लेख

15-04-14

- मंगेश गावकर, वाळपई    

गोव्यातील काही बुद्धिवाद्यांनी गोव्यात तसेच महाराष्ट्रात भगतसिंह यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून नुकताच नास्तिक दिन साजरा केला. यात उण्यापुर्‍या लोकांत थोडा गाजावाजा करत आस्तिक तसेच हिंदू देव-देवतांवरील असलेल्या श्रद्धा, विश्‍वासाला अंधश्रद्धेचे लेबल लावून यथेच्छ टीकेची आळवणी केली.

स्वतःच्या प्राणांची आहूती देऊन आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या शूर वीरांना आजही आम्ही पूजतो, त्यांचा आदर करतो ते त्यांनी देशावर केलेल्या प्रेमामुळे व त्यांनी केलेल्या बलिदानामुळे. ते आस्तिक होते वा नास्तिक याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पण भगतसिंह हा नास्तिक होता, लेनिन-मार्क्सवादी होता हे दर्शविण्याचा खटाटोप काहीजण आज करून स्वतःचा स्वार्थ साधू पाहात आहेत. हा तर तमाम क्रांतिवीरांचा अपमान आहे.

14-04-14

- रमेश सावईकर

वसंत ऋतु सुरू झाला की निसर्ग नवचैतन्याचा साज चढवतो. झाडांना पालवी फुटते नि फळझाडांना मोहर येतो. निसर्ग आपली तृष्णा भागवितो पण या निसर्गाकडे पाठ फिरविलेल्या माणसांना मात्र नैसर्गिक स्रोतांपासून आपल्या गरजा भागविणे कठीण होते. याचे कारण नैसर्गिक नि पर्यावरण समतोल बिघडत गेला आहे. तो माणसांनी बिघडविला आहे. त्याची प्रचिती चैत्र-वैशाख महिन्यात जनतेला येते. जलस्रोत आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य उद्भवते. ‘‘नेमेचि येतो मग पावसाळा; हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’’, अशी उक्ती आहे. पण त्या उक्तीचा अनुभवही मिळणे कठीण झाले आहे. कारण सृष्टीचे कौतुक करण्याऐवजी निसर्ग-सृष्टी यांच्या ऋतुमानानुसार होणार्‍या बदलांवर आम्ही माणसांनीच प्रतिबंध घालण्यासारख्या कृती केलेल्या आहेत. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाई निर्माण होते. या समस्येला जनतेला सामोरे जावे लागते. सरकारला त्याची विशेष पर्वा आहे असे म्हणता येणार नाही. लोकांनी पाण्यासाठी मागण्या, मोर्चे, घेराव आदी कृती अवलंबिल्या की निद्रिस्त सरकारला जाग येते नि पाणीग्रस्त लोकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची योजना राबविली जाते. या पार्श्‍वभूमीवर ‘‘नेमेचि उद्भवते मग पाणी टंचाई; नाही तिची दखल सरकार दरबारी!’’ अशी उक्ती आता अनुभवायला मिळते.

राज्यातील सर्व शहर-ग्रामीण भागांना आज जलवाहिनीद्वारा पिण्याचे पाणी पुरविले जाते. साळावली, अंजुणे, आमठाणे नि तिळारी धरणाचे साठविलेले पाणी त्यासाठी उपयोगात आणले जाते. उन्हाळ्यात धरणाच्या जलाशयांच्या पाण्याची पातळी कमी होते.

12-04-14

- देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली

एखादी गरीब व्यक्ती, भलेही ती चारित्र्यवान असली तरीही निवडणुकीच्या रणांगणात उतरायचे धाडस करू शकत नाही, कारण आमची लोकशाही ही दडवून ठेवलेला काळा पैसा, जातीयवाद, गुंडगिरी, शोषण, मदिरा आणि मनगटशाही यांच्या बळावर चाललेली आहे, असा जनतेचा समज बनला आहे. आता तर प्रत्यक्ष निवडणुकांआधी कोट्यवधी काळे धन पोलिसांनी जप्त केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्या काळ्या पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तो त्यातील अधिकांश पैसा वाममार्गाने मिळवलेला असतो. राजकीय नेते स्वतःचा एकही पैसा खर्च करीत नाहीत. मोठे उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी हा पैसा पुरवतात. आता तर हेलिकॉप्टरसुद्धा भाड्याने घेऊन मुख्य पक्ष प्रचारात वापर करीत असल्यामुळे निवडणुकीला एकप्रकारे हवाई युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. निवडणूक आयोगाने ५४ लाखांपेक्षा अधिक खर्च करू नये असा नियम लागू केला असला तरीही प्रत्यक्षात मोठ्या सभांच्या आयोजनाकरता तीन-चार कोटींच्या घरात खर्च होतो हे लपून राहिलेले नाही. कामाच्या बळावर निवडून येणे, चारित्र्य इत्यादीच्या भानगडीत न पडता काळ्या पैशांचा सुलभ मार्ग अनेकदा पत्करला जातो.

