गावठी भाज्यांचे दर ठरविण्यासाठी समिती स्थापणार

Story Summary: 

गोव्यातील शेतीत विकणार्‍या गावठी भाज्यांना चांगले व योग्य ते दर मिळावेत व ही शेती किफायतशीर ठरावी यासाठी या भाज्यांचे दर ठरविण्यास एक समिती स्थापन करण्याचा निर्णय फलोद्यान महामंडळाने घेतला आहे, असे फलोद्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचलक उल्हास पै काकोडे यांनी काल सांगितले.

दरम्यान, गोव्यातील शेतकर्‍यांनी विकलेल्या भाज्या विकत घेण्यासाठी सध्या पणजी, मडगांव, काणकोण व वाळपई अशी चार केंद्रें असल्याने आता दर एका तालुक्यात एक विभागीय भाजी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय फलोद्यान महामंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

फक्त केपें तालुक्यात कृषी खात्याची स्वत:च्या मालकीची वास्तू नसल्याने तूर्त तेथे हे भाजी केंद्र उघडणे शक्य होणार नाही. मात्र, अन्य सर्व तालुक्यात हे विभागीय भाजी खरेदी विक्री केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात शेती उत्पादनाला चालना देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे ते म्हणाले.