ब्रेकिंग न्यूज़
एका विद्वान गुरूचे पुण्यस्मरण

एका विद्वान गुरूचे पुण्यस्मरण

– सुरेश बांदेकर, अडवलपाल, अस्नोडा
गुरूर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्‍वरः|
गुरू साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः|
हे गुरुचे वर्णन यथार्थपणे लागू होते अशी व्यक्ती कोण बरे? तर ते होते वेदशास्त्रसंपन्न आणि काव्यतीर्थ गजानन सहकारी. डिचोलीतील श्री शांतादुर्गा देवीचे पुजारी आणि शहरातील काही कुटुंबांचे पुरोहित. केवळ भिक्षुकीच त्यांच्याकडे होती असे नाही तर त्यांनी मिळवलेले अगाध ज्ञान, गाठीला असलेले अनुभव, दानी वृत्ती आदी गोष्टींवर प्रकाश टाकणे, शिष्य या नात्याने त्यांच्या तृतीय वर्ष पुण्यदिनी मला योग्य वाटते. मी त्यांना ‘बाबा’ म्हणत असे. ते केवळ माझेच बाबा नव्हते, तर आपल्या कौटुंबिक परिवाराचे व आलेल्या – गेलेल्यांचेही बाबा होते. बाबा केवळ भिक्षुकी (भटपण) करणारेच होते असा बर्‍याचजणांचा समज. होय, सकृतदर्शनी होतेच खरे. अत्यंत निःस्वार्थ बुद्धीने इतरांची सेवा करणे हाही विशेष गुण त्यांच्यात होता. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता असेल ती वस्तू गरजवंताला ते देत. ‘सर्वांभूती परमेश्‍वर’ याची प्रचीती आपल्या कृतीने ते इतरांना देत असत. आपल्या उभ्या हयातीत असंख्य गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आपल्या घरी अन्न, वस्त्र, निवारा देऊन केवळ भिक्षुकीच शिकवत नसत, तर त्या बरोबरीने लौकिक शिक्षणसुद्धा घेण्याची मुभा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली होती. विद्यार्थीही त्यांच्या घरी आनंदाने राहायचे आणि इकडच्या गोड आठवणी सोबत घेऊन स्वगृही परतायचे. त्यांच्या सौ. सुद्धा तशाच स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुद्धा केव्हाच आप-पर भाव दाखवला नाही. बाबांच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असे. आलेल्यांचे आनंदाने स्वागत करायचे. विषण्णता त्यांना माहितच नव्हती. कोणतीही बरी – वाईट घटना त्यांच्या कानावर गेली की लगेच ते ‘दैव त्याचे’ म्हणायचे. ‘कर्ता करविता परमेश्‍वर’ हा त्यांचा विश्‍वास. घडू नये ते घडले तर म्हणायचे ‘देवीला हवे तसे झाले’. या मनःस्थितीमुळे ते नेहमी प्रसन्न दिसायचे. त्यांना माहीत होते, ‘असंतुष्टा द्विजा नष्टाः’ म्हणून त्यांचे द्विजत्व नष्ट झाले नाही. ते नेहमी संतुष्ट असायचे. ‘संतुष्टो ब्राह्मणः शुचिः’ म्हणून ते शुचिर्भूतही होते. किती गुणी होते बाबा!
सर्वसामान्य माणूस हा बाहेरून एक प्रकारचा आणि आतून दुसर्‍या प्रकारचा. या नियमाला बाबा मात्र अपवाद होते. बाबा अंतर्बाह्य एकच. जे ओठांवर तेच हृदयात. कपट, द्वेष, कारस्थान, लोभ, क्रोध, मद, गर्व या सप्तरिपूंचा त्यांना केव्हाच स्पर्श झाला नाही.
‘वदनं प्रसाद सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः|
करणं परोपकरणं येषां केषां न ते वंद्याः॥
आणि म्हणूनच ते सर्वांना वंद्य होते. बरेच गरीब, अशिक्षित, मागासवर्गीय बाबांकडे येऊन आपल्या समस्या, गार्‍हाणी सांगत.
वाई (जि. सातारा) येथे शिकत असताना त्यांना पाणिनीय व्याकरणश्री केवलानंद सरस्वती शिकवत व संस्कृत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. अशा या दोन महागुरूंची विद्वत्ता त्यांच्यात ठासून भरली होती. पण डिचोलीसारख्या गावात या विद्वत्तेला काही किंमत नव्हती. केवळ शांतादुर्गा देवीचे पुजारी म्हणूनच ते जनमानसात राहिले. ज्यांना त्यांच्या विद्वत्तेची जाणीव झाली, त्या लोकांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचे वाचन फार दांडगे होते. रिकाम्या वेळी ते संस्कृत ग्रंथ वाचत आणि त्या आधारे काही सुभाषिते तयार करून लिहीत. ‘विश्‍वभाषा’ है त्रैमासिक आणि ‘दुर्वा’ हे मासिक ते नियमाने वाचत. आपण वाचलेली साप्ताहिके, मासिके व त्रैमासिके ते मला वाचायला देत असत. जवळ जवळ २५ वर्षांपूर्वी त्यांच्या विद्वत्तेचा सुगावा मला लागला आणि हळूहळू मी त्यांच्याकडे आकृष्ट होत गेलो. अत्यंत कठीण अशा सुभाषितांचा अर्थ मला सांगत असताना, संधी, समास आणि व्युत्पत्तीचा ते खुबीने वापर करीत असत. समोर असलेल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते उठत नसत. ते जातिवंत शिक्षक होते. उतारवयात त्यांना विश्रांतीची आवश्यकता होती. मुलगेही आता कर्ते सवरते झाले होते. तेही त्यांना विश्रांती घ्यायला सांगत. ते कॉटवर पहुडलेले असत. घरातील मंडळींना त्यांनी सांगून ठेवले होते ‘मला झोप लागली आणि सुरेश आला तर मला जरूर उठवा हं’ एवढा शिकवण्याचा ध्यास. झोपेतून उठून ते मला शिकवत असत.
