाची तपासणी व आजकाल ज्याची चलती आहे ती म्हणजे अल्ट्रासाउंड परीक्षा ज्यामध्ये गर्भाची वाढ बघितली जाते. हल्ली तर दर महिन्याला एकदा अल्ट्रासाउंड केली जाते.
खरे म्हणजे या तपासणीनंतर गर्भाची योग्य परीक्षाही होते. जन्मजात असणारे रोग, व्यंगे यांचे निदान होते. तसे असले तर डॉक्टरी सल्ल्यानुसार गर्भपात करावा लागतो.
पुढे जन्मजात अपंगत्व घेऊन जन्माला येणारे मूल – गर्भातच मारले जाते… गर्भपात केला जातो. नाहीतर ते मूल पुढे आयुष्यभर कुटुंबासाठी क्लेशकारक ठरते.
पुढे गर्भाचे योग्य निदान केले जाते. प्रत्येक महिन्याला डॉक्टरी सल्ला, रक्तदाब, लघवी तपासली जाते व त्यावर योग्य उपचार केले जातात.
आता मूल होण्याची तयारी करण्याची वेळ जवळ यायला लागते. गर्भारपणाचे तीन ते सहा महिने योग्य सल्ल्यानुसार माता काळजी घेत असते. दर महिन्याला तपासणीला जाते.
सहा ते आठ महिने झाल्यावर दर पंधरा दिवसांनी तपासणीला जाणे महत्त्वाचे आहे. त्यांना ९ व्या महिन्यात दर आठवड्यात एकदा तपासणी करण्याची गरज असते.
गर्भारपणात व्यायाम डॉक्टरी सल्ल्यानुसार करावा. म्हणजे बाळंतपण नैसर्गिकरीत्या होते. ९०% गरोदर स्त्रिया नैसर्गिकरीत्या बाळंत होतात. राहिलेल्या १०% स्त्रियांना गरोदरपणात व बाळंत होण्यात डॉक्टरी मदतीची गरज लागते.
आजकाल काय घडते?…
* आजच्या स्त्रियांना प्रसवकळा अजिबात नको. पहिल्या बाळंतपणात त्या कळा किमान १२ ते २४ तास येतात. तेवढे सहन करायची त्यांची तयारी नसते. व हल्ली डॉक्टरांचीही तयारी नसते. तेव्हा चला तर ऑपरेशन करून मुलाला जन्म दिला जातो. सगळेकाही सुटसुटीत! कुणालाही त्रास नाही. आत्ताचे आईवडील तर तारीख व वेळ ठरवून मुलाला जन्माला घालतात. मजा आहे की नाही? मग तो सिझेरियनचा स्कार (टाक्यांचा व्रण) मिरवत रहायचे. ‘‘माझे की नाही ऑपरेशन करून बाळ जन्माला आले.’’
खरे म्हणजे गरोदर स्त्रियांनी आहार काय घ्यावा यावर आपण चर्चा केलेली आहे. पण आज जरी आम्ही पुढारलेले आहोत तरी आमच्याही काही गरोदरपणातल्या अंधश्रद्धा आहेत…
* पोटभर जेवू नये ः भरपूर खाणे योग्य नव्हे, अशाने मूल पोसले जाते व त्याने गरोदरपणात व बाळंतपणी त्रास होतो.
* केळी खायला नकोत, मूल मुके होते.
* पपई, अननस, चिकन, मटन, टरबूज हे वर्ज्य करावे. हे खाल्ल्याने गर्भपात होतो. पूर्वी गर्भपात हा डॉक्टरी उपचार नव्हता. तेव्हा गरोदरपणात स्त्रिया वर दिलेली फळे खायच्या पण तरीदेखील गर्भपात घडत नव्हते.
डॉक्टर कधीही कोणत्याही स्त्रीला गर्भधारणा झाल्यानंतर काहीही खाऊ नका असे सांगत नाहीत. घरातील सासू किंवा सासूची सासू हे लोकच ठरवतात गर्भारपणात काय खायचे ते! ‘आता तर तेही घरात नसतातच!’ कारण लग्नानंतर मी व माझा नवरा! तेव्हा सासू सल्ला द्यायला सुनेबरोबर नसतेच. तेव्हा काय खावे ते फक्त सूनच ठरवते व तेही डॉक्टरी सल्ल्यानुसार.
मात्र काम (नोकरी) करणारी गरोदर स्त्री तर अगदी नववा महिना लागला तरीही ऑफिसमध्ये जाते. घरची सगळी कामे करते. सासू जवळ नको ना, मग भोगा… असे मी तरी म्हणणार नाही.
आता राहता राहिला गरोदर स्त्रियांनी ग्रहण असलेल्या दिवशी काय करावे?…
… असे म्हणतात की गरोदर स्त्रीने ग्रहण लागल्यावर व त्याच्याही अगोदर वेध लागल्यावर झोपून राहावे…
१. शरीराची हालचाल करू नये.
२. लघवीला जाऊ नये.
३. भाजी चिरू नये.
४. धारदार वस्तूने काम करू नये.
५. फक्त पातळ आहार करावा.
६. जेवू नये.
आणखी काय करू नये हे तुम्हाला फक्त आजीबाईच सांगतील. मला वाटते आम्ही त्याचा जास्त बाऊ करू नये. पाहिजे असल्यास पाळा नाहीतर नको.
ग्रहणकालात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर प्रचंड परिणाम होतो. हवेतील लहरी बदलतात. त्याचा प्राण्यांवर, माणसांवर परिणाम होतो का? यावर संशोधन चालू आहे. तेव्हा या काळी काय करावे हे कृपा करून तुम्हीच ठरवा.
तेव्हा आता तुमचे बाळंतपण चांगले झालेले आहे. स्वतःला जपा. योग्य आहार घ्या. झालेल्या बाळाविषयी आम्ही बोलूच.
……………………………………………………..

Leave a Reply