किशोरवयिनांची वाढ व विकास

किशोरवयिनांची वाढ व विकास

– डॉ. सुषमा कीर्तनी
(भाग – २)

किशोरवय हे आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीतील वर्तणूकीच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी आणि सशक्त बनविण्याची एक खिडकी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही व ज्यामुळे प्रौढ वयात चुकीचा आहार घेतल्यामुळे होणारे आजार टळू किंवा लांबू शकतील! दुसरा राष्ट्रीय संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की १५ ते १९ वयाच्या मुलींमध्ये १४.७% मुली या १४५ सेमी.पेक्षा कमी उंचीच्या आहेत तर ३८.८% मुलींचे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) १८.५ पेक्षा कमी आहे ज्यामुळे कमी वजनाच्या बाळांना जन्म देण्याचा धोका वाढलेला आहे. 

खेड्यातील गरीब कुटुंबांंच्या आहारामध्ये नेहमी प्रथिनांची कमतरता असते व कमी ऊर्जेचा आहार सेवन केला जातो. सधन कुटुंबातील मुलींमध्येसुद्धा २३ ते २७ टक्के कमी ऊर्जा असलेला आणि १६ ते १८ टक्के प्रथिने कमी असलेला आहार सेवन केल्या जातो.
आयसीआरडब्लूच्या अभ्यासानुसार भारतात लोहाच्या कमतरतेमुळे होणार्‍या ऍनिमियाचे प्रमाण ५५% आहे जे मुलींमध्ये जास्त आहे. हे किशोरवयीन मुलींमध्ये जास्त असून आयोडीनची कमतरताही समाजात दिसून येते. म्हणून असे सांगितले जाते की किशोरवयीन मुलांमुलींच्या आहारामध्ये ५५-६०% ऊर्जा (कॅलरीज) संयुक्त कर्बोदकांपासून मिळायला पाहिजे जेव्हा की फॅट्‌सपासून ३०%पेक्षा कमी असायला पाहिजे.
ऍनिमिया ही किशोरवयीनांमधील आहारामुळे निर्माण होणारी सर्वांत मोठी समस्या आहे. सर्वसाधारणपणे लोहाच्या कमतरतेमुळे होणार्‍या ऍनिमियाचे प्रमाण हे किशोरांमध्ये २७% होते व ते मुलांमध्ये जास्त होते. या मुला-मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण आणि स्नायूंची गरज वाढते कारण हा काळ वाढीचा काळ असतो आणि तेव्हाच मुलींची मासिक पाळी सुरू होते. आधीच डाएट फॅड, जंक फूड, स्लिम आणि ट्रीमची फॅशन तसेच कृमींचा त्रास या सगळ्यांमुळे ऍनिमिया होण्याचे प्रमाण किशोरवयीन मुलींमध्येे जास्त असते. तसेच विटामिन ‘ए’ आणि फोलिक ऍसिडची कमतरताही त्यांच्यामध्ये असते. शाकाहारी घटकांपेक्षा प्राण्यांच्या घटकांपासून लोह चांगल्या तर्‍हेने शरीरात शोषल्या जाते. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आहार घेणार्‍या किशोरवयीनांना ऍनिमियाचा धोका जास्त प्रमाणात असतो. याच काळात मुलांमध्ये ३७ टक्के हाडेही जास्त प्रमाणात तयार होत असतात. त्यामुळे त्यांना १२०० मिग्रॅ./दिवस या प्रमाणात कॅल्शियमचीही गरज असते. मुलींच्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण नेहमी कमी दिसून येते कारण दुध पिण्याची सवय फार कमी असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता कमी होते तसेच बुद्धीची क्षमताही कमी होते (आयक्यु – कमी). जर त्यांच्यामध्ये आयोडीनची कमतरता असेल तर लहान वयातील गर्भारपणा हा धोकादायक असतो. मुलामुलींच्या आयोडाईज्ड मीठाच्या सेवनावर पालकांनी भर दिला पाहिजे जेणेकरून या समस्यांना दूर ठेवता येईल. या मुलामुलींवर पालकांचे पूर्ण लक्ष असले पाहिजे. आदर्श व चांगले पालकत्व इथे मदत करते. जर कुटुंबामध्ये आरोग्यदायी जीवनशैली पाळल्या जात असेल आणि चांगला आहार सेवन केल्या जात असेल तर जरी मुला-मुलींवर माध्यमांचा असर असला किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा प्रभाव असला तरी ते चांगला आहार घेण्याचे बंद करणार नाहीत. गरीब कुटुंबांमध्ये मुले आणि मुलींच्या आहारामध्ये फरक केला जातो. तिथे मुलींसाठी शिळे अन्न ठेवले जाते व मुलांसाठी चांगले ताजे! त्यामुळे मुली आहारापासून वंचित असतात. पण मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या कुटुंबामध्येसुद्धा फळे, भाज्या आणि डेअरी उत्पादनांचे सेवन करण्याचे प्रमाण त्यांच्या किशोरवयीन मुलांमध्ये कमीच असते. भारतीय किशोरवयीन हे फास्ट फूड आणि स्नॅक्सची निवड करतात. समोसा, बटाटा चिप्स, नूडल्स, पेस्ट्रीज, कोला आणि पॅटीस हे नेहमी खाण्यात येणारे पदार्थ असून ते जेवणांच्या मधल्या वेळेत खाल्ले जातात. त्यामुळे ऍनोरेक्सिया (भूक मंदावणे) आणि बुलिमिया (भूक वाढणे) या दोन जास्त प्रमाणात आढळणार्‍या किशोरवयीनांमधील आहाराच्या समस्या आहेत. अशा प्रकारे गरीब कुटुंबामधील किशोरवयीनांना जास्त शारीरिक कष्ट आणि शक्तीची गरज असते जेव्हा शहरातील लोकांमध्ये एका जागेवर बसून काम करण्याची जीवनशैली जास्त बघण्यात येते. फूड पिरॅमिड हा किशोरवयीन तसेच रुग्णांसाठी एक उपयोगी आहाराचा तक्ता आहे. म्हणूनच कमी आहार सेवन करणारे किंवा स्थूल किशोरवयीनांच्या तपासण्या व त्यानुसार योग्य तज्ज्ञांकडे त्यांना पाठवणे गरजेचे आहे. जुनाट कुपोषण ही किशोरवयीनांमधील सर्वसाधारण समस्या आहे. शाकाहारी तरुणांमध्ये कमतरता असलेले रोग जसे आयोडीन, विटामिन ‘बी१२’, विटामिन ‘डी’ आणि गरजेचे फॅटी ऍसिड्‌स कमी असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांची वाढ लांबते व प्रगल्भता येत नाही. कमतरता असलेल्या मुलींची समस्या ही जास्त गंभीर स्वरूपाची आहे कारण पुढे जाऊन त्या कमी वजनाच्या मुलांना जन्म देतात. तसेच त्यांना बाळंतपणातही त्रास होतो व जन्मजात शिशूच्या मृत्यूचा दरही वाढतो व कमी वजनाच्या मुलांमध्ये करोनरी रक्तवाहिन्यांचे आजार, उच्चरक्तचाप आणि मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त असते.
क्रमशः

Leave a Reply