१४० पंचायतींवर भाजपचे सरपंच, उपसरपंच : पार्सेकर

Story Summary: 

राज्यभरातील १८५ पंचायतींपैकी १४० पंचायतींवर भाजप समर्थक सरपंच व उपसरपंचाची निवड झाली असल्याचे पंचायत मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या १६ मे रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीतही लोकांनी भाजप समर्थक उमेदवारांची मोठ्या संख्येने पंच म्हणून निवड केली होती, असे सांगून त्यामुळे बहुतेक पंचायतींवर भाजप समर्थक सरपंच व उपसरपंचाची निवड होणार हे त्याचवेळीच निश्‍चित झाले होते, असे ते म्हणाले.

पंचायतींचा विकास साधण्यावर आपण पंचायत मंत्री या नात्याने भर देणार असल्याचे ते म्हणाले.

केपे तालुक्यात सर्व सरपंच नवोदित

केपे तालुक्यातील ११ ही पंचायतीमधून नवोदित सरपंच निवडून आले आहेत. असे घडण्याचा हा एक विक्रमच आहे.

आंबावली, बाळ्ळी व अवेडे पंचायती महिलांसाठी राखीव आहेत. गेल्या पंचायत निवडणुकीत अवेडे पंचायत कुडचडे मतदारसंघात होती या पंचायतीचा आता केपे मतदारसंघात समावेश झाला आहे. या पंचायतीच्या सरपंच म्हणून शांती माश्कारेन्स तर उपसरपंच म्हणून कृष्णा गावस देसाई यांची निवड झाली आहे.

आंबावली पंचायतीचा समावेश पूर्वी केपे मतदारसंघात होता आता ही पंचायत कुंकळ्ळी मतदारसंघात घालण्यात आली असून या पंचायतीच्या सरपंचपदी फातिमा रोशा तर उपसरपंच म्हणून आगुस्तीनो फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. कावरे-पिर्ला व मळकर्णे पंचायती पूर्वी केपे मतदारसंघात होत्या. त्याचा समावेश आता सांगे मतदारसंघात करण्यात आला आहे. कावरे-पिर्ला पंचायतीचे सरपंच म्हणून राजेंद्र फळदेसाई तर उपसरपंच म्हणून रश्मीला वेळीप यांना निवडण्यात आले आहे. मळकर्णे पंचायतीच्या सरपंचपदी दीपक नाईक तर उपसरपंचपदी रेमी डिकॉस्टा यांची निवड झाली आहे. पूर्वी केपे मतदारसंघात असलेल्या बाळ्ळी पंचायतीचाही समावेश कुंकळ्ळी मतदारसंघात करण्यात आला आहे. या पंचायतीच्या सरपंचपदी अलका पोतदार तर उपसरपंचपदी भामटू वेळीप यांची निवड करण्यात आली आहे. नाकेरी-बेतुल पंचायतीच्या सरपंचपदी सुधाकर जोशी तर उपसरपंचपदी आंजेलीना लोबो यांना निवडण्यात आले आहे. फातर्पा पंचायतीच्या सरपंचपदी सानजील डिकॉस्टा तर उपसरपंचपदी मेदिनी नाईक यांची निवड करण्यात आली आहे. बार्से पंचायतीच्या सरपंचपदी सीमा वेळीप तर उपसरपंचपदी दत्ता वेळीप यांची निवड करण्यात आली आहे. मोरपिर्ला पंचायतीच्या सरपंचपदी निळू गावकर तर उपसरपंच म्हणून रोहिशा गावकर यांना निवडण्यात आले आहे. कुडचडे मतदारसंघात मोडणार्‍या असोल्डा पंचायतीच्या सरपंचपदी सुभाष देसाई तर उपसरपंचपदी सुकारिना फर्नांडिस तर शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी प्रमोद गावस देसाई तर उपसरपंच म्हणून मिलाग्रीन फर्नांडिस यांची निवड झाली.