11-04-14

- शंभू भाऊ बांदेकर, साळगाव

महात्मा ज्योतिराव गोविंद फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. पेशवाईच्या अस्तकाळी महाराष्ट्रावर ब्राह्मण्याच्या अतिरेकाने जे उदास वातावरण निर्माण झाले होते, त्याच्या गडद सावल्या ज्योतिबा यांच्या बालपणी व तारुण्यकाळातही महाराष्ट्रावर रेंगाळत होत्या. फुलेंचे बालपण व सर्व कर्तेपणाचे आयुष्य पुणे शहरात गेले. पुणे शहर ही पेशव्यांची राजधानी होती, म्हणजे पुण्यात जे काही घडत होते ते त्या काळच्या समाजव्यवस्थेचे प्रातिनिधिक स्वरूप होते, असे म्हणावयास हरकत नाही. ‘धर्मा’ चे चटके बसल्यानंतर फुलेंनी एका सार्वजनिक सत्यधर्माच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याचे फार पूर्वीच ठरवून टाकले होते. त्यादृष्टीने फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्मा’ची स्थापना करून देशाला नवजीवनाची प्रेरणा दिली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

प्राचीन काळात व्यासांनी ‘समाजाची धारणा करणारा तो धर्म’ अशी व्याख्या केली आहे. या व्याख्येचा आधार घेत महात्मा फुले यांनी सांगितले, ‘‘आपणा सर्वांचा निर्माणकर्ता व त्याने निर्माण केलेले मानवप्राणी यामधील संबंध स्पष्ट करणारा जो शब्द तो धर्म’ अशी त्यांनी धर्माची व्याख्या केली आहे.

10-04-14

- कॅजिटन परेरा, म्हापसा

बळेंच कोकणी राजभाषा करण्यासाठी ज्या कोकणीमोगींनी आंदोलने छेडली, त्यामध्ये ख्रिश्‍चन आंदोलकांचा हिस्सा फार मोठा होता. सालसेतचे झाडून सर्व ख्रिश्‍चन कोकणी भाषेसाठी रस्त्यावर उतरल्यावर सरकार टिकविण्यासाठी तत्कालीन सरकारने देवनागरी कोकणीला राजभाषा म्हणून १९८७ साली मान्यता दिली होती. सार्‍या ख्रिश्‍चन समाजाला कोकणीची लिपी ही इंग्रजी लिपी, ज्यास ते रोमी लिपी म्हणतात ती राजभाषा म्हणून अभिप्रेत होती. प्रचंड आंदोलन करणारा तो समाज आज देवनागरी लिपी नाकारतो आहे. 

09-04-14

- देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली

‘पैशांतून सत्ता आणि सत्तेतून पैसा’ या तंत्राचा पुरेपूर अवलंब करीत साडे पाच दशके देशावर कॉंग्रेसने अधिराज्य गाजवले. इतकी दीर्घकाळ सत्ता उपभोगल्यामुळे त्या पक्षाच्या काही राजकारण्यांना सत्तेचा इतका माज चढलेला आहे की, आपण काहीही दिवे लावले तरीही पुढे जनताच आपणाला मते देईल या भ्रमात सर्व नेते वावरत आहेत. केंद्रातील आघाडी शासन म्हणजे निष्क्रीयता, नाकर्तेपणा, दायित्वशून्यता, नियोजनशून्यता, समन्वयाचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव असे समीकरण बनले आहे.

08-04-14

- अनिल पै

३५० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झालेल्या या श्रीसंस्थान गोकर्ण जीवोत्तम पर्तगाळी मठातील आराध्य दैवत असलेल्या श्रीराममंदिरात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील पहिले दहा दिवस विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम असतात. नवमीला श्रीरामजन्मोत्सव ही हजारो लोकांसाठी एक पर्वणीच असते. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविक दिवसरात्र चालणार्‍या या रामनवमीच्या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. चैत्र शुद्ध पंचमीपासून श्रीरामनवमीच्या उत्सवाची सुरुवात होते. त्या दिवशी ध्वजारोहण, गरूडपूजा, पालखी रथोत्सव चालू असतात. अहोरात्र तो प्राकार वीस ते पंचवीस हजार लोकांनी गजबजून जातो. तसेच दहाही दिवस अन्नछत्र चालू असते. श्री पर्तगाळी मठातील मोठा उत्सव श्रीरामनवमी असल्याने त्यात सर्व लोक सामील होतात. 

