केपे मतदारसंघावरून मगो-भाजप युतीचा तिढा

Story Summary: 

मगो - भाजप युतीच्या प्रस्तावावर बोलणी चालू असून केपे मतदारसंघाच्या मुद्द्यावरच युती अडकून असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.

युतीची बोलणी चालू असल्याचे मगो नेते सांगत असतानाच बर्‍याच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे खासगी सचिव प्रकाश अर्जुन वेळीप यांना मगो पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाला त्यामुळे गोंधळ उडाला होता.

वेळीप यांनी मगोच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी प्रचारासही सुरूवात केली होती. मात्र केपे मतदारसंघ मगोला देण्यास भाजप तयार नसल्याने युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी युतीसंबंधीचा निर्णय पुढील दोन दिवसांत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. युतीबाबत सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

असे असले तरी भाजपमधील एका गटाचा मगोबरोबर युती करण्यास विरोध आहे. या युतीचा लाभ भाजपला न होता तो मगोला होईल असे त्यांचे म्हणणे आहे.