एकदा त्यांनी मला ऑस्ट्रीया देशातून आलेले पत्र वाचायला दिले. ‘ऑस्ट्रीयातून पत्र?’ मला क्षणभर आश्‍चर्यच वाटले. ते होते इंग्रजी भाषेत. ऑस्ट्रीयात काही वर्षांपूर्वी ‘विश्‍व संस्कृत परिषद’ भरली होती. त्या परिषदेला हजर राहण्याचे बाबांना आमंत्रण होते. मी त्यांना विचारले,‘तुम्हाला कसे आमंत्रण?’ ते म्हणाले,‘विश्वभाषा त्रैमासिकामध्ये विश्‍वसंस्कृत परिषद ऑस्ट्रीया देशात भरणार अशी बातमी आली होती. त्या अनुषंगाने मी एक काव्य तयार केले आणि तिकडच्या संस्थेला पाठवून दिले. याची दखल घेऊन त्यांनी मला हे आमंत्रण दिले. त्यांच्या विद्वत्तेची खोली किती होती ते या आमंत्रणावरूनच समजले. आठ, दहा दिवसांचा अवधी, त्यात त्यांचे उतारवय. बरोबर जाणार कोण? मी हायस्कूलचा शिक्षक. शिवाय जाण्या – येण्याचा खर्च, व्हिसा या सर्व गोष्टी करायला वेळ नव्हता. त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. एखाद्या मंत्र्याचा नातेवाईक असला असता तर, सर्व बाबी दोन दिवसांत पूर्ण करून त्याला सरकारी खर्चाने ऑस्ट्रीयाला पाठवले असते. पण गरीबांना कोण विचारतो? बाबा गरीब होते. पण त्यांचे मन मात्र फार विशाल होते.
मी जवळजवळ ५० वर्षे संस्कृत शिकत आहे. पण त्यांच्याएवढा विद्वान झालो नाही. शेकडो सुभाषिते मला पाठ आहेत. समजायला अडचण आली की घेतलीच धाव बाबांकडे. ते आनंदाने समजवायचे आणि म्हणायचे, ‘तुला ही सुभाषिते मिळतात कुठे? जी मला माहीत नाहीत. काही सुभाषिते मी तुझ्याकडून शिकणार आहे.’ मी खजिल व्हायचो. केवढी बुद्धिमत्ता, केवढी विद्वत्ता, नखशिखांत संस्कृतमय जीवन असूनसुद्धा आणखी शिकण्याची इच्छा. आयुष्यभर त्यांनी इतरांना शिकवले आणि शिकत राहिले.
माझ्या मुलीच्या लग्ना निमित्ताने मी कलकत्त्याला गेलो होतो. आल्यावर त्यांना भेटलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी कलकत्त्याला जाऊन आल्याचे बाबांना कळले. आणि लगेच ते खाली वाकले, मला नमस्कार केला आणि म्हणाले,‘ज्या कलकत्ता विद्यापीठातून मी प्रथम श्रेणीत काव्यतीर्थ उत्तीर्ण झालो, त्या कलकत्त्याला तू जाऊन आलास याचा मला फार आनंद झाला रे.’ आणि ते गहिवरले. मी स्तब्ध झालो. महाभारतातील एक प्रसंग आठवला. राजसूय यज्ञामध्ये पूर्णावतारी योगेश्‍वर श्रीकृष्णाने उष्टी काढली होती. पण अग्रपूजेचा मान मात्र श्रीकृष्णालाच मिळाला. मोठमोठ्या उच्चासनांवर बसलेल्या आचार्यांना मिळू शकला नाही. मोठेपणा हा ताठ राहण्यातच नव्हे तर तो वाकण्यात असतो. बाबा माझ्यासमोर वाकले म्हणजे त्या कलकत्ता विद्यापीठासमोर वाकले. मी केवळ निमित्तमात्र होतो.
बाबा म्हणजे साक्षात विद्यादेवता. विद्वत्तेचा वटवृक्ष. आणि मी, एक साधे रोपटे. बाबा ते बाबाच आणि मी, मी तो मीच. त्यांच्याबद्दल किती लिहू? लिहावे तेवढे थोडेच.
बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी कानावर आली आणि लगेच मी डिचोलीतील कायरो हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. ते बोलू शकत नव्हते. झोपेत कॉटवर पडून होते आणि एक दिवस त्रिपुरारी पौर्णिमेला मी मुळगांवला असताना ‘बाबा गेले’ ही कुवार्ता कानी पडली. मन सुन्न झाले. होय, बाबा गेले, पण कृतार्थ जीवन कसे असावे, हे आम्हा लोकांना सांगून गेले. हाती घेतलेले काम पूर्ण करून डिचोलीला येईपर्यंत बाबा पंचतत्वात विलिन झाले होते. मला त्यांचे अंतिम दर्शन झाले नाही. पण त्यांची कृपा आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील असा मला विश्‍वास आहे. आजच्या या तृतीय वर्ष पुण्यदिनी मी बाबांविषयी एवढेच म्हणेन-
‘झाले बहू , होतील बहु, परंतु या सम हा’

Leave a Reply