07-04-14

- रमेश सावईकर

गोवा हे चिमुकले राज्य असले तरी येथील निसर्गसौंदर्यामुळे त्याला देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. गोव्याची संस्कृती, लोककला तसेच निसर्गसुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस यामुळे गोवा हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. पर्यटन उद्योग हे राज्याचे एक महसूल मिळण्याचे साधन आहे. पर्यटकांचे गोव्यात येण्यामागचे उद्देश फक्त सहल-पर्यटन एवढेच नसून गोवा अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. पर्यटनाचे फायदे-तोटे आहेत. तथापि कोणत्याही परिस्थितीत पर्यटन उद्योगावर नियंत्रण आणणे सरकारला परवडणारे नाही. विदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. त्याशिवाय गोव्यातील अनेक सुशिक्षित, उच्च शिक्षित आज परदेशात नोकरी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विदेशांतून भारतात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज कमी होणार नाही. उलट ती वाढतच जाईल.

05-04-14

- विनोदमूर्ती गणेश सोळंकी

साल १९२३. तिसर्‍या इयत्तेत शिकणारा एक देखणा मुलगा ‘कुंजविहारी’ नाटकासाठी निवडला व ललितप्रभा संगीत कंपनीत आणला. त्याचे यावेळी वय होते ९ वर्षे.

साल १९२४. मराठी नाट्यकलाकार संघाने आयोजित केल्या एका कार्यक्रमात तेव्हा एक जोडगोळी रंगभूमीवर आली - पुढे सतत ५० वर्षे एकत्र काम करीत राहिलेली. जमलेल्या हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या जोडीचे स्वागत केले. या जोडगोळीतले एक मा. गंगाराम आणि दुसरे मा. दत्ताराम.

केवळ वयाच्या ९ व्या वर्षी रंगभूमीवर आलेल्या मा. गंगाराम यांनी आपली ५० वर्षे रंगभूमीवर पूर्ण केली. ५० वर्षे पूर्ण करून त्याच तडफेने नंतरही भूमिका करीत. ‘स्वामी’ नाटकात त्यांची मी भूमिका पाहिली व तेव्हा प्रकृतीने व वाणीने खणखणीत असलेल्या या कलावंताच्या कर्तृत्वाचा कालखंड डोळ्यांसमोर आला.

04-04-14

- कॅजिटन परेरा, म्हापसा 

मराठी भाषाप्रेमींची आंदोलने दरवेळी विश्वासघाताची बळी ठरली आहेत. सुरवातीला म. गो. पक्षाच्या कालखंडात मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले होते. मराठी भाषा हे म. गो. चे प्रमुख ध्येय होते. परंतु निष्काळजीपणा व ‘आमची मराठी अमर आहे’ या भावनेपोटी होणार्‍या राजकारणाकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. जॅक सिक्वेरांच्या काळात वेगळे राज्य व कोकणी ही भाषा अशी चळवळ सुरू होती. तरीही संपूर्ण गोव्यात भाऊसाहेब बांदोडकरांचा दबदबा होता. दुर्दैवाने भाऊंचे आकस्मिक निधन झाले. त्या परिस्थितीचा फायदा दबा धरून बसलेल्या शणै गोंयबाब यांच्या भक्तांनी उठवला. इन मिन साडेतीन लोक, परंतु अत्यंत धूर्त व कावेबाज निघाले. राजकारणातील इरसालपणा त्यांच्या अंगी मुरलेला. त्यांनी बहुजन हिंदू समाजातील तरुणांना हाताशी पकडून कोकणी हीच या प्रदेशाची भाषा अशी चळवळ सुरू केली. युनायटेड गोवन्स पार्टी नेऊन धूर्तपणे कॉंग्रेसमध्ये सोडली. राष्ट्रीय प्रवाहात गोमंतकीय येत आहेत हा देखावा करून वेगळ्या अस्तित्वासाठी फासे टाकण्यास सुरवात केली.

ख्रिस्ती समाजाला गोवा महाराष्ट्रापासून परावृत्त करायचा असेल तर कोकणी भाषा मागण्याचा मंत्र दिला. बहुसंख्य ख्रिस्ती समाजाला कोकणीशिवाय काही एक बोलता येत नसे. त्यातच चर्चला आपल्या बाजूने वळविण्यात शणै गोंयबाबवाल्यांनी यश मिळवले. तरीही मराठीप्रेमी झोपून होते.