४५ लाखांची हानी
पाळोळे किनार्यावर २५ रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन तयार कपड्यांची दुकाने आणि एक वाहन साहित्याचे मिळून चार दुकाने जळून भस्मसात झाल्यामुळे अंदाजे ४५ लाख रु. ची हानी झाली. ही आग विझविण्यासाठी मडगाव, सावर्डे, काणकोण येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
आग विझविण्यासाठी पाच टँकर इतके पाणी वापरावे लागले अशी माहिती काणकोणच्या अग्निशामक दलाचे प्रमुख काशिनाथ आमोणकर यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून वेळीच आग विझविल्यामुळे बाकीच्या दुकानांचा बचाव करणे शक्य झाल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
आगीत जळालेली सर्व दुकाने परप्रांतियांची असून हंगामासाठी लाखो रुपये देऊन ही दुकाने चालविली जात. यात वलू ईश्वरनायक (कर्नाटक), अजय कांजा (गुजरात), पप्पू छत्रीय कारभारी (कर्नाटक) यांची कपड्याची तर हमीद शेख ढोलकीवाला (कर्नाटक) याचे वादन साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. रात्रौ १२.३० च्या दरम्यान ही आग लागली. आग लागल्यानंतर मोठमोठा आवाज सुरू झाला त्यामुळे जवळपास असलेल्या भिसो पागी आणि सोमनाथ नाईक या स्थानिकांनी प्रथम धावत येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नगरसेवक सायमन रिबेलो यांनी एक टँकर पाण्याची सोय केली. काणकोणच्या अग्निशामक दलाला कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येऊ न शकल्यानंतर मडगाव, कुंकळ्ळी, सावर्डे येथून अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. पहाटे २.३० च्या दरम्यान आग विझविणे शक्य झाल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
काल सकाळी काणकोणचे मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सर्व दुकानांना पालिकेने रितसर परवाना दिलेला आहे. मात्र मूळ मालक भलतेच आहे. या सर्वांची चौकशी करून गैरव्यवहार आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे श्री. नाईक यांनी सांगितले.
आग लागलेली चारही दुकाने लोखंडी पत्र्याची असून अशा प्रकारच्या दुकानाना किनार्यावर परवानगी देताना पालिकेने दक्षता घ्यायला हवी होती. पालिकेच्या दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याच्या प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत होते. तर दिवसभरात पत्रे उन्हाने तापलेले असतात. त्यातच सर्व दुकानात माल भरपूर प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. या दुकानाना आग विझविण्याची साधने देण्याचे काम अग्निशामक दलाचे आहे. मात्र, सर्व सोपस्कार पालिकेने करावयाचे असतात, असे अग्निशामक दलाचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
किनारपट्टीवर व्यवहार करणार्या व्यावसायिकांना वीज कनेक्शन देताना कोणतेच सोपस्कार पूर्ण केले जात नाहीत. एका दुकानातून घेतलेली जोडणी चार पाच दुकानांना पुरविली जाते. बर्याच वाहिन्या जमिनीखालून देण्यात येत असल्यामुळे धोका निर्माण होण्याची कल्पना दै. नवप्रभाने बर्याच वेळा व्यक्त केली होती. मात्र, स्थानिक नगरपालिकेचे दुर्लक्ष, वीज खात्याचे दुर्लक्ष आणि स्थानिक नगरसेवक व व्यावसायिकांच्या हस्तक्षेपाचा हा परिणाम असल्याचे स्थानिक नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भरमसाठ रक्कम देऊन परप्रांतीय लोक स्थानिकांकडून दुकाने चालवायला घेतात. त्या दुकानांचा वीमा उतरवला जात नाही. एकेका व्यावसायिकाला पाच-पाच लाखांपेक्षा अधिक रु. चा फटका बसला आहे. या धक्क्याने वालू ईश्वर नायक याला काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.



