जीसीए निवडणुकीसंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Story Summary: 

जीसीएच्या निवडणुकीसंदर्भात सलग्न क्लबांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी फेटाळून लावली व जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक पुढे ढकललेली बरी असे म्हटले आहे.

गेल्या गुरुवार दि. २४ मे रोजी उभय पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवाडा सोमवार दि. २८ मे पर्यंत राखून ठेवला होता. दरम्यान, जीसीएच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष ऍड. दिलीप दाभोळकर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करीत नवीन व्यवस्थापकीय समिती बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. तसे प्रतिज्ञापत्र ऍड. दाभोळकर यांनी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात सादर केले.

त्यानी प्रतिज्ञापत्रात ऍड. दयानंद नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय व्यवस्थापकीय समिती बिनविरोध निवडून आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यामुळे आता नव्या वादाला सुरवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झाल्याने जीसीएला प्रतिवादी ठरवून संलग्न क्लबापैकी महालक्ष्मी स्पोटर्‌‌स क्लब, कोलवाळे क्रिकेट क्लब, पणजी क्रिकेट क्लब, ऑक्सफोर्ड स्पोटर्‌‌स क्लब, एकोशी क्रिकेटर्स, बांदेे स्पोटर्‌‌स क्लब, बेती स्पोटर्‌‌स क्लब, मनोरमा स्पोटर्‌‌स ऍण्ड कल्चरल क्लब, हळदोणा क्रिकेट क्लब, विविधा स्पोटर्‌‌स क्लब व लॉरेन्स स्पोटर्‌‌सक्लबनी याचिका दाखल केली होती.

नवी समिती निवडल्याचा नार्वेकरांचा दावा

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या वर्ष २०१२-२०१५ कालावधीसाठी नव्या कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया नियमांनुसार पूर्ण करण्यात आली असून आपल्या अध्यक्षतेखालील पंधरा सदस्यीय कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडण्यात आल्याचे दयानंद नार्वेकर यांनी काल आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आपल्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ जुलै २०१२पासून सुरू होत असून नियमांनुसार सध्याच्या कार्यकारी मंडळाने आपल्या अध्यक्षतेखालील मंडळाकडे १५ दिवसांत ताबा सोपविणे बंधनकारक असल्याचेही ते म्हणाले.

विद्यमान कार्यकारी मंडळाने पोलीस बंदोबस्तात जीसीएचा ताबा घेतला, त्यांच्याकडे कसलाही आदेश नव्हता असेही नार्वेकरांनी सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाने स्थापलेल्या निवडणूक समितीनेच ही निवडणूक प्रक्रिया केल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही दोनदा जीसीए कार्यकारिणी बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.