पावसाने अर्धशतक ओलांडले

Story Summary: 

२४ तासांत ६ इंच पावसाची नोंद

परवा रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडणे, घरे जमीनदोस्त होणे व शेतात पाणी शिरणे, तसेच काही वाहनांवर झाडे पडल्याने प्रचंड नुकसान झाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली असून पावसाने अर्धशतक ओलांडले आहे.

काल दुपारपर्यंत पाऊस चालूच होता. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत बनले. संततधार पावसामुळे काल विद्यालये, महाविद्यालये तसेच सरकारी व खासगी आस्थापनातील उपस्थितीवर बराच परिणाम झाला. वादळी वारे, संततधार पाऊस पडल्याने समुद्रही खवळला आहे. येत्या चौवीस तासातही राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

शेतात पाणी साचल्याने समस्या

प्रचंड पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकर्‍यांना त्रास झाला. शेत नांगरणीचे काम संपवून शेतकर्‍यांनी पेरणी सुरू केली होती, असे असले तरी त्यावर विशेष परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. पाऊस चालूच राहिल्यास परिणाम होऊ शकेल, असे कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी सांगितले.

वृक्ष उन्मळून पडल्याने काल अग्निशामक दलाच्या जवानांना बरीच धावपळ करावी लागली.

राजधानी पणजी शहराच्या अनेक भागांत पाणी साचले होते. हेडगेवार विद्यालय तसेच पणजी बसस्थानकावरही पाणी साचले होते. अनेक ठिकाणी गटारे तुंबून वाहत होती. पणजी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासून धावपळ करीत होते. दुपारी १ च्या सुमारास पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. परंतु काणकोण, सांगे, सत्तरी या भागात पाऊस चालूच होता.

डिचोलीत नदीच्या पातळीत वाढ

डिचोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे डिचोली व साखळी येथे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. अंजुणे धरण मात्र अजून भरलेले नसून त्यामुळे पुराचा धोका नसल्याचे सांगण्यात आले. अनेकठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे तसेच सखल भागांत व बागायतींत पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डिचोली अग्नीशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

विविध ठिकाणी पावसाची नोंद

सांगे - १५ सें.मी.

म्हापसा - १४ सें.मी.

पणजी - १४ सें.मी.

वाळपई - १३ सें.मी.

पेडणे - १३ सें.मी.

फोंडा - १३ सें.मी.

केपे - १३ सें.मी.

मडगाव - ११ सें.मी.

दाबोळी - ९ सें.मी.

मुरगाव - ९ सें.मी.

काणकोण - ८ सें.मी.