पाणी पुरवठ्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

जलवाहिनीत झालेला बिघाड व परिणामी पणजीसह आसपासच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाण्याअभावी जनतेचे झालेले हाल या पार्श्‍वभूमीवर काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी व आसपासच्या भागातील पाणी पुरवण्याची पाहणी केली. तसेच लोकांना व्यवस्थितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांना दिले.

सरकारला पाणी समस्येची जाणीव असून लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन चर्चा केली असता गेल्या २६ रोजीपासूनच पणजीचा पाणीपुरवठा नियमित झाला होता, असे त्यांनी त्यांना सांगितले. करमळी येथे जी वाहिनी फुटली होती. तेथे ९०० एम.एम.ची वाहिनी घालण्यात आल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला होता असे पीडब्ल्यूडी अभियंत्यांनी स्पष्ट केले.

२४ रोजी दुरुस्ती काम सुरू झाले होते. मात्र, तेथे वेगाने काम करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, लोकांना पाण्याची समस्या होऊ नये यासाठी २४ ते २८ या दरम्यान ४५१ टँकरमधून पाणी पुरवण्यात आल्याचे अभियंत्यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्याशिवाय विविध ठिकाणी वाहिन्यांतून होणारी गळतीही थांबवण्यात आल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले. पाण्यासंबंधी कसल्याही तक्रारी असल्यास ०८३२-२४२००६९/७० या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी ८ ते ९.१० या दरम्यान पाटो कॉलनी, ईडीसी कॉम्प्लेक्स तर १.३० ते ३.३०. जुझे फाल्कांंव रोड, आल्तो पायलट, लुईस मिनेझिस रोड, दयानंद बांदोडकर रोड, एम. जी. रोड येथे तर संध्याकाळी ७.१५ ते ८.१५ या दरम्यान बाजार परिसरात, एम. जी. रोड, शिरगावकर रोड आदी ठिकाणी, दुपारी २.३० ते ३.३० या दरम्यान मिरामार १०.१५ ते १२.४५ या दरम्यान मळा, १०.१५ ते १२.४५ या दरम्यान बॉक-टी-व्हॉक व कोर्तीन, सकाळी ८ ते ९.१० या दरम्यान सरकारी वसाहत, तांबडी माती, सकाळी ८.१५ ते ९.२५ या दरम्यान मिरामार, दुपारी २ ते ४.१५ च्या दरम्यान भाटले, १०.१५ ते १२.३० या दरम्यान झरीवाडा, १.३० ते ३.३० या दरम्यान कुंडईकरनगर आदी ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने बैठकीत सांगितले.