गाझातले रणकंदन

इस्रायलने गाझा पट्टीत सातत्याने दोन आठवडे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील आक्रमक कारवाईसही प्रारंभ केला आहे. आजवर इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागून कुरापत काढत आलेल्या हमासची नांगी ठेचण्यासाठी इस्रायलने चालवलेल्या या निर्णायक कारवाईमध्ये गाझापट्टीतील निरपराध नागरिकांचा मात्र नाहक बळी जाण्याची शक्यता वाढली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या मानवसंहाराची दखल घेतली आहे आणि स्वतः बान की मून तेथील हिंसाचार रोखण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. मात्र, गाझापट्टीत सध्या जे चालले आहे, त्याला तेथील हमास राजवटच जबाबदार आहे. गाझा पट्टीतून इस्रायली शहरांवर क्षेपणास्त्रे डागून तेथील निरपराध नागरिकांचा बळी घेत आलेल्या हमासला इस्रायलने आपल्या आजवरच्या आक्रमक नीतीनुसार चपखल आणि तितकेच कडवे प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यामुळे अमेरिकादेखील आज इस्रायलच्या बाजूने उभी ठाकलेली आहे. हमास तर त्यांच्या दृष्टीने दहशतवादी संघटनाच आहे. त्यामुळे परभारे हमासची नांगी मोडली जात असेल तर अमेरिकेला ते हवेच आहे. गाझापट्टीतील इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये निष्पाप मुलेबाळे मारली गेली हे खरे असले, तरी या सार्‍याची सुरूवात हमासच्या इस्रायलविरोधी कारवायांमुळेच झाली हे लक्षात घ्यावे लागेल. सध्याच्या विवादाची सुरूवातही तीन इस्रायली मुलांच्या अपहरण आणि हत्याकांडातून झालेली आहे. आपल्या नागरिकांचे प्राण स्वस्त नाहीत ही इस्रायलची सुरवातीपासूनची भूमिका राहिलेली आहे आणि मानवाधिकारांची वगैरे तमा न बाळगता ठोशास ठोसा हीच त्यांची आजवरची नीती राहिली आहे. या आक्रमक पवित्र्यावरच तर इस्रायल आज ताठ मानेने जगात उभे आहे. गाझा पट्टीतील संघर्ष काही आजचा नाही. आठ वर्षांपूर्वी हमासने तेथील निवडणुका जिंकून फताह पार्टीच्या समवेत सत्ता हस्तगत केली तेव्हापासून हा तिढा निर्माण झालेला आहे. फताहशी काडीमोड घेऊन हमासने सत्ता हस्तगत केली, तेव्हापासून इस्रायलला नष्ट करायचे या एकाच ध्येयाने हमासचे नेतृत्व पछाडलेले आहे. इस्रायल अर्थातच कच्च्या गुरूचे चेले नाही. त्यांनी गाझा पट्टीची आर्थिक कोंडी करून हमास नेतृत्वाला जेरीस आणण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. इस्रायलने आर्थिक कोंडी हटवावी ही हमासची युद्धबंदीची प्रमुख अट राहिली आहे. इस्रायलने हमासच्या लष्करी शाखेचा कमांडर अहमद जबारी याला हवाई हल्ल्यात ठार केले. जेथे जेथे दहशतवादी दडून राहिले आहेत, त्या इमारतींना लक्ष्य करीत त्यांनी हवाई हल्ले चढवले. गाझापट्टी ही दाट लोकवस्तीची असल्याने अर्थातच या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचा दुर्दैवी बळी जात आहे. गाझापट्टीत बॉम्बविरोधी निवारे वगैरे नाहीत. त्यामुळे हवाई हल्ला झाला की नागरिकांना सुरक्षित आसरा घेण्यासाठी ठिकाणेच नाहीत. त्यामुळे पूर्वसूचनेविना होणार्‍या हवाई हल्ल्यांमुळे मोठी प्राणहानी होत राहिली आहे. आतापावेतो तीनशे लोक मारले गेले आहेत, तरीही हमास माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे इस्रायलने आता जमिनीवरची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून प्राणहानी वाढण्याची भीती आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील या संघर्षात भरडली जाते आहे ती गाझापट्टीतील निरपराध जनता. अवघ्या चाळीस कि. मी लांब आणि सहा ते बारा कि. मी. रूंद असलेल्या या चिंचोळ्या गाझापट्टीतील पंधरा लाख नागरिकांपैकी बहुसंख्य हे निर्वासित आहेत. अत्यंत दारिद्य्राचे आणि नरकवत जिणे ते जगत आले आहेत. त्यात हमासच्या हाती सत्तेची सूत्रे गेलेली असल्याने रोजचा दिवस संघर्ष घेऊनच उगवतो आहे. सध्याच्या संघर्षामध्ये मुलांचा मोठ्या प्रमाणावर बळी जाताना दिसतो आहे, त्याला कारण हमास या मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत असावी. तळहातावर प्राण घेऊनच तेथील नागरिक जगत आहेत. इस्रायलची आक्रमक भूमिका कितीही योग्य असली तरी शेवटी बळी जात आहेत ती निरपराध माणसे. हा नरसंहार थांबायला हवा. त्यासाठी हमास आणि इस्रायल यामध्ये लवकरात लवकर युद्धबंदी घडून यायला हवी. इस्रायलची प्रतिहल्ल्याची भूमिका गैर नसली, तरी शेवटी गाझापट्टीतील सर्वसामान्य माणसांचा या संघर्षात काही दोष नाही. तीही शेवटी माणसेच आहेत आणि माणुसकीच्या दृष्टीने त्यांचा विचार व्हायला हवा.

Leave a